बेला

शीर्षकाचे नाव वाचून तुम्हाला कदाचित वाटेल की ही बाई बहुतेक मुलीबद्दल लिहीत आहे. बेला म्हणजे बेला हो! बेसन लाडू! एक नंबरचा हट्टी, पण तरीही खूप आवडता!

लग्न झाले की प्रत्येक मुलीला काहीतरी नवीन पदार्थ करण्याची हुक्की येते, तशी मला पण आली काही वर्षांपूर्वी. लाडू चिवडा करण्याचे ठरवले. गोडतिखटामध्ये मला तिखट पदार्थ खूपच आवडतात त्यामुळे सहसा बिघडत नाहीत. गोडाच्या फंदात कमी पडते. बेलाबद्दल आई मावशी व माम्यांकडून बरेच काही ऐकले होते. बेला खूप सोपा आहे त्यामानाने र. ला. अवघड. आता हा र. ला कोण!? र. ला म्हणजे बेलाचा भाऊ रवा लाडू. रवा लाडू पाकातच होतात आणि पाक म्हणजे खूप किचकट प्रकार, आपल्याला तो कधीच जमणार नाही, त्यामुळे र. ला. च्या भानगडीत कधीच पडायचे नाही असे ठरवले होते.

तर ऐकीव माहितीवर बेला करायचे ठरवले. आईचे वाक्य आठवले. बेसन लाडवाला खमंग भाजले गेले पाहिजे की छान होतात लाडू. ठरले तर मग! बेला आमच्या दोघांचाही आवडीचा. गॅस पेटवला, कढई ठेवली. तूप बेसन घातले आणि कालथ्याने ढवळायला लागले. काही वेळाने बेसन रंग बदलायला लागला. मनातून खूप खूश झाले. बेसनाचा रंग बदलला. तो काळपट चॉकलेटी दिसू लागला. बेसनाला खमंग वास येत नव्हता म्हणून अजून थोडे भाजले. डोक्यात फक्त एकच की बेसन खमंग भाजले गेले पाहिजे. बाकी तूप किती घ्यायचे, गॅस तीव्र ठेवायचा की मध्यम? की मंद? हे काहीही माहीत नव्हते. गॅस बंद केला. त्यात पिठीसाखर घालून थोडे ढवळले.

गार झाल्यावर वळायला घेतले तेव्हा मला जरा संशय आला. हे असे काय दिसत आहेत लाडू!?? ५-६ वळल्यावर देवाला नैवेद्य दाखवला व एक लाडू खाल्ला. चव अजिबातच चांगली नव्हती. काय चुकले असावे? मूडच गेला. विनायक कामावरून आल्यावर म्हणाला काय गं, काय झाले? "काही नाही रे. लाडू साफ बिघडले आहेत. " हे बेसन लाडू नाही तर काळे लाडू झाले आहेत. मी तर याला "काळे लाडू" असेच नाव दिले आहे. विनायकने एक लाडू खाल्ला. माझे मन न दुखवण्याच्या हेतूने म्हणाला, चांगले झालेत की लाडू!  मी नाक मुरडून चांगले कुठचे? दिसायला काळे व बेचव लाडू झालेत. मी ते सर्व फेकून देणार आहे. आच तीव्र ठेवल्याने हा प्रकार झाल्याचे लक्षात आले होते. तूप कमी झाल्याने थोडे भुरभुरीत पण दिसत होते.

परत एकदा ऐकीव माहितीवर आधारीत प्रयोग केला! बेलाला तूप भरपूर लागते हं! नाहीतर वळले जात नाहीत आणि चविष्टही होत नाहीत. परत एकदा बेसनतुपाचे मिश्रण कढईत व कढई गॅसवर पण यावेळी आच मध्यम. ढवळायला सुरवात केली. काही वेळाने वास, रंग, सारं कसं छान छान!! यावेळेला अगदी व्यवस्थित जमलेत. हं..... म्हणजे तूप पण सढळ हाताने घालावे लागते तर! पिठीसाखर घातली. ढवळले. गार झाल्यावर लाडू एकदम छान झाले! नितळही दिसत होते! ताटात ठेवले. नैवेद्य दाखवून एक तोंडात घातला. अहाहा! चवीला छानच! खुसखुशीत शिवाय नितळही, दिसायला पण छान! एका ताटात सर्व लाडू एकेक करून वळून ठेवले. त्यावर एक पेपर ठेवला. पूर्ण गार झाले की भरू या डब्यात. काही कामानिमित्ताने बाहेर गेले. आल्यावर बघते तर काय! सर्व लाडू बसलेले! बसले तर बसू देत. पण इतके काही ऐसपैस बसले की एकमेकात मिसळून गेले! परत मग तो सर्व गोळा भरला डब्यात. नंतर थोडे थोडे करून खाल्ले मिश्रण. त्यावेळेला अंदाज आला की आपण लाडू "छान" होण्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत!

तिसऱ्या प्रयोगाच्या वेळी लाडू "सर्वांगसुंदर" झाले. तुपाचे प्रमाण निश्चित कळले आणि  कसे घालायचे तेही कळले. तूप पातळ करून बेसनामध्ये घालायचे आणि एकीकडे कालथ्याने ढवळायला घ्यायचे. बेसन पूर्णपणे भिजेल इतकेच घालायचे. बेसन पूर्णपणे भिजले गेले पाहिजे पण अती भिजायला नको. परत जेव्हा लाडू करीन तेव्हा तुपाचे नक्की प्रमाण देईनच. बेलाचे सर्व हट्ट पुरवले तरच तो शहाण्यासारखा वागतो.

बेला माझ्या तरी खूप आवडीचा आहे, तुमचा आहे का?