घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे !!.

घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात 
 अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ..??
 आमच्या लहानपणची घरे जशी होती तशीच होती 
 कितीक काळ कुणास ठाऊक.? 
 माडीवरचे बळद कितीतरी जुने असावे 
 पुसलेच जात नाही मनातून 
 सिगारेट ओढणारा फेल्ट ह्यात घालणारा  
 पत्री डब्यावरचा अनेक मुखवट्याचा तो डबा
त्यात साठवलेल्या कितीतरी चीनी मातीच्या बाहुल्या 
लोलक,भवरे आणखीन काय नि काय 
कितीक  काळ तसाच होता  
पुसलाच जात नाही मनातून ....!!
 
आता घरे बदलली माणसे बदलली 
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात 
अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ...!!! 
माझ्याच घरात सारखी तोडफोड चालू असते 
घराचा नकाशा सारखा बदलत असतो दोन-तीन वर्षात 
वस्तूच्या जागा बदलत असतात सारख्या सतत 
कधीतरी येणारा हसून म्हणतो 
सर!!ओळखलेच नाही तुमचे घर...
इतका छान चेंज केलात.!!
  
पन्नास वर्षाची माझी बायको  बॉबकटने
माझ्या मित्राचे स्वागत करते 
तेह्वा हसून मी म्हणतो : ओळखले का हिला..?
 घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे 
आता राहिलीच आहेत कोठे ..??