नायक: | राहतील येत वसंत - राहतील जात वसंत नयन मनाचे उघडावे - अन् जगाकडे पाहावे - जगसुषमा अनाद्यनंत१,२ ।ध्रु। |
नायिका आणि नायकाचा भाऊ ध्रुवपद पुन्हा एकेकदा म्हणतात
नायक: नेमकी हीच देवाला - प्रार्थना असे मी केली
कुसुमांच्या सम राहू दे - स्मित सदैव अपुल्या गाली
उमटोत अंतरामधुनी - नित आनंदाची गाणी
... होवो आयुष्य सुखान्त ।१।
राहतील येत वसंत - राहतील जात वसंत ...
नायिका: | जीवनास आधार मिळे - होता आश्वस्त तुजवरी जेथवर जातसे दृष्टी - दृश्ये सुंदर तेथवरी मधुमास नवनवे यावे - घेऊन प्रेमरंग नवे ... सौख्ये आणखी अनंत ।२। राहतील येत वसंत - राहतील जात वसंत ... |
नायकाचा भाऊ: एकत्र असू जर आपण - खात्री ही मनात राहे
स्वर्ग जर असेल धरेवर - तर मग तो इथेच आहे
कसले दुःख चुकूनीही - फिरकणार तेथे नाही
... प्रेम हा जिथे भगवंत ।३।
राहतील येत वसंत - राहतील जात वसंत ...
टीपा :
पर्यायः
१. दोन भागांची ओळ हवी तर
जग पहा मनश्चक्षूंनी - जगसुषमा अनाद्यनंत
२. शेवटचा भाग जास्त सोपा हवा तर
जग सुंदर असे नितांत ... किंवा .. जग सुंदर
सदा नितांत
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : भाषांतराची चाल मूळ गाण्याप्रमाणे नाही. (भाषांतराची चाल - गा गागागागा गागा - गा गागागागा गागा (उद्धव?))
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ..अन्त किंवा आन्त असे जमवा बरका!