शुभ्र निशिगंधाप्रमाणे

मंदशा वाऱ्याप्रमाणे वावरावे तू जरा
शुभ्र निशिगंधाप्रमाणे दरवळावे तू जरा

तुजसवे जवळीक करण्या बघ हवा सरसावली
रेशमी काळ्या बटांना आवरावे तू जरा

रामप्रहरी स्वप्न बघणे शौक आहे पाळला
जाणुनी माझे इरादे बावरावे तू जरा

आरसा बघण्यास तुजला का असा सोकावला?
त्यापुढे पदरास ढळत्या सावरावे तू जरा

श्वास रोखुन चालता पण लागते चाहुल तुझी
पैंजणाच्या वाजण्याला थांबवावे तू जरा

टाळण्या नजरा विषारी रोखलेल्या तुजवरी
पोर्णिमेच्या चांदण्याला पांघरावे तू जरा

रात्र काळोखी पसरली चालता घे काळजी
वाट दिसण्या, काजव्यांना बाळगावे तू जरा

का शमा जळतेच आहे? संपली मैफिल तरी
जा विझव, जळत्या पतंगा वाचवावे तू जरा

रागदारी शुध्द गाणे आवडे "निशिकांत"ला
गात गज़ला षड्ज धैवत आळवावे तू जरा

निशिकांत देशपांडे  मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :- nishides1944@yqhoo.com
प्रतिसादाची अपेक्षा