एक जमाना झाला

एक जमाना झाला साधे हसलो नाही
तेवत होतो जमले तैसे विझलो नाही

लाख तुडवल्या वाटा, मागे वळता कळले
लाख पुढेही दिसती बाकी, थकलो नाही

भाग्याला मी घडवत आलो आत्मबलाने
सटवाईने लिहिले तैसे जगलो नाही

काय म्हणोनी नोंद जगाने घ्यावी माझी ?
दर्पण सांगे त्याला पण मी दिसलो नाही

दारिद्र्याला ताठ कणा का असतो केंव्हा ?
गरिबीसंगे लढताना मी झुकलो नाही

अपयश आले यत्न करूनी लाज न त्याची
घुबडाच्या ढोलीत कधी मी दडलो नाही

हव्यासाला थारा नव्हता दिधला केंव्हा
पाय कुणाचे खेचुन, पुढती पडलो नाही

सौदेबाजी हीच कसोटी आज यशाची
भाव करोडो आला पण मी विकलो नाही

शल्य मनाला "निशिकांता"च्या एकच आहे
हट्ट मुलांचे साधे पुरवू शकलो नाही

निशिकांत देशपांडे मो.नं. :-- ९८९०७ ९९०२३
E Mail : दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा