स्वप्न होते पाहिले

पौर्णिमेच्या चांदण्याचे स्वप्न होते पाहिले
अंतरी झंकारण्याचे स्वप्न होते पाहिले

मी फुले ताजी सुगंधी काल होती वेचली
मान तू वेळावण्याचे स्वप्न होते पाहिले

दार उघडे ठेवले मी लागता आहट तुझी
तुजसवे गंधाळण्याचे स्वप्न होते पाहिले

वाटते लोकास साऱ्या सभ्य आहे मी तरी
पाय माझा घसरण्याचे स्वप्न होते पाहिले

कुंचले अन रंगही तव वाट बघती मजसवे
चित्र तव रेखाटण्याचे स्वप्न होते पाहिले

शायरी माझी झळाळे शेर तू गाता कधी
मैफ़िलीच्या रंगण्याचे स्वप्न होते पहिले

झोप माझी हरवलेली स्वप्न मी पाहू कसे?
स्वप्न स्वप्नी पाहण्याचे स्वप्न होते पाहिले

व्हावयाचे तेच झाले वेदना ज़खमा किती?
आसवांना लपवण्याचे स्वप्न होते पाहिले

मार्ग धरला वेगळा तू काय नवखे त्या मधे?
स्वप्न माझे भंगण्याचे स्वप्न होते पाहिले

का तुला "निशिकांत" असतो शोध शब्दांचा सदा?
शेर तुजवर जुळवण्याचे स्वप्न होते पाहिले