पॅंजणाचे वाजणे मज
ओळखीचे वाटले
वायदा तू तोडणे मज ओळखीचे
वाटले
मोगरा फुलला असावा सांगतो मज
गारवा
मंद तव गंधाळणे मज ओळखीचे
वाटले
रंग चढला मॅफिलीला धुंद मी
असलो तरी
चेहऱ्याला झाकणे तव ओळखीचे
वाटले
माझिया गजलेस गाता भाववश
होणे तुझे
दोन अष्रू ढाळणे मज ओळखीचे
वाटले
फूल हसरे तू, परंतु राहसी
काट्यात का?
रोज काटे बोचणे मज ओळखीचे
वाटले
मखमली नाते जिव्हाळा
भूतकाळी हरवले
रेशमाचे काचणे मज ओळखीचे
वाटले
मांड सारीपाट आता सोंगट्या
खेळू जरा
कटघरी तू मारणे मज ओळखीचे
वाटले
काळीमा प्रेमास कोणी फासली
ते सांग ना?
प्रश्न अवघड टाळणे मज ओळखीचे
वाटले
वाटते "निशिकांत" लज्जा प्रेम
बोलून दावण्या
मॉन ओठी पाळणे मज ओळखीचे
वाटले