मुद्रित प्रेमाचे सुनीत

     'प्रेमाचे जग' पुस्तकांत बघुनी वेडावलो मी अती
रस्ते, क्लास नि घातल्याच सगळ्या लायब्रर्‍या पालथ्या.
भेटेना मजला कुठेच जगती स्वप्नातली ती प्रिया
     भेटे नाटककार, लेखक, कवी यांना कशी मात्र ती?



     सादेला प्रतिसाद त्यांस मिळतो! - कैसा मला ना कळे.
मैत्री, प्रेम, सहानुभूति, ममता ह्यांना इथे भाव ना!
पाहोनी व्यवहार नीट मग हो येती जगी भावना!
     लाभे 'त्यां'स - मला न जे - बघुन हे त्यांच्यावरी मी जळे.


     ईर्ष्येने उठलो नि 'पेन' मग ते घेऊन हातामधे
पाडोनी कविता भराभर अश्या, मी स्वप्न केले पुरे!
प्रत्यक्षात न लाभले मजसि ते काव्यात केले खरे.
     'त्या गठ्ठ्यावर' नेमकी नजर ती संपादकाची पडे!



     त्याने "नक्कि खपेल खूप!" म्हणुनी ते छापले मस्त की!
तत्काळी मज प्रेम बीम कळले - येते कसे पुस्तकी!"


मुंबई १९८३