आता ...?

ओठ माझे टाकले शिवुनी, अतां..
काय मी मागू मला "तू" पावता?

व्यर्थ मी आव्हान अंधारा दिले
वादळे हसली दिवा मी लावता!

ही धरा आनंदली, उन्मादली
त्या नभाच्या पापण्या ओलावता!

मी दिली आमंत्रणे होती सुखा
दुःखही आले न मी बोलावता!

शोधुनी थकली किती आहे मला
वेदनेला द्या आता माझा पता!

एकही बोली न लावावी कुणी?
मी स्वतः मजला पणाला लावता!

जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!

हात हाती घ्यायचा होता तुझा
संपले आयुष्य स्वप्ने पाहता!

मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!