एकूण!

..................................
एकूण!

..................................

रस्ताच ज्याचे घर... असा मी!
राहू तरी कुठवर असा मी?

घेतात घेणारे विसावा...
रस्त्यातला पत्थर असा मी!

मी केवढा होतो प्रवाही...
झालो कसा कट्टर असा मी?

माझ्यावरी मी मात केली...
आहेच मातब्बर असा मी!

नसशील तू तेव्हा कसाही...
आहेस तू तोवर असा मी!

आधी कसा होतो कळेना..
(राहीन का नंतर असा मी? )

म्हणतो विजेला कण धुळीचा...
'चमकेन का क्षणभर असा मी? '

देहात झालो मी विदेही...
शून्यातला ईश्वर असा मी!

विद्रूप काहीही दिसेना...
झालो कधी सुंदर असा मी?

वेडा-खुळा ना धड शहाणा...
एकूण आहे तर... असा मी!!

- प्रदीप कुलकर्णी

..................................
रचनाकाल - 17 नोव्हेंबर 2011
..................................