तुझी, माझी, जगाची ही कथा आहे
सुखाचा शोध सर्वांचा वृथा आहे
कटाक्षांना चुकवणे शक्य होते पण
जगी घायाळ होण्याची प्रथा आहे
कुणावर आळ घेऊ स्वप्नभंगाचा?
सभोवारी स्वकीयांचा जथा आहे
मनीषांनी कसे चौखूर उधळावे?
सवय चिखलात रुतण्याची रथा आहे
पुराणातील वांगी शोभते तेथे
खलांची हार ही भाकडकथा आहे
तुझे सौभाग्य मज तिसरा नसे डोळा
उरी माझ्या तुझा शर, मन्मथा, आहे
अढळ विश्वास आहे, 'भृंग', प्रेमावर
परी नशिबावरी थोडी तथा आहे