सूर्यासमोर करता धिक्कार काजव्यांचा
मानाल घन तमी पण उपकार काजव्यांचा
रात्री उरास घेता भाड्यावरी कवडसे
दिवसा उजाड असतो बाजार काजव्यांचा
धग तापल्या घराची होते असह्य तेव्हा
शीतल प्रकाश भावे गुलजार काजव्यांचा
त्यांच्या प्रकाशण्याचा कसला उदात्त हेतू?
लुकलुक करीत चाले शृंगार काजव्यांचा
गरजेल तोफ तेव्हा विझतील प्राणज्योती
खिंडीत होत पावन निर्धार काजव्यांचा
अस्ताचलास गेले तेजोनिधी नृसिंह
दिल्लीत आज भरतो दरबार काजव्यांचा
हा र्हास की विवशता सामान्य माणसांची?
सोडून सूर्य करती सत्कार काजव्यांचा