खरेच जादू, प्रिये! तुझ्या पैंजणात आहे!

खरेच जादू, प्रिये! तुझ्या पैंजणात आहे!
तुझीच चाहुल निशीदिनी अंगणात आहे!!

किती जरी टाळलीस किणकिण, टळेल का ती?
तुझ्या मनातील गूज त्या कंकणात आहे!

हरेक माणूस सरकशीतील पात्र वाटे.......
असो कुणी वाघ, सिंह, तो...रिंगणात आहे!

चहूकडे भांडणे, बखेडे, विवाद, तंटे!
कुठे असर राहिला तुझ्या वंगणात आहे?

करा किती प्रेम, गोड बोला, कुणी न वंगे.....
अलीकडे ज्यास त्यास रस भांडणात आहे!

खरा हिरा धूळ खात पडला कितीक वर्षे.....
चकाकणारा खडा पहा...कोंदणात आहे!

न नाव नुसते, प्रसंग प्रत्येक कोरलेला;
अतीत माझे समस्त, या गोंदणात आहे!

व्रतस्थ राहून धर्म माझा निभावला मी!
कधीच ना पाहिले किती आंदणात आहे!

इथे न विश्वास, प्रेम, श्रद्धा कुणात आता!
खरेच कोणास राम संभाषणात आहे?

पिकेल हापूसचीच गोडी, अशीच माती.....
म्हणून माणूसही तसा कोकणात आहे!

जपून एकेक पान ते ठेवतात माझे!
सुवर्ण माझे झळाळते टाचणात आहे!!

असेलही हा फिकट जरी डाग जाहलेला!
अजूनही वेदना ठणकती व्रणात आहे!!

नकोस मोजू कितीक मी साधल्यात गझला....
महत्व संख्येस फार ना, ते गुणात आहे!

इथेच हज अन् इथे मिळे चारधाम यात्रा!
तुझेच अस्तित्व चौंकडे हरकणात आहे!!

उगाच काळास मी न करतो लवून वंदन!
हरेक घटना खरेच घडली क्षणात आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
 भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
 नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१