काय तो वदणार मजला पाठ आहे!
बिनकण्याचा तो.... त रीही ताठ आहे!!
मी असा दिसतो, नको जाऊस त्यावर........
जाण तू पडली कुणाशी गाठ आहे!
बोलणे अगदी मऊ, लोण्याप्रमाणे!
मात्र करताना कृती तो राठ आहे!!
ही न ओहोटी नवी, नवखी न भरती......
तू मना सागर! तुझा मी काठ आहे!
केवढा हा गर्व बुद्धीचा म्हणावा!
हा म्हणे मतिमंद....तो तर माठ आहे!!
दांडगाई, माज, मस्ती केवढी ही....
पोलिसी वेषातला तो लाठ आहे!
काय रेड्याचा तरी उपयोग येथे?
म्हैसही प्रत्येक इथली वाठ आहे!
चाखल्यावरतीच फळ, समजेल गोडी!
मी हपूसाचीच अस्सल बाठ आहे!!
काम, नुसते काम, तेही बेहिशोबी....
याद कोठे राहते वय साठ आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१