ह्यासोबत
मित्रांनो
मित्रांनो
पहिल्या लेखात आपण आयन रँडच्या बद्दल थोडंसं वाचलं. ह्या लेखमालेचा उद्देश तिच्या "दि फाउंटनहेड" ह्या कादंबरीचा संक्षिप्त स्वैर अनुवाद करून देणं हा असल्याने, ह्या पुढे आपण कादंबरीकडे वळू या.
अर्थात, जवळपास ७०० पानांच्या ह्या कादंबरीचा तेवढ्याच लांबीचा अनुवाद करणं एवढी माझी पोचही नाही आणि तो उद्देशही नाही. अत्यंत सुंदरपणे लिहीलेल्या एका महान साहित्यकृतीची ओळख, त्यातील तत्त्वज्ञानाची ओळख करून देणं एवढा माफक मनसुबा आहे.
पात्र परिचय करून घेण्या आधी कादंबरीची मूळ संकल्पना काय आहे, पाया काय आहे हे दोन ओळीत पाहू, मग पुढे ह्या कल्पनांचा ऊहापोह होईलच.
फाउंटनहेड ही कादंबरी काव्यात्मक व्यक्तीवाद, वास्तववाद आणि स्वातंत्र्यवाद ह्या तीन मूळ संकल्पनांवर बेतली आहे. काव्यात्मक अशासाठी, की वास्तवात आपल्याला ह्या कथेतील नायक - नायिकेप्रमाणे पात्रं दिसणं अवघड आहे. तरीही ही कादंबरी वास्तववादी आहे, कारण कथेचा नायक प्रत्यक्ष जीवनात आपली मूल्यं जपून विजयी होता येतं हे दाखवून देतो. आणि कादंबरीच्या पानापानातून स्वातंत्र्याचे पाठ अनुभवायला मिळतात. कोणत्याही प्रकारचं बंधन न जुमानता, आपल्या कलेशी, विचारांशी प्रामाणिक असं आचरण करून स्वातंत्र्याची शक्ती सकारात्मक, सृजनात्मक कशी वापरता येते ह्याचा पाठ कादंबरी देते.
कादंबरीत वरील तीन संकल्पनांचा साम्यवाद किंवा समाजवाद, दास्यवाद आणि परंपरावाद ह्यांच्याशी सतत संघर्ष होताना आढळतो. साम्यवाद, दास्यवाद आणि परंपरावाद हे "जैसे थे" ह्या परिस्थितीच्या जतनामध्ये गुंतलेले असतात. व्यक्तीवाद, वास्तववाद आणि स्वातंत्र्य ह्या तीन तत्त्वांचा "जैसे थे" ह्या परिस्थितीला सतत धोका असतो आणि ह्या संघर्षाचे पडसाद आपल्याला कादंबरीतल्या पात्रांच्या आयुष्यात, वागणुकीत पहायला मिळतात.
शेवटी ज्याला आपण दुष्टचक्र, प्रतिगामी वृत्ती म्हणतो, त्या कशा सत्यापुढे, व्यक्तीपुढे आणि स्वातंत्र्यापुढे नपुंसक ठरतात हे आपण पहातो.
तेव्हा आता कादंबरीतल्या मुख्य पात्रांची ओळख करून घेऊ या. कादंबरीचं कथानक आणि रचना बऱ्यापैकी क्लिष्ट आहे, तेव्हा प्रत्येक मुख्य पात्राचं व्यक्तीमत्व आणि पार्श्वभूमी माहित असणं गरजेचं आहे.
हॉवर्ड रोर्क - हे ह्या कथेतलं मुख्य पात्र. नायक म्हटलं नाही, कारण नायक म्हटला, कि अनुयायी आलेच. रोर्कला (ह्याला आपण ह्यापुढे ह्याच नावाने संबोधूया) नायक होण्यात रस नाही, तसाच त्याला कोणाचाही अनुयायी होण्यात रस नाही. रोर्क हा एक अत्यंत कुशल असा स्थापत्यविशारद आहे. स्वाभिमानी, सच्चा आणि निर्भय रोर्क हा आपल्या कलेशी, कामाशी पूर्णपणे प्रामाणिक आहे. त्याला इतर काय करताहेत ह्याच्याशी देणंघेणं नाही, तसंच इतरांनी त्याच्या कामात ढवळाढवळ केलेली त्याला खपत नाही. कोणत्याही सामुहिक गटात त्याला रस नाही. त्याच्या मते कोणतंही काम हे यशस्वी व्हायचं असेल तर ते सामुहिकरित्या होऊच शकत नाही. त्याला ह्यापूर्वीच्या दिग्गजांनी काय केलं ह्याच्याशी काही देणंघेणं नाही. माणसाच्या सृजनक्षमतेवर त्याचा गाढ विश्वास आहे, आणि त्याच्या मते पूर्वजांच्या पुण्याईवर विसंबून आपण राहिलो तर ह्यापुढे मानवजातीची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होईल.
रोर्कला उसनवारीचा अत्यंत तिटकारा आहे... म्हणजे स्वतःकडे नसताना इतरांकडून घेऊन त्याची शेखी मिरवण्याचा. स्वतःच्या कामाला तो देव मानतो आणि त्याच्या कामाची विटंबना त्याला असह्य आहे. केवळ काम मिळावं म्हणून लांगूलचालन करणे आणि लाळघोटेपणा करणे त्याला अशक्य आहे.
कितीही अडचणी आल्यातरी त्याच्या स्वतःवरचा आणि स्वतःच्या तत्त्वांवरचा विश्वास अढळ आहे. प्रथमदर्शनी त्याचा स्वभाव "खाईन तर तुपाशी नाही तर राहिन उपाशी" असा वाटतो, आढ्यताखोर वाटतो. पण जेव्हा त्याच्यावर काम न मिळाल्याने खरंच उपाशी रहाण्याची पाळी येते, तेव्हा तो ती परिस्थिती आनंदाने स्वीकारतो. आयुष्यात स्वतःच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहूनही शेवटी विजयी होता येतं हे तो दाखवून देतो.
आपण कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर रोर्कच्या जवळपास येणारी पात्रं पाहू, पण रोर्कचं मोठेपण त्यापात्रांच्या पुढे जाऊन "बोले तैसा चाले" ह्या गुणात आहे.
रोर्कचं जिच्यावर अतोनात प्रेम आहे अशा डॉमिनिक फ्रँकन शी पुढच्या भागात ओळख करून घेऊ.
आपला, स्वातंत्रप्रेमी, मंदार...