फाउंटनहेड - कथा ७

त्यपीटरची आई आपलं राहतं घर भाड्याने देऊन पीटरबरोबर रहायला न्यूयॉर्क मध्ये आली. खरं तर पीटरला ती तिथे यायला नको होती, पण तो तिला नाकारू शकला नाही. कारण ती त्याची आई होती आणि आईचा अव्हेर करणं त्याला जमलं नसतं.


आईचं "स्वागत" त्याने काहीशा उत्साहानेही केलं... त्याला आपल्या प्रगतीने आईला दिपवून टाकायचं होतं. अर्थात, सौ कीटिंग काही दिपल्या वगैरे नाहीत. त्यांनी पीटरचं घर, त्याच्या खोल्यांचं निरिक्षण केलं आणि निर्वाळा दिला... "निदान सध्यापुरतं तरी ठीक आहे.. (पण पुढे अजून खूप काही करायचं आहे तुला)".


त्या पीटरच्या कचेरीतही जाऊन आल्या, अगदीच अर्ध्या तासाची धावती भेट देण्यासाठी. संध्याकाळी पीटर घरी आल्यावर मग त्याचं बौद्धिक घेतलं गेलं. "तो व्हिदर्स तुझ्यापेक्षा भारीतले सूट घालतो, त्या लोकांपुढे तुला नीट नेटकं राहिलं पाहिजे, तुझा आब राखला पाहिजेस. आणि तो कोण तो आला होता आराखडे घेऊन तुझ्याकडे, त्याच्याबद्दल मला काही फार प्रेम वाटत नाहीये... काही विशेष नाही, मी असते तर नीट करडं लक्ष ठेवलं असतं त्याच्यावर. का आणि कसं ते मला विचारू नकोस, मला कळतात ह्या गोष्टी! आणि तो बेनेट आहे ना, त्याच्यावर जरा पाळत ठेव, मी तर त्याच्यापासून मुक्तीच पसंत करेन.... ".....


मग अचानक तिने विचारलं, "त्या गाय फ्रँकनला काही मुलं बाळं आहेत की नाही?"


पीटरने त्याला एक मुलगी असल्याचं सांगितलं, आणि त्यानंतर त्याच्या आईने त्याला मूर्ख ठरवत तिची (काही करून) भेट घेण्याचा "सल्ला" दिला...


अर्थातच लगेच दुसऱ्याच दिवशी पीटरने तो विषय फ्रँकन कडे काढून तिचं कौतुक वगैरे केलं. ते ऐकून फ्रँकनने पीटरला धोक्याची सूचना दिल्यासारखं सांगितलं की ती त्याच्याच काय पण कोणाच्याच कह्यात नसते. आणि ती नक्कीच पीटरला फाडून खाईल अशी आहे. फ्रँकन स्वतः तिला, तिचं नाव डॉमिनिक, फार घाबरत असे. बाप असण्याची जबाबदारी केवळ ती झटकता येत नाही म्हणून तो निभावून नेण्याचा प्रयत्न करत होता, आणि त्या प्रयत्नांत तो सपशेल फसला होता हे ही त्याने पीटरला सांगितलं. आणि शेवटी संभाषणाचा ओघ दुसऱ्याच विषयाकडे वळवला...


पीटर खरं तर चिडला होता... निराश झाला होता, आणि आत खोलवर कुठे तरी सुटकेचा निःश्वासही टाकत होता. फ्रँकनकडे पाहून त्याची मुलगी कशी दिसत असेल ह्याची अटकळ बांधताना त्याला राहून राहून ती कमालीची कुरूप असणार असं वाटत होतं. अर्थात त्यामुळे त्याच्या मनसुब्यांवर काही परिणाम होणार होता असं नाही... काही दिवस थांबावं लागलं असतं इतकंच.


ह्या सगळ्या घटनांनी त्याला परत एकदा कॅथरीनला भेटावंसं वाटू लागलं. कॅथरीनची आणि त्याच्या आईची भेट स्टँटन मध्येच झाली होती आणि पीटर परत तिला भेटायचा प्रयत्न करणार नाही अशी आशा तिला होती.. तिचं नाव न घेता तिने पीटरला "अशा" मुलींपासून दूरच राहण्याचा सल्ला दिला. आणि वर्तमानपत्रांत येणाऱ्या कर्तबगार पुरुषांच्या आयुष्याची, करिअरची राखरांगोळी कशी अयोग्य स्त्रीमुळे झाली हे सांगणाऱ्या बातम्या त्याला आवर्जून वाचून दाखवू लागली.


कॅथरीनकडे जात असताना पीटर विचार करत होता की फार वेळा इथं आल्यावर त्यांची भेट झाली नव्हती, पण ह्या भेटीच फक्त त्याला त्याच्या न्यू यॉर्क मधील वास्तव्यात आठवत होत्या... तिच्या घरी, खरं तर तिच्या काकाच्या घरात, ती पत्रांचा प्रचंड पसारा करून बसली होती अजागळासारखी. आपल्या बहुश्रुत आणि यशस्वी काकाच्या पत्रव्यवहाराची जबाबदारी ती मोठ्या प्रेमाने, अभिमानाने पार पाडत होती. ते पाहून पीटरने तिला एकदम उचलून घेतलं आणि म्हणाला "वेडाबाई तू अगदीच बावळट आहेस... चल हे सगळं सोडून आपण जाऊ छान पैकी फिरायला". ती त्याच्या कुशीत एकदम खूश होती.. पीटरने तिला आपल्या दिनचर्येची, आपल्या व्यग्र दिनचर्येची कहाणी सांगितली. ती अगदी नियमितपणे पीटरच्या कामाची, त्याच्या इमारतींची कात्रणं जपून ठेवत असे, तिच्या साठी तोच आनंद होता. आणि तिने त्यांचं एक छोटंसं पुस्तकही बनवलं होतं, तिच्या काकांना येणाऱ्या पत्रांप्रमाणेच.


काकाचा विषय मनात आला कि ती आपली रहातच नसे.. काकाचं, त्याच्या विद्वत्तेचं, त्याच्या लोकप्रियतेचं तिला फार कौतुक होतं. अगदी ओळख पाळख नसलेले लोक सुद्धा त्याला किती आत्मीयतेने लिहीतात, सल्ले मागतात ह्याचं तिला अप्रूप होतं. त्याच्याबरोबर एवढी वर्षं राहून अगदी सामान्य माणसालाही बरंच काही शिकता येतं असं तिचं म्हणणं होतं.


पीटरने तिला परत बाहेर चलण्यासाठी गळ घातल्यावर ती म्हणाली हे काम सोडून, माझ्या काकाचं काम सोडून मी कशी जाऊ? तेव्हा वैतागून पीटर म्हणाला तुझा काका गेला मसणात, माझ्याबरोबर यायचं सोडून काय तू त्या काकाच्या मागे पडली आहेस? तेव्हा तिने त्याला विचारलं कि तू काकाचं (सर्मन्स इन स्टोन्स) वाचलंस का? त्याचं नाव ऐकून पीटर अधिकच वैतागला... जिथे जातो तिथे त्या पुस्तकाशिवाय दुसरं काही ऐकायला मिळत नाही अशी त्याची तक्रार होती, जरी ते पुस्तक फार सुंदर असलं तरी. आणि आपण दुसऱ्या काहीतरी विषायावर बोलू असा त्याने धोशा लावला. तेव्हा कॅथरीनने विचारलं "तुला एल्स्वर्थ काकांना नाही का भेटावंसं वाटत?" "अर्थात, वाटतं ना, नक्कीच आवडेल मला." "पण मागे एकदा तर तू नाही म्हणाला होतास?..." "केटी, जाऊ देना मी काय काय उलट सुलट बोलतो ते कशाला लक्षात ठेवतेस? मरूदे.. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्याला भेटेनच." हे संभाषण चालू असतानाच मध्येच ती पीटरच्या कुशीतून निघून एका पत्राच्या मागे धावली आणि ते पाहून मात्र पीटर विटला, त्याने कॅथरीनला परत बाहेर जायची गळ घातली, आणि शेवटी ते दोघे बाहेर पडले.


चालत चालत एका बागेतल्या बाकावर जाऊन बसले, आणि एकमेकांत गुंतून जात प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. पीटरने तिला आपण "एंगेज्ड" आहोत ना असं विचारलं, त्याला तिने अगदी निर्विकारपणे, पण ठामपणे हो असं म्हटलं. कारण कोणत्याही, विशेषतः आनंदाच्या भावनेचं प्रदर्शन तिला करू नये असं वाटत होतं. त्यामुळी आनंद हिरावून घेतला जाईल की काय अशी भीती होती.


एखाद दोन वर्षांत माझं बस्तान चांगलं बसलं, की आपण लग्न करू असं पीटर तिला म्हणाला, पण तिने आपण घाई करण्याची काही गरज नाही असं त्याला सांगितलं. पण तो वर तिने ही गोष्ट कोणाला सांगू नये, गुपित ठेवावी असं पीटरने तिला सांगितलं. आणि अचानक त्याला काहीतरी सुचलं.... त्याने केटीला विचारलं "मी हे सगळं तुझ्या त्या एल्स्वर्थ काकाशी जवळीक साधण्यासाठी करतोय असं तर नाही ना वाटत?" केटी म्हणाली "नाहीच मुळी.. त्यांना आवडणार नाही हे, पण त्याची चिंता आपण कशाला करायची?" एल्स्वर्थला लग्नसंस्था ही एक आर्थिक शोषणाची पद्धत आहे असं वाटतं , म्हणून तो आपल्या लग्नाबद्दल फारसा उत्साही नसेल असं तिचं म्हणणं होतं. त्यावर पीटर "मग आपण दाखवूनच देऊ त्याला" असं म्हणाला. आणि केटीला आपल्या मनात काही अंतःस्थ हेतू नाही... जसा डॉमिनिकशी ओळख करून घेण्यात होता... हे पाहून बरं वाटलं. आणि हा विचार मनात आल्याबद्दल त्याला स्वतःचाच राग आला. केटीला इतर लोकांपासून, त्यांच्याबद्दलच्या विचारांपासून दूर ठेवण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न होता. पुढची रात्र त्यांनी एकमेकांच्या कुशीत काढली...


क्रमशः....