गगन भरारी- (२)

दुपार सरली व वामकुक्षी घेऊन उठलेल्या भोसलेंना दिल्लीहून एक अधिकारी आल्याचा संदेश मिळाला. मेजर दिपक भावे - सडपातळ, कुशाग्र व गोरासा पोरकट वाटणारा अधिकारी बघून भोसलेंना नवल वाटले. सीक्रेट सर्व्हिसेस मधील अधिकारी बहुतांश सेनादलाचेच असतात हा समज त्या पोरसवदा माणसाकडे पाहून खरा वाटत नव्हता. सेनादलाच्या जिप्सीला टेकून उभा असलेला मेजरने एम्बॅसेडर मधून आलेल्या एव्हिएम साहेबांना ओळखले व सरळ त्यांच्या खोलीत त्यांच्या मागोमाग शिरला.


"बसा" भोसलेंनी खुर्चीकडे हात दाखवला.
"नाही सर, गोळी कुठून आल्याचे आपल्याला वाटते ?" चॉपर व जीपचा एकूण अडिचशे की.मी प्रवासाच्या थकव्याचे कौतुक करायला मेजर भावे तयार नव्हता.
"मी जेथे बसलो आहे त्याच्या डाव्या बाजूने-"
पुढील बरेचसे सोपस्कार मेजर भावे बारकाईने पार पाडीत होता. ज्या खिडकीतून गोळी झाडण्यात आली तेथल्या जमीनीवरील गवत बऱ्याच ठिकाणी दबले गेल्याचे त्याच्या नजरेतून सुटले नव्हते. आसपासच्या झुडपांचीही बऱ्यापैकी हानी झालेली होती. एका ठिकाणची माती काळपट लाल दिसत होती...


"आपणांस काहीच आवाज आल्याचे स्मरत नाही सर ?"
"मला काहीतरी कशावर तरी आपटून, कोणीतरी विव्हळण्याचा अस्पष्टसा आवाज आल्यासारखे वाटले पण त्या छोट्या गोष्टीकडे माझे दुर्लक्ष झाले कारण तेंव्हा रक्षकांना बोलावणे जास्त महत्त्वाचे होते" इतक्या बारकाईने मेजर प्रत्येक गोष्टीचा विचार करतोय हे पाहून भोसले साहेब खूश झाले.
"खिडकी पासून थोड्या अंतरावर गवतातल्या मातीला रक्त लागलेले आहे. मी तेथल्या मातीचे नमुने गोळा करून फोरेन्सीक लॅब ला पाठवतो तोवर आपण कृपया आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना येथे बोलवू शकाल का सर ?"
"एक सोडून सर्वांना बोलावून घेतो" "कोण गैरहजर राहणार आहे ?"
स्क्वा.लि.अमर गुप्ते" भोसलेंना अमर रात्रभर गायब असल्याचे पुरींनी कळवलेले होतेच.
"दिल्ली एमटेक, ८९ पुणे सिएमई बॅच- पट्टीचा बॉक्सर- स्क्वॅश खेळाडू- कमांडो - तो का येणार नाही सर ?" मेजर आश्चर्यचकित झालेल्या भोसलेंच्या चेहऱ्याकडे बघत हसू दाबण्याचा प्रयत्न करीत होता.
"काल पासून त्याचा पत्ता नाही - आज सकाळी झालेल्या बैठकीला तो गैरहजर होता, त्याचा भ्रमणध्वनी एका झुडुपात पडलेला सापडला- आम्ही तेथे काडीवर झेंडा लावून ठेवला आहे."
नकळत मेजरच्या तोंडातून शीळ सटकली. "अच्छा, जेथे रक्त पडलेले होते त्या जागेजवळच मी तो झेंडा पाहिला खरा पण मला त्याचे कारण तेंव्हा कळले नव्हते."


दिपक प्रशिक्षण घेत असताना कनिष्ठ असलेला अमर गुप्ते मुष्टियुद्धामुळे प्रसिद्ध होता- दोघांची तोंडओळखही होती. अमर थोडा शिष्ट आहे असा दिपकचा समज होता. कुठेतरी समीकरण काहीतरी चुकत होते. हे वाटते तितके सोपे प्रकरण नाही हे मेजरला कळून चुकले होते. पुरी साहेबांशी जुजबी बोलल्यानंतर त्याने आपला मोर्चा कुमार कडे वळवला. कुमार बरीच महत्त्वाची बातमी देऊ शकेल असा मेजरचा होरा होता.
कुमारने सर्वप्रथम गुप्तेचा भ्रमणध्वनी मेजरच्या हवाली केला. माती लागलेला मोबाईल पाहून मेजरला खात्री पटली की, तो चुकून त्या जागेवर पडला असावा. ३२ हुकलेले फोन सोडल्यास बरीच माहिती त्याला महत्त्वाची होती. काळजीपूर्वक त्याला ती माहिती हाताळणे भाग होते. गुप्तेशी संबंधीत, डोकं वापरून काम करणारा, राडार जॅमरची व्यवस्थित माहिती असलेला स्क्वा.लि. कुमार ह्या केस मध्ये एक चांगला सहकारी ठरण्याची शक्यता त्याने गृहीत धरली होती.


इतक्यात भोसले साहेब बोलवत असल्याचा निरोप त्याला एका ऑर्डली मार्फत मिळाला.
"यस्सर ?" "भावे; एक विनंती आहे... आपण मला समजून घ्याल म्हणून खाजगीत करीत आहे."
"यस्सर !" "राडार जॅमर हा आपल्या देशाचा प्राण आहे असेच समजून काम करावे लागेल, ह्या कानाची बातमी त्या कानाला पोहचली तर सर्वच खेळ होत्याचा नव्हता होणार आहे !" भोसलेंनी खाजगी स्वरात सांगितले.
"आय नो सर, आय हॅव बीन डायरेक्टली ब्रिफ्ड अबाउट धिस बाय डिआरडिओ अँड आर्मी एचक्यू - स्वत: ब्रिगेडियर साहेबांनाही ह्या बद्दल फारशी माहिती नाही. सीक्रेट सर्व्हिसेसच्या कुठल्याही विंगला मी कुठल्या कामगिरीवर आहे त्याची कल्पना नाही. ह्या ऑपरेशनबद्दल पूर्ण गुप्तता पाळण्यात येईल सर, आपण निश्चिंत राहावे." मेजरला परिस्थितीचे नेमके गांभीर्य बरोबर ठाऊक होते.


कुमार बरोबर बसून गुप्तेच्या मोबाईलवर आलेले व त्याने केलेले गेल्या ३/४ दिवसांतले फोन शोधून काढण्यात मेजरला यश तर आले परंतू त्यातून फारसे काही हाती लागले नाही. लघु संदेश तपासण्या इतका वेळ मेजरकडे नव्हता. गुप्तेने शनिवारी एकही फोन बाहेर केला नव्हता. भ्रमणध्वनीच्या त्या कंपनीकडून खातरजमा झालेला अहवाल मेजरच्या समोर पडलेला होता. त्याचे इतर फोनही ओळखीच्या वर्तुळात केलेले होते. अमरचा ऑर्डली फारशी माहिती देऊ शकलेला नव्हता. क्लब मधील अमरचे वागणे नॉर्मल असल्याचे त्याच्या साथीदाराचे म्हणणे होते. तो नऊच्या सुमारास क्लब मधून निघाला व दहा मिनिटातच भोसलेंवर हल्ला झालेला होता. त्याची दुचाकी भोसले साहेबांच्या कॅबीनपासून थोड्या अंतरावर साइड स्टँडला लावलेली सापडली होती.



दोनच शक्यता मेजरला वाटत होत्या.
एक- अमरने हल्लेखोराला पाहिले असावे व त्याला रोखण्याच्या प्रयत्नांत तो जखमी झाला असावा व त्याचा मोबाईल झुडुपात पडला असावा
किंवा अमरनेच भोसलेंवर गोळी झाडली असावी.
दुसरी शक्यता खूपच धूसर होती कारण मोबाईलचे तिकडे पडणे, रक्त, तसेच मुख्य प्रवेशद्वारावरच्या पहारेकऱ्याने २१.१० ला त्याच्या दुचाकीची 'इन' अशी केलेली नोंदही हेच दर्शवत होती की तो आंत आलेला होता. त्यातही जर अमरने हल्ला केला असता, तर तो लपून राहिला नसता.
पहिली शक्यता गृहीत धरल्यास अमरचे काय झाले हा प्रश्न भेडसावत होता. अमर म्हणजे लहान मूल नव्हते की त्याला कोणी बखोटीला उचलून नेईल. अमरनेच मारेकऱ्याशी झटापट केली असली व तो बेशुद्ध झाला असला तरी त्याला त्या अवस्थेत लांबवर व तेही सुरक्षतेच्या वेढ्यातून, आलार्म वाजत असताना बाहेर काढणे कठिण होते.
ह्याचा अर्थ आतल्या गोटांतल्या कोणीतरी व्यक्तीने हल्ला केला असावा किंवा मारेकऱ्याला सामील असावे ह्या विचारापर्यंत मेजर आलेला होता.


कुमारला बरोबर घेऊन तो परत एकदा जेथून गोळी झाडण्यात आली त्या भागाच्या परीक्षणासाठी निघाला. बारकाईने प्रत्येक इंचाचा त्याने तपास सुरू केला. सेंट्रींची रोजची पहारा देण्याची पद्धत व पोझिशन त्याने समजावून घेतली.... अमरचे गायब होण्यामागचे गूढ वाढतच चालले होते.
बागेत व हिरवळीवर कुठूनही जड वस्तू फरफटत नेण्याच्या खुणा दिसत नव्हत्या. जणू काही अमरला संमोहित करून स्वतःच्या पायावर चालत कोणीतरी घेऊन गेले होते.... मेजर दीपक ह्याच गोष्टीचा विचार करीत होता, नेऊन नेऊन त्याला नेतील कुठे ?


अचानक त्याच्या डोक्यांत विचार आला, "कुमार लेट्स चेक धिस बिल्डिंग इटसेल्फ"
बऱ्याच खोल्या नीट तपासल्यावर तो रेकॉर्ड रूम जवळ आला, रेकॉर्ड रूम चे अंगचे कुलूप असलेले दार फक्त खेचलेले आढळले. दरवाजा उघडून आत शिरल्यावर रॅक्सवर तेथे विविध फायली साठवून ठेवल्याचे दिसत होते.
नागमोडी वळणे घेत कुमार पुढे चालत असताना त्याने समोर अमरला जमीनीवर वेडावाकडा पडलेला पाहिला.......
"सर हि इज हिअर !" त्याच वेळेला मेजर भावे त्या खोलीच्या मागून उघडणाऱ्या दाराची काळजीपूर्वक तपासणी करीत होता. कुमारने दिलेली हाक ऐकताच तो धावतच अमर पडलेल्या ठिकाणी पोहचला.....
खाली गुढघ्यावर बसून त्याने अमरच्या गळ्याला कानाजवळ हाताने स्पर्श केला.......
"कॉल द अम्ब्युलन्स, हि इज अलाइव्ह".....
अमरला तातडीने वैद्यकीय सुविधांसाठी बेस इस्पितळात नेले गेले.
**************
"स्क्वा.लिडर गुप्ते,हाउ आर यू फिलींग नऊ ?" मेजरने अमरला विचारले
"बेटर....मी तुम्हाला..." अमर उठायचा प्रयत्न करीत बोलला.
"रिलॅक्स ! जॉब फर्स्ट, आपण कसे बेशुद्ध झालात ह्याची कल्पना आहे आपणांस?"
"नाही सर बट आय रिमेम्बर, मी एकदा शुद्धीत आलो होतो पण कदाचित रक्तस्त्राव जास्त झाला होता म्हणून परत बेशुद्ध झालो." अमर बराच वेळ आठवायचा प्रयत्न करून बोलला.
"एनी वे, टेक रेस्ट... आय विल सी यू टुमॉरो मॉर्निंग" इतके बोलून मेजर भावे भटिंड्याच्या बेस इस्पितळातून बाहेर पडला.


भोसलेंनी मेजरच्या सांगण्यावरून अमरच्या खोलीबाहेर हत्यारबंद शिपायांचा चोख पहारा ठेवला होता. इस्पितळाचा स्टाफ व बॅच असलेले आपले अधिकारी ह्यांखेरीज कोणालाही आत सोडायचे नाही अशी ताकीद त्यांना देण्यात आलेली होती.
मेजर सोबत कुमार सावली सारखा फिरत होता.
"सर, वुड यू माइंड स्टेइंग ऍट माय प्लेस?" कुमारने त्याला विचारले.
"नॉट ऍट ऑल, अनलेस यू फिल अनक्म्फर्टेबल !" -
कुमारचा स्वभाव त्याला आवडला होता. पोरगा मेहनती होता व मुख्य म्हणजे ऑफ द रेकॉर्ड काही चौकशी करावयाची झाल्यास तो बरीच माहिती देऊ शकला असता. त्याने अंबाल्याहून बरोबर आणलेल्या जीप चालकाची सोय एखाद्या बॅरेक मध्ये होऊ शकली असती.


रात्री कुमार बरोबर स्वागताचे पेयपान व मेस मध्ये बडाखाना झाल्यावर दोघे कुमारच्या घरी गेले.....
"कुमार, भोसलेंवर गोळी झाडण्याचे कारण काय असू शकेल ?"
"राडार जॅमर ओन्ली" कुमार गोंधळला होता.
"नो !, तेच जर फक्त कारण मारेकऱ्याकडे असते तर राडार जॅमरची इन्फॉर्मेशन कुठूनही काढता आली असती" 
"तुम्हाला काय वाटते सर ?"
"अजून कसलाच अंदाज करता येणे कठीण आहे.भोसलेंनी फाइल्स मधून कुणाला शॉर्टलिस्ट केले नव्हते, भोसलेंशिवाय- ऑफिशियली- कुणालाच राडार जॅमर कच्छला सापडल्याचे माहीत नव्हते. तुमचे कॉन्फिडेंशीअल मेसेजेस कसे येतात ?"
"एका एन्वलप मध्ये कोडींग केलेला मेसेज दिला जातो. डिकोडर्स सरांकडेच असतात - दर आठवड्याला डिकोडर्स बदलतात."
"फक्त त्यांच्याकडेच ?" मेजरला खरं काय ते कुमार कडून काढून घ्यायचे असेल.
"ऑफिशियली....." जरा चाचरत कुमार बोलला "सर तुम्हाला तर माहीतच आहे की, सबॉर्डिनेट्सवर विश्वास टाकल्याशिवाय कामेंच होत नाहीत.... ग्रुप कॅप्टन पुरींकडे काही वेळा हे मेसेजेस आधी जातात"
"पुरी माणूस कसा आहे ?"
"व्हेरी सिन्सीयर सर, ही इज स्ट्रिक्ट टू ! एक वेळ भोसले साहेब लेट गो करतील पण हे सोडायचे नाहीत"
" हम्म् ! " इतकेच बोलून मेजरने संभाषण थांबवले व तो विचार करू लागला.
***********************
झोप पूर्ण झाल्याने मेजर फ्रेश दिसत होता. दिल्ली ते अंबाला चॉपरने व पुढे भटींडा पर्यंत जीपचा प्रवास थकवा देणारा होता. कुमारने त्याची बडदास्त घरच्यासारखी ठेवली होती. तयार होताच त्याने सर्वप्रथम जीपने कुमारला त्याच्या बेसवर सोडले व मग इस्पितळाकडे वळला.


"मॉर्निंग सर !" अमर बराच सावरलेला दिसत होता.
"मॉर्निंग 'मर" हुबेहूब त्याचाच आवाज व ढब घेत मेजरने अमरला चकीत करून सोडले !
"व्वा, आपण तर चांगलेच कलाकार आहात !"
"पण बॉक्सर नाही... हे सांग तू इतका सॉलिड बॉक्सर असून काल मार कसा खाल्ला ?"
"काल नव्हे परवा.... मी साफ बेसावध होतो. सरांच्या कॅबीन मध्ये दिवा चालू असणे नवलाचे नव्हते, पण मला दुचाकीच्या दिव्याच्या प्रकाशात त्यांच्या खिडकीजवळ कोणीतरी उभे असल्याचा भास झाला. मी पटकन दुचाकी उभी करून जवळ पोहचतो तोवर कोणीतरी मागून माझ्या डोक्यांत फटका मारला.... पुढचे मला काहीच आठवत नाही."
"अमर, केंव्हाही बारीक तपशील जरी आठवला तरी कोणाला सांगण्यापूर्वी मला सांग....हवी तर ही ऑफिशयल इंन्स्ट्रक्शन समज !"
"सर्टनली सर, आय विल ओबे इट"
"नऊ रिलॅक्स अँड गेट रिकव्हर्ड फास्ट- " अशा शुभेच्छा देऊन तो बेस कॅम्प कडे यायला निघाला.


ग्रुप लिडर पुरींचा आज इंटरव्ह्यू घ्यायचा विचार त्याच्या मनात घोळत होता.
"मे आय कम इन सर?" "कम इन प्लीज मेजर" पुरी त्याच्याकडे कपाळावर आठ्या घालून म्हणाले.
"सर, आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते, इफ यू परमिट"
"मेजर कॅन वी मीट सम अदर टाइम ? आय हॅव सम इम्पॉर्टंट असाइंन्मेन्ट जस्ट नऊ"
दिपकने रागाचा आवंढा गिळला- "यू सजेस्ट मी द टाइम सर, एअर रेड खात्याच्या विनंतीवरूनच तर माझी येथे पाठवणी झाली आहे." खुर्चीवर बसलेला मेजर शांतपणे उठून दारापर्यंत पोहचला- तो काय बोलला ते पुरींच्या उशीरा लक्षात आले. "सॉरी मेजर, यू मे कंटिन्यू, आय विल को-ऑपरेट"
एक विजयी हास्य फेकत मेजर त्यांच्या समोरच्या खुर्चीवर परत येऊन बसला. "सर, भोसलेंवर गोळी झाडल्यावर तुम्ही सर्वप्रथम घटनास्थळी पोहचलात !" मेजरने त्याच्या ढंगात सुरुवात केली "यस मेजर, सो ?"
"सर, एव्हिएम वर हल्ला झाल्याचे वृत्त आपणांस केंव्हा कळले ?"
"जेंव्हा मी त्यांच्या कॅबीन मध्ये पोहचलो तेंव्हा ! मी येथे धावत आलो तो आलार्म ऐकून"
"फुल युनिफॉर्म मध्ये ?" अमरने जरा अविश्वास दाखवतच म्हटले. "यस सो ?"
"सर, आपल्या घरापासून बेस ऑफिस दहा मिनिटांच्या अंतरावर आहे, आलार्म वाजल्यावर आपण हातातले काम टाकून येथे पळत आलात तरी ७ मिनिटे लागणारच......" "मे बी, आय हॅव नॉट कॅलक्युलेटेड द टाइम"
"मे बी...., मी आलार्म किती वेळ वाजला त्याचे लॉग बूक चेक केलंय सर, द टाइम मॅचेस नेक टू नेक"
"थॅंक्स, कमीत कमी वेळ जुळतोय ते महत्त्वाचे आहे."
"मे आय वुइथ युअर काइंड पर्मीशन....आपल्या ऑर्डर्लीला काही प्रश्न विचारू शकतो ?" मेजरने खडा टाकला.
"हि वॉज ऑन लिव्ह दॅट इव्हिनींग मेजर, बऱ्याच दिवसांपासून तो त्याच्या भावाला भेटायला जायचे म्हणत होता, त्या दिवशी खास काही काम नसल्याने मी त्याला रिलीव्ह केला."
"देन देअर इज नो पॉंईंट" इतके बोलून मेजर खुर्चीवरून जाण्यास उठला, दाराजवळ पोहचताच मागे वळून बोलला, "सर, बाय द वे, रेकॉर्ड रूम नेहमीच उघडी असते का?"
"आय डोन्ट नो डियर, यू मे चेक इट वुइथ सुपर्व्हायजर इन्चार्ज"
"आणी रेकॉर्ड रूमचा मागचा दरवाजा जो बागेत उघडतो, तो ?"
एक क्षण पुरी मेजरच्या तोंडाकडेच पाहतं राहिले..... मेजर उघड्या दरातून बाहेर जाईपर्यंत ते बघतच राहिले.


भोसलेंवरच्या हल्ल्यात पुरींचा सहभाग होता की नाही ते शोधल्यावर सापडले असते परंतू पुरी एक गोष्ट खोटं बोलल्याचे मेजरच्या लक्षात आले होते. आलार्म खूप वेळ म्हणजे २० मिनिटे तरी वाजला होता हे स्वत: भोसले व ऑपरेटर्स नी त्याला सांगितले होते. कुठेतरी पाणी मुरत होते हे नक्की.


क्रमशः......