'दिल जो न कह सका'- संपन्न संगीतानुभव

संगीतकार अनिल विश्वास यांच्या 'माधुर्य' परंपरेतील ( 'मेलडी' स्कूल ) एक प्रमुख शागिर्द संगीतकार रोशन यांच्या हिंदी चित्रपटगीतांवर आधारित 'दिल जो न कह सका' हा कार्यक्रम काल रात्री पुण्यात झाला. उपजत गुणवत्ता, वाद्यांवरची हुकुमत, शास्त्रीय संगीताची तयारी, अर्थपूर्ण काव्य देणारे शायर आणि रफी, लता, आशा, मुकेश, तलत असे उपलब्ध असलेले एकाहून एक सरस गायक या सगळ्याच्या आधारावर रोशनचं संगीत कमालीचं श्रवणीय बनून राहिलं आहे. यात सर्वाधिक वाटा अर्थातच रोशनच्या गुणवत्तेचा आणि मेहनतीचा. पण अवीट गोडीचं संगीत देणाऱ्या या संगीतकाराच्या माथी देखील 'आर्थिक दृष्ट्या अपयशी'  असाच शिक्का बसला आहे.  अर्थात यामुळं रोशनचं मोठेपण कमी होत नाही, हा भाग वेगळा.

अशा मनात घर करून राहिलेल्या गाण्यांचे कार्यक्रम ऐकण्यामध्ये एक मोठा धोका असतो. ही गाणी सादर करणारे गायक-वादक जर तितक्या तयारीचे नसतील, तर आपल्या मनातल्या त्या गाण्यांच्या प्रतिमेलाच तडा जाण्याची शक्यता असते. म्हणूनच की काय, पण रोशनच्या संगीताच्या शिवधनुष्याला हात घालण्याचं धाडस आजपर्यंत कुणी केलेलं नव्हतं. 'हमलोग' ने सादर केलेल्या या कार्यक्रमात विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार आणि प्रमोद रानडे हे तर परिचित आणि तयारीचे कलाकार होते. प्रशांत नासेरी हा बाकी मी न ऐकलेला गायक. म्हणून तो रफीचा आवाज कसा काय पेलेतो ही उत्सुकता होती.

(पुण्याच्या परंपरेनुसार) वीस मिनिटं उशीरा पडदा बाजूला गेला आणि निवेदिका मंजिरी धामणकरनं सूत्रं हाती घेतली. निवेदक या जातीला मी पत्रकारांपेक्षा जास्त घाबरतो. तलतच्या गाण्याचे श्रीकांत पारगावकरांचे कार्यक्रम मी इतक्या वेळा ऐकले, पण प्रत्येक वेळी त्यातला निवेदक स्वतःच पायात चाळ बांधून तलतच्या आवाजाला फरफटत नेतोय असं वाटलं होतं. मंजिरीनं बाकी 'दोन रेशमी सुरावटींमधली एक सुरावट' ही भूमिका अतिशय सुरेख बजावली. 'चित्रलेखा' च्या 'मन रे तू काहे ना' चा पहिला आलाप प्रशांतच्या स्वरात ऐकला आणि अंगावर काटा उभा राहिला. 'कारवाँ गुजर गया' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मंगेश तेंडुलकरांनी म्हटलंय,' जी माणसं १९५० ते १९७० या काळात इथल्या चित्रपट संगीताशी पार गाण्यापासून ऐकण्यापर्यंत संबंधित होती, ती संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात सर्वाधिक भाग्यवान असावीत'. त्याची प्रचिती यावी अशी ही गाणी. त्यानंतरचं विभावरीनं म्हटलेलं 'हमलोग' मधलं ' छुन छुन छुन बाजे पायल मोरी' ही असंच रंगलं. त्या मानानं प्रमोदचं 'अनहोनी' मधलं 'मैं दिल हूं इक अरमान भरा' हेच फिकं वाटलं. तलतच्या आवाजाचा बाजच वेगळा आहे. ती प्रयत्नानं साध्य होणारी गोष्ट नव्हे. तो परीसस्पर्श अल्लातालाच्या घरूनच व्हावा लागतो.


त्यानंतरचं' सुन बैरी बलम' हे राजकुमारीचं गाणं मधुरानं कमालीच्या ठसक्यात म्हटलं. त्यातला 'इब क्या होगा' मधल्या 'इब' चा नखरा तिनं जोरदारपणे सादर केला. 'हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, खुदा करे के कयामत हो और तू आये' 'बहू बेगम' मधलं हे जोरदार गाणं, प्रशांतचा दाणेदार मनमोकळा स्वर, 'कयामत या शब्दावर त्याने सहीसही घेतलेली फिरकी.. व्वा!


प्रसाद गोंदकरच्या हातात जिवंत झालेल्या सतारीतून बाहेर पडलेल्या स्वरलडींनी 'टिळक स्मारक' चं छप्पर कुठल्याकुठं उडवून दिलं आणि आषाढसरींच्या जोडीनं 'कलावती' चे सूर प्रेक्षागृहात बरसू लागले.
'काहे तरसाये..
जियरा
काहे तरसाये..'
'चित्रलेखा' मधील ही अवीट सुरावट मधुरा आणि विभावरीने ज्या तयारीने सादर केली त्याला जवाब नाही!
नंतर तर एकाहून एक गाण्यांची चुरसच सुरु झाली. 'बावरे नैन' मधलं मुकेशनं सैगलच्या शैलीत गायलेलं ' तेरी दुनिया में दिल लगता नही', 'अजी बस शुक्रीया' मधलं गोड 'सारी सारी रात तेरी याद सताये' 'रागरंग' मधील यमनची पारंपारिक बंदिश  'एरी आली पियाबिन'..


रोशनच्या गाण्याचं कव्वाली हे एक मोठं आकर्षण असतं. त्यात मधुराच्या आवाजात 'दिल ही तो है' मधली 'निगाहें मिलाने को जी चाहता है' ऐकणं म्हणजे म्हणजे मेजवानीच. तिनं पहिला आलाप घेतला आणि टाळ्या आणि शिट्ट्या यांनी 'टिळक स्मारक' दणाणून गेलं
'राज की बात है, महफिल में कहें या न कहें
बस गया है कोई इस दिल में , कहें या न कहें'  ...


या गाण्याचा कैफ जरा कमी होतो न होतो तोवर विभावरी आणि प्रमोदनं 'मल्हार' मधलं 'कहाँ हो तुम जरा आवाज दो' हे विलक्षण आर्त पण सुमधुर गाणं सुरु केलं. हे मला वैयक्तिक अतिशय आवडणारं गाणं. त्यातल्या लता-मुकेशच्या सुरावटींनी हृदय पिळवटून निघतानिघताच 'आरती' मधल्या 'आपने याद दिलाया..' चे सूर खुणावु लागले!


एकाच गायकाची, एकाच गीतकाराने लिहीलेली, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेली आणि एकाच रागातली दोन गाणी किती भिन्न परिणाम साधून जातात याचं उदाहरण म्हणजे या कार्यक्रमात सादर झालेली मन्नाडेंची साहिरने लिहिलेली भैरवी रागातली रोशनची दोन गाणी. 'फुल गेंदवा ना मारो' हे विनोदी अंगाचं गाणं आणि सदाबहार 'लागा चुनरी में दाग'. प्रमोदने जबरदस्त तयारीने ही गाणी गायली. आता यातल्या 'लागा चुनरी में दाग' ला, त्यातल्या तबला व सतारीच्या तुकड्यांना व तराण्याला 'वन्स मोसर' मिळाला हे सांगायला नकोच.


त्यानंतर सादर झालेली पाच गाणी केवळ डोळे मिटून ऐकत रहावी या दर्जाची. 'कारवाँ गुजर गया..(नई उमर की नई फसल)','दिल जो न कह सका ( भीगी रात )', अब क्या मिसाल दूं..(आरती)','एरी मैं तो प्रेमदिवानी (नौबहार)' आणि 'बहारोंने मेरा चमन लूटकर (देवर)'. त्या मानानं त्यानंतरचं 'ममता' मधलं 'इन बहारोंमें अकेले ना फिरो' आणि 'रागरंग' मधलं 'यही बहार है' दुय्यम वाटलं.


बेफिकीरीने सिगारेट्चा धूर फेकणारा तरणाबांड देखणा राज कपूर आणि त्याभोवती पिंगा घालणारी त्याची प्रिया यांच्यावर चित्रित झालेलं 'बावरे नैन' मधलं 'खयालोंमे किसीके', रोशनच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने ध्वनीमुद्रीत केलेलं 'अनोखी रात' मधलं 'महलों का राजा मिला..' ( यातलं 'ओहरे ताल' आणि 'मिलें ना फूल तो..' का नाही? मी स्वतःशी!),'ताजमहाल' मधलं अप्रतिम 'जो बात तुझमें है', 'बरसात की रात' मधलं शीर्षकगीत, 'चित्रलेखा' मधलं 'संसार से भागे फिरते हो' 'एको इफेक्ट' ने ध्वनीमुद्रीत केलेले 'ममता' मधले 'रहे ना रहे हम' अशी लागोपाठ गाणी ऐकली आणि तृप्त झालो. रात्रीचा पाऊण वाजला होता. या आकंठ मेजवानीनंतर 'आता फक्त एक मघई जोडी...' ही फर्माईश पूर्ण केल्यासारखी हार्मोनिअमवर एक स्वरमाला उलगडली आणि प्रमोदनं आपल्या कसलेल्या आवाजात सुरुवात केली...


'ना तो कारवाँ की तलाश है
ना तो हमसफर की तलाश है..'

' बरसात की रात' मधली ही कव्वाली म्हणजे दंगाच. एकीकडे आशा व सुधा मलहोत्रा मागणी करत असतात..

'जो दवा के नाम पे जहर दे
उसी चारागर की तलाश है...'


हां, हां.. या हसिनांच्या शब्दांवर विश्वास नका हं ठेवू, साहिर मध्येच बजावतो. यांचं काय, आज एक आणि उद्या एक...


'नाजो-अंदाज से कहते के जीना होगा
जहर भी देते हैं  तो कहते हैं के पीना होगा
जब मैं पीता हूं तो कहते है के मरता भी नही
जब मैं मरता हूं तो कहते है की जीना होगा'


अपेक्षेप्रमाणे ही कव्वाली रंगतच गेली. शिट्ट्या, टाळ्या आणि पावलांनी धरलेला ठेका यांनी प्रेक्षागृह दुमदुमून गेलं. प्रशांतचा आवाज टिपेला पोचला..


'इन्तेहा है ये के बंदे को खुदा...
करता है इश्क...'

प्रचंड कडकडाटात पडदा सरकत मध्यभागी आला. एका सुरेल, संपन्न स्वरसंध्येची सांगता झाली!