स्फोट, रेल्वे पोलीस आणि अश्लील एम.एम.एस.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत रेल्वे पोलिसांनी आधुनिक यंत्रणांचा वापर करून स्वतःच्या मोबाईलमध्ये अश्लील एम. एम. एस. डाउनलोड करून घेतलेल्यांना रेल्वे स्टेशनात पकडून शिक्षा करणे, मोबाईल जप्त करणे हे प्रकार सुरू केले होते. आता या प्रकरणाशी रेल्वे पोलिसांचा काही संबंध आहे का?
आणि जर इतकी प्रगत यंत्रणा हे पोलीस उभारू आणि वापरू शकत असतील तर दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आर. डी. एक्स. चा साठा सापडलेला असताना, मराठवाड्यात पकडलेल्या अतिरेक्यांकडून मुंबईत घातपात घडवून आणण्याच्या बेताचा सुगावा लागलेला असताना त्याविरुद्ध काही यंत्रणा का उभारता येऊ नये?
किमान अशाप्रकारे नको ती मॉरल पोलिसींग करण्यापेक्षा, संशयित प्रवाशांवर लक्ष ठेवणे , संशयित सामानाची तपासणी करणे यासाठी ही पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षमरीत्या वापरता येणार नाही का?
महिलांच्या डब्यात नको तितके फेरीवाले चढत असताना, समोरच्या जाळीच्या खिडकीतून पुरुषांचा डब्यातील नालायक शेरेबाजी करत असताना लांबच्या सीटवर बंदूक आडवी ठेवून दरवाज्यात निरिच्छपणे उभे असलेल्या गार्डला मी खूपदा बघितले आहे. त्यापेक्षा डब्यात अधुनमधुन फेऱ्या मारणे, फेरीवाल्यांना हुसकणे , शेरेबाजांना दम देणे , संशयित सामानावर लक्ष ठेवणे ही कामे गार्ड करू लागले तर काही बिघडेल का?
एकंदर आहे ती यंत्रणा योग्य पद्धतीने आणि योग्य कामासाठीच वापरली तरी खूपसे अनर्थ आपण टाळू शकतो असे मला वाटते.
साती काळे.