जेंव्हा पुरूषांना दिवस जातात...

ही श्री. पद्माकर कांबळे यांची कविता आहे. साहित्यिक मेळाव्यात गाजलेली आहे. मला आवडली म्हणून आपल्या आस्वादासाठी इथे देत आहे. कवी श्री. पद्माकर कांबळे आहेत मी फक्त 'लमाण' आहे.


---------------------------------------------------------


राज्य हे स्त्रियांचे आहे, पुरूषांना इथे मत नाही,
बायको समोर नवऱ्याला या पुढे किंमत नाही.



मी काय नविन सांगतोय?, तुम्हीही हे पाहातच आहात,
माझ्या प्रमाणेच तुम्हीही एक, गरीब बापुडे नवरे आहात.


जगच हे असं आहे, काय घडेल सांगता येत नाही,
घडलं तेच असं आहे, कुठं कांही बोलता येत नाही.



तुम्हाला म्हणून सांगतो आहे, कुणाला हे सांगू नका,
सौ. नेच मला हे सांगितलय, तिला तरी सांगू नका.


स्त्रियांचीही युनियन होती, त्यांचही मागणं होतं,
इतके दिवस तुम्हाला, मला, हे कुठे माहित होतं.



पुरूषांना मुलं झालीच पाहिजेत, त्यांचा म्हणे नारा होता,
ब्रह्मदेवाच्या बंगल्या समोर त्यांचाही म्हणे घेराव होता.


देवही आता कबूल झाला, त्याचा म्हणे नाइलाज झाला,
परवाच म्हणे देवसभेत एक कायदा पास झाला.



बायकांना आता मुली होतील, पुरूषांना फक्त मुले होतील,
त्यांच्या प्रमाणेच आपली आता बाळंतपणे सुरू होतील.


एवढंच आता बरं होईल, सुट्या आपल्याला भरपूर मिळतील,
डिंक, मेथी, अळीव यांचे लाडू आता खायला मिळतील.



दोन महिने जरा तरी, खाटेवर आता पडता येईल,
चांगलं तुप खायला मिळेल, शेक-शेगडी घेता येईल.


मलाही हे वाटत होतं, सौ. ची ही थाप असेल,
असं कधी घडणार नाही, हे सगळं खोटं असेल.



पण, परवा जेंव्हा उठल्यावर, मला पुन्हा चक्कर आली,
तेंव्हाच म्हंटलं मनात मी, कांहीतरी भानगड झाली.


ह्याच्या आधी उलट्यांमुळे, घरात आनंद होत होता,
आता मात्र माझ्यामुळे, चेहरा माझाच गंभीर होता.



मलाच त्रास होत असेल, असं मला वाटलं होतं,
शेजारच्या बंडोपंतांकडे, असंच अगदी घडलं होतं.


त्यांचे म्हणे डोहाळे, फारच हो कडक होते,
खाणं सोडा कांही पण, पाणी सुद्धा पित नव्हते.



त्यांचे तेच जाणोत, त्रास किती होत होता,
पण दरवर्षी त्यांचा म्हणे, पाळणा तरी हलत होता.


या उलट शामरावांकडे, आणखिनच कठीण होते,
त्यांच्याकडे एकदमच, दोघांनाही दिवस होते.



डॉक्टरांनी त्यांना म्हणे, एकच तारीख दिली होती,
सौ. आधी की शामराव आधी, एवढीच फक्त काळजी होती. 


तिसरा महिना चालू होता, सौ. मात्र आनंदात होती,
मला माझी पहिली पँट, आता मात्र होत नव्हती.



तरीही मी कुणाजवळ, अजून 'हे' बोललो नव्हतो, 
सौ. ला सुद्धा कळू नये, काळजी त्याची घेत होतो.


पण काल जेंव्हा खिशात माझ्या, कैरीची फोड 'हिने' पाहिली,
तेंव्हा मात्र गोड शब्दात, ती मला दटावू लागली.



'लबाड कुठले, इतके दिवस, मला कधी बोलला नाहीत.
पण, म्हंटलं अशा गोष्टी, जास्त दिवस 'लपत' नाहीत.'


पदराआड तिच्या मी, तेंव्हा इतका लाजलो होतो,
आयुष्यात पुन्हा मी, इतका कधीच लाजलो नव्हतो.



वाऱ्यासारखी बातमी ही, सगळीकडे पसरू लागली,
भेटीसाठी माझ्या आता, मित्रमंडळी येऊ लागली.


घरामध्ये गडबड होती, नातेवाईक येत होते,
बाळंतपणा आधीच माझ्या, दिवाळं माझं काढीत होते.



आठवा महिना सुरू झाला, डोहाळजेवण करायचं होतं,
कसं, कुठे, काय, केंव्हा, अजून हे ठरायचं होतं.


शेजारी म्हणे, 'नावेत करू', सौ. म्हणाली, 'बागेत करू',
मी म्हंटलं, 'कुठं जाता?, आपण आपलं घरीच करू'.



दिवस माझे भरत आले, मला आता बसवत नव्हतं,
बाळंतपणाच्या रजेसाठी ऑफीसमध्ये लिहीलं होतं.


माझ्या आधीच चौघांनी, नंबर तिथे लावले होते,
हेडक्लार्कचे आमच्या म्हणे, डोहाळे फार विचित्र होते.



फाईलमध्येच बसत होता, शिसपेन्सीली खात होता.
मला वाटतं मुलगा त्याला, नक्कीच काळा होणार होता.


साहेबांना जेंव्हा म्हणालो मी, 'रजा मला हवी आहे'
ते म्हणे, 'मिळणार नाही, माझीच आता शक्यता आहे.



दोन महिने झाले तरी, अजून मी 'बसलो' नाही,
खात्री नव्हती माझीच मला, म्हणून कुठे बोललो नाही   


सगळेच चालले रजेवर तुम्ही, ऑफिस माझं चालणार कसं?,
इयरलीच्याच वेळेस तुम्ही बाळंतपण असं काढता कसं?'



'आपण काय करणार, सर?, कर्ता करविता तो आहे,
बाळंतपणाशिवाय आता आपल्या हातात काय आहे?


आधीच दोन मुली आहेत, आता मुलगा हवा आहे,
एवढं आता झालं की, ऑपरेशनच करणार आहे.'



त्याच एका अटीवर, रजा आता मिळाली होती,
खाणं, पिणं, फिरणं आणि विश्रांतीची चालू होती.


धन्य झाली बायकांपुढे, काय त्यांच्या मागण्या होत्या,
नऊ महिन्यांच्या नऊ पँट्स, मला शिवाव्या लागल्या होत्या.



पुरूषांच्या या बाळंतपणाने, दोघांचा मात्र फायदा होता,
डॉक्टर आणि शिंपी यांचा, धंदा मात्र वाढला होता.


सौ. मात्र आपुलकीने, काळजी माझी घेत होती,
पहिले माझे डोहाळे, ती, प्रेमाने पुरवत होती.



कळा आता सुरू झाल्या, सौ. ला म्हंटलं, 'टांगा आण,
नाडकर्णींला बाजूच्या, सोबतीला माझ्या बोलावून आण'.


कसे होईल काय होईल, सारखे मला वाटत होते,
बाजूला माझ्या नाडकर्णी मात्र, धीर मला देत होते.



'पहिल्या खेपेला त्रास होतो, त्यात काय घाबरायचं'
मी म्हंटलं, 'नाडकर्णी तुम्हाला नाही कळायचं.


तुम्ही आधी लग्न करा, मग मला सांगा.'
तेवढ्यामध्ये दारापुढे, सौ. ने आणला टांगा.



रस्त्यात त्या इतके होते खड्डे, सारखे गचके बसत होते,
इथेच आपण 'होतो' की काय, सारखे मला वाटत होते.


कसे तरी पोहोचलो आम्ही, दवाखान्यात एकदाचे,
त्या वेळी वाजले होते घड्याळात, दोन म्हणे रात्रीचे.



दवाखान्यात आधीच माझं, नांव होतं नोंदवलं,
आल्या-आल्याच डॉक्टरांनी, पुन्हा मला तपासलं.


डॉक्टर म्हणे सौ. ला माझ्या, तुम्ही जा घरी आता,
सकाळ पर्यंत 'होतील' ते, इथेच राहू द्या त्यांना आता.



सौ. गेली घरी आणि, इकडे 'सुटका' झाली,
बाळाच्या त्या रडण्याने, मला एकदम 'जाग' आली.


दचकून केवढा उठलो मी, 'ते' सारं स्वप्न होतं,
बाजूला माझ्या दोन मुली, आणि 'कुटुंब' झोपलं होतं.


-oOo-