बहुतांशी पावसाळ्याचे दिवस.. तशी शाळा सुरू होवून महिना दीड महिना झालेला .. सहामाही परिक्षा अजून चार कोसावर असते.. त्यामुळे अभ्यासाचं फ़ार लोड नाही... सकाळ मधे 'गणपतीच्या मुर्ती बाजारात' अशी एक बातमी.. सार्वजनिक गणपती उत्सवाची वर्गणी गोळा करणारे कार्यकर्ते.. गणपतीच्या कार्यक्रमांची प्रॅक्टिस.. बाजारात विकायला आलेल्या सजावटीच्या वस्तू..हळू हळू चाहूल लागते गणेशोत्सवाची!
काहींकडे आधीपासून मूर्ती बुक केलेली असते.. काहींकडे खास पेण ला तयार केलेली मुर्ती त्यांचा तिथे राहणारा कोणी नातेवाइक खास त्यांच्यासाठी पाठवणार असतो.. तर क्वचित कोणी तयारही करतात म्हणे! मुर्ती कुठुनही आलेली असो.. दगडूशेठ टाएप असो वा मंडई.. किंवा मग साधी!! आपल्या मुर्ती वर कसं तेज आहे ह्याचा पु.ल.च्या भाषेत सांगायचं तर 'जाज्वल्य अभिमान' प्रत्येकाला असतो.. [ मी पुणेकरांविषयी बोलत आहे..] माझ्या घरी मात्र आधी बुक करण्याचं वगैरे करण्याचं प्लॅनिंग फ़ार क्वचितच होत.. नाही तसा आळशीपणा वगैरे नाही हो... 'जस्ट इन टाइम' म्हणून काय ते जॅपनीज मॉडेल आहे ते आम्ही पाळतो! आदल्या दिवशी ७ च्या सुमारास आमचं डेकोरेशन काय करायचं याचा विचार सुरु व्ह्यायचा.. तशा लागणाऱ्या सर्व गोष्टी गावातून आणलेल्या असायच्या.. पण तरी काही आयत्या वेळी त्या लिस्ट मधून निसटलेल्या काही सटर फ़टर गोष्टी असायच्याचं.. मग आयत्या वेळी हनुमान कडे धाव घ्यायची! आमच्या सहकारनगर मधे हनुमान नावाची दोन प्रोव्हिजन स्टोअर्स होती अगदी शेजारी शेजारी.. एका दुकानाचा मालक लंगडा होता त्यामुळे हनुमान आणि लंगडा हनुमान ओळखायला सोप्प! हनुमानकडे तस सगळच मिळायचं आणि त्याच्याकडे नसेल तर लंगड्या हनुमानकडे हमखास मिळायचं.. आणि हनुमान कायम उघडा असायचा. सकाळी सहा ते रात्री बारा..शिवाय सामान घरी पोस्त करायला त्याच्याकडे वानरसेनाही होती..सतर्क कस्टमर सपोर्ट च अगदी परफ़ेक्ट उदाहरणं. तर सजावट करताना एखाद दोन चकरा पडायच्याच हनुमानकडे! ..सर्वात शेवटी सजावटीसाठी एलेक्ट्रिक चि माळ निघायची माळ्यावरून .. त्यातले काही बल्ब गेलेले असायचे.. मग ते गेलेले बल्ब झिरमिळ्यांच्या,खोट्या फ़ुलांच्या मागे लपवत मोठ्या खूबीनी ती माळ लावयची... एकदम झकास.. शेवटी फ़कफ़कणाऱ्या माळेच्या प्रकाशात काय उठून दिसायचं ते डेकोरेशनं!
मग ती स्पेशल सकाळ उजाडते...आई सकाळी नाष्ट्याला भरपूर पोहे करून [जेणेकरून आता तीन चार तास कोणी स्वयंपाकघरात घुटमळणार नाही].. मोदक करायच्या मागे लागते.. थोड्यावेळाने आजूबाजूच्या घरातून कुकरच्या शिट्टयांबरोबर घंटा आणि झांजांचे आवाज यायला लागतात!.. 'गणपती बाप्पा मोरया' ही ऐकू यायला लागतं .. म्हणजे कूणाकुणाकडे आधीच मुर्ती घरी आणलेली असते.. आमच्या बांबाची अंघोळ मात्र राहिलेली असते.. पण आई चा पारा चढायच्या आत ती होते..मग आम्ही निघतो गणपती आणायला.. लहान पणी जितक्या सहजतेने आरोळ्या द्यायचो तितक्या सहज ते आता जमायचं नाही [ टीनएज मधे कशाची लाज वाटेल सांगता येत नाही].. म्हणून मग शेजरपाजरच्या बच्चे कंपनीला घ्यायचं बरोबर अरोळ्या द्यायला.. आता निघणार तेवढ्यात आजीच्या लक्षात येतं बाबांच्या डोक्यावर टोपी नाही ..जागेवर ठेवलेली 'कापडी टोपी ' कुणास ठाऊक कशी पण जागेवर नसते..शेवटी समोरच्यांकडून आणली जाते.. दुकनातून मग एक छानसी तेजस्वी मुर्ती सिलेक्टकरतो.. आणि वाजत गाजत गणपती बाप्पा घरी येतात..हा सर्व सिक्वेन्स दर गणपतीत अगदी न चुकता होतो.. मग इतका वेळ ज्याची आतुरतेने वाट पाहिली तो क्षण येतो.. ते पहिल्या दिवशीचे 'मोदकाचे जेवण'..मोदकची वरची टोपी उघडून त्यावर तूपाची धार सोडायची..आणि मग त्या तुपाचा एकही थेंब खाली पडू न देता गडप करायचा.. तुडुंब जेवण झाल्यावर एक चक्कर टाकायची सोसायटीच्या मांडवावर. पण तिकडे सगळं थंडच असायचं.. साधारण चार च्या सुमारास ढोल ताशाचे आवाज दुर कुठेतरी ऐकू यायचे. मधेच एकदम आमच्या सोसायटीत कोणीतरी ताशा टिमटिमायचं.. मग तिकडे लगेच धाव घायची. मुलं आधीच येऊन ढोल ताशाचं टेस्टिंगकरत असायची..मग ढोल वाजवणारे लोक सुरु करायचे.. एकदम स्पुरण चढायचं .. मुलांचा गणपती डान्स सुरु झालेला असायचा.. एकदम दिमाखात सोसायटीच्या गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची.
आता रोज घरची आरती.. कधी शेजारी पाजारी ही जायचं आरतीला शिवाय सोसयटीची आरती असायचीच. पण वेगवेगळ्या घरातली माणसं एकत्र आली की आरती एकसारखी होणं मुश्कील.. प्रत्येकाच्या काही काही ऍडिशन्स असतातं म्हणजे.. पुस्तकात असतं 'केशवाची नामदेव भावे ओवाळिती'.. मग तिथे कुणाकोणाचं 'केशवाची नामदेव माधवाची नामदेव' असतं.. किंवा 'आशाढी कार्तिकि भक्तजन येती' तर कोणाला साधुजन ही आणायचे असतात.. त्यामुळे 'भक्तजन येती हो साधुजन येती' ..'ते तू भक्तालागी पावसि लवलाहि' ..कुणाच्या मते फ़क्त भक्ताला नाही तर दासालाही देवी पावते.. म्हणून मग 'ते तू भक्तालागी ते तू दासालागी'.. 'क्लेशापासून सोडवी' .. पण काहींना नुसत्या क्लेशातुन नाही दु:खातुनही सुटायचं असतं.. त्यांमुळे 'क्लेशापासून सोडवी दु:खापासून सोडवी' असे एक ना अनेक ओळींवर आरती दुमत होवून ती आरती अडखळते.. काही डॉमिनेटिंग भक्त आपली ओळ इतक्या ठामपणे म्हणतात की इतरांना ऍडजस्ट करावचं लागतं... आरत्या म्हणून झाल्या की एक लांब ओम् येतो .. आणि सुरू होते 'मंत्रपुष्पांजली'. मग इतक्या वेळ म्हणायचे म्हणून आरती करणारे पण खडबडून जागे होतात. प्रत्येक जण स्वत:च्या सुरामधे हेल काढायला लागतो. ती म्हणत असताना आपण एक मोठे संस्कृत पंडित असल्यासारखं वाटायला लागतं.. कोणाचेही आकार ऊकार एकमेकांशी जुळत नाहीतं. असे 'हेलकावे' देतं शेवटच्या ॐ शांति शांति शांति ला सगळे एकत्र येतात.. तो गोंधळ ऐकून गणपती म्हणत असेल उद्यापासून नुसती फ़ुलं वाहिली तरी चालतीलं..
हे दहा दिवस विविध गुणदर्शनांनी प्रत्येक जणं आपापल्या परीनी लाडक्या बाप्पाला खूष करायचा प्रयत्न करत असतो. कारण एरावी कुठे शाळेत कॉलेजमधे वगैरे चांन्स नाही मिळाला तरी आपल्या सोसायटीचा गणपती म्हणजे हक्काचा! तिथे सर्वांना आपली हौस भागवायचा पुरेपुर चांन्स मिळतो. खूप वर्गणी जमली असेल तर मग बाहेरचे प्रोफ़ेशनल कलाकारही येतात कधी कधी. पण खरा रंग चढतो तो मात्र लोकल कलाकारांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहानी! कुणी एकांकिका बसवत, त्यात कलाकारांपेक्षा प्रॉमप्टर्स जास्त असतातं. कधी कधी त्या हिट जातात ,पडदा पडताच टाळ्यांचा कडकडाट होतो .. तर कधी एकांकिका इतक्या पडीक असतात कि बाहेर कुठे केली असती तर पडदा लवकर पडावा म्हणून सुरवतीपासून टाळ्या पडल्या असत्या.. पण इथे 'लोकल मैदानात' ती भिती नसते! गाण्याच्या मैफ़िलीमधे गाणी रेटली जातात.. नवशिक्यांचा सोलो पेटी /सोलो तबला क्वचित व्हॉयलिन सहन केली जातात.. त्या वर्षी च्या गाजलेल्या गाण्यावर डांन्स असतो. तो कसाहि असला तरी हिट होतो . आणि हमखास वन्स मोअर मिळतो.. एखादी 'लोकल' विषयांवर कॉमेडी असते. इथे कधी बक्षिसासाठी चुरस नसते.. का खुन्नस नसते.. सर्वजण मनापासून जीव ओतून सादर करतात आपली छुपी कौशल्य....यात भाग घेणाऱ्यांमधे सर्वात उत्साही अर्थात तरूण वर्ग, त्यांनतर महिला वर्ग.. पुरुष वर्गात आजोबा लोकं काय ते थोडाफ़ार उत्साह दाखवत असतील.. पण वयवर्ष ३०-५० मधला पुरुष वर्ग मात्र 'इतरांना जास्तीत जास्तं सधी द्यावी' अशा थाटात वावरत असतो. स्वत:च्या अपत्याचा कार्यक्रम बघायला देखील मारून मुटकुन आलेला असतो... महिला वर्गासाठी पाककला,रांगोळी, प्लॉवर डेकोरेशन असतं.. ते कमी म्हणून शिवाय आपणहून काही नाच/नाटक बसवतात....किती तो मोह! पण 'बाबा' लोकं मात्र या मोहपाशात कधी अडकत नाहीत.. या ऐहिक सुखात त्यांना काही इंटरेस्ट नसतो..सुट्टीच्या वारी दुपारी जेव्हा या स्पर्धा रंगत असतात.. तेव्हा घरी राहून संथ लयीत घोरत ते सोफ़्यावर विराजमान झालेले असतात.. पुराणकाळातील त्या शेषनागावर विराजमान झालेल्या विष्णूसारखंच ..आणि मुख्य म्हणजे गणरायाच्या क्रूपेने त्यांची ही मॉडर्न 'शेषशाही' करायला कोणी उपस्थित नसतं..
पाहता पाहता अनंतचतुर्दशी येते.. मिरवणुक निघते.. सोसायटीच्या सर्व रस्त्यांवरून ती गेली पाहिजे असा सर्वांचा हट्ट पुरवला जातो.. गणपती साठी महिला वर्गानी रस्त्यावर रांगोळ्या काढून ठेवलेल्या असतातं काहींच्या घरापाशी मिरवणुक आली कि स्पेशल आरती होते.. पुढे ढोल तशाच्या तालावर बेभान झालेली तरूण मंडळी.. त्यामागे गुलालपासून दूर एक गोल करून त्यात टिपऱ्या,गर्भा करणारे महिला मंडळ .. भजनं, गाणी म्हणणारे भजनी मंडळ.. आणि सर्वात शेवटी... निवडणुका, शेअर्स, कंपन्यांचे राजकारण.. इत्यादि सामाजिक विषयांवर कुजबुजत असलेली बाबा मंडळी..खऱ्या अर्थान ती आता सार्वजनिक झालेली मिरवणूक वाजत गाजत लाडक्या मंगलमुर्ती चा निरोप घ्यायला निघते.. 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजराने वातावरण अजुनच भावूक होतं आणि मग त्या गजाननाला तिथून पाय काढणं अवघड होवून बसतं.. म्हणूनच बराच वेळ ती मिरवणूक रेंगाळत असते..मग मात्र इतर सार्वजिक गणपतींची गर्दी होवून पाण्यात ट्रॅफिक जॅम व्हायच्या आत बाप्पां जड अंत:करणानी सर्वांचा निरोप घेऊन आपल्या गावी प्रस्थान करतात.