ही सरिता रुसली..
ही सरिता रुसली, आज किनाऱ्यावरती.
-तु सदा कोरडा, मलाच नेहमी भरती!
घडविण्यास पाषाणाची ललाटरेषा,
ह्या असंख्य धारा अविरत त्यावर झरती.
ते तारु बुडले; अनेक वर्षे झाली,
पण हृदये त्यातील अजून जळावर तरती.
तो सुटला कोठे छंद पंडुपुत्रांचा?
-द्यूतात आजही पांचालीला हरती.
क्षितीजावर भास्कर जळास चुंबुन जाता,
लज्जेच्या रक्तिम लहरी लाटांवरती!
मन टाहो फोडे,नेत्र परी हे शुष्क,
-ह्या वृत्ती माझ्या भेद-भाव का करती?
-मानस६