एकदाच, पण असा भेट की वीज जशी झाडास भेटते
मरणांतीही उरेल स्मरणी, आलिंगन दे असे पेटते
एकदाच कर दंश असा की रक्ताने लाली विसरावी
जहर पसरता नसांत हिरवी जहाल धुंदी फक्त उरावी
एकदाच कर ह्रदय मोकळे, नकोस ठेवू मनात काही
प्रपात झेलुन कडे मिरविती तडे तसे मिरवावे मीही
एकदाच ये माझ्यामध्ये रसरसून तू असा, असा की
फळात अमृत भरता उरतो गंध फुलाचा केवळ बाकी
एकदाच समवेत तुझ्या क्षणमात्र जगावे, उधळुन जावे
मृतवत जितके श्वास ओढले, देणे त्यांचे फेडुन जावे...