तुला सांगतो भगवंता...

तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये!


वस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची
तेज-तमाच्या सीमेवरती जिवास उसवत बसू नये!


कशास मानत जावे आपण हुकूम कोण्या दुसर्‍याचे?
डावामधली पाने आपण पुन्हा पुन्हा का पिसू नये?


या विश्वाच्या हास्यमहाली आरसेच बेढब सारे
एकदुज्यांच्या प्रतिबिंबांना उगाच कोणी हसू नये!


रोजप्रमाणे रस्त्यावरती गाठ प्राक्तनाशी पडली
गोड बोलणे ऐकुन त्याचे आजतरी मी फसू नये...


अवचित येता जाग दिसावी रात अनावर पुनवेची
अशा पहाटे दुलई ओढुन प्राणसखीने रुसू नये!


जरी काळजी तुला फुलांची अंतत: बाजार खरा
लिलाव ज्याला असे नकोसा, जमीन त्याने कसू* नये!


वैर तुझे निर्मात्याशी वा वैर तुझे या कवनांशी?
वार करावा थेट उरावर, अभिव्यक्तींना डसू नये..


*'कसू नये' या काफियासाठी वैभवचे मनःपूर्वक आभार!