का तुम्ही?
रडायचे नाही असे ठरवले का तुम्ही?
आसवांनाही तसे सांगितले का तुम्ही?
का रे कोमेजल्या ह्या सुगंधाच्या बागा?
गंधाळल्या स्मृतीस हुंगले का तुम्ही?
मुक्यांचा संताप बोलका का बरे नाही?
त्यालाही आसवांनी विझवले का तुम्ही?
कधी झाली नाहीत सुखदु:खाची बोलणी
मग उपदेशाचे डोस पाजले का तुम्ही?
तसे आमचे नाते हिशोबाचेच होते
पण त्यातही जिव्हाळे शोधले का तुम्ही?
त्यांचाहि रंग एकवेळ बदलणार नाही
माणसांनो, कॅमेलियनाही हरवले का तुम्ही!
मी तीच उत्तरे देते असे कसे म्हणता?
निराळे प्रश्नहि कधी विचारले का तुम्ही?
-सोनाली जोशी
कॅ- हे अक्षर लघु/ गुरु कसे घ्यायचे?त्यानुसार मात्रात बदल करावे लागतील, शेर बदलावा लागेल.
सूचना व सुधारणांमुळे चांगले लेखन करता येईल.