माणसं

भृंग, लोंढा सोसवेना माणसांचा
अन् दुरावाही रुचेना माणसांचा

अजगरांना टाळता येते इथे पण
ह्या जगी विळखा सुटेना माणसांचा

सर्पसत्राचा भले संकल्प सोडू
दंश तो काही चुकेना माणसांचा

मानतो मी, बेट होणे ठीक नाही
एकही सेतू दिसेना माणसांचा

भेटतो तो बोलतो बाजारभाषा
शब्द कानावर पडेना माणसांचा

सांग मी गाठू कशी सम जीवनाची
सूर काही सापडेना माणसांचा

शर्थ केली जाळण्याची ईश्वराने
पीळ पण जळता जळेना माणसांचा

कण धुळीचा एक पुरतो आसवांना
प्रीतिने डोळा भिजेना माणसांचा

ब्रह्मदेवा, बांधसी गाठी कशा तू?
जन्मभर गुंता सुटेना माणसांचा

वाळवंटासम असे हे शुष्क घरटे
हाय, ओलावा मिळेना माणसांचा

ठेवतो अस्थीकलश आम्ही सुरक्षित
(होय, आत्मा सापडेना माणसांचा)