बुरख्यातला सूर्य

सौदी मधे जाताना मनात थोडी धाकधूक होती.  तिथे म्हणे बुरखा घालावा लागतो.  एकटं कुठे जाता येत नाही, बायकांना अजिबात स्वातंत्र्य नसतं….. आणि बरंच काही.  नाही म्हटलं तरी दडपण होतंच.

नवरा आधीच गेला होता तिकडे.   त्यानंतर तीन महिन्यांनी मी आणि मुलं पोचलो.  एअरपोर्टवर उतरलो तेव्हा सगळं भव्य दिव्य दिसलं.  मुंबईच्या एअरपोर्टशी आपण कुठल्याही International  एअरपोर्टशी तुलनाच करु शकत नाही म्हणा.  पण प्रथम दर्शनी तरी मला सौदी आवडलं. 

हळुहळु जेव्हा ह्या देशाची, त्यांच्या संस्कृतीची ओळख व्हायला लागली….तेव्हा वाटलं….. बापरे इथे ह्या लोकांच्या बायका कशा रहात असतील…! मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पाप केलं आणि ह्या देशात स्त्री जन्म मिळाला असेल.  इतकं रुक्ष आणि एकसूरी आयुष्य….! नंतर वाटलं…. कदाचित त्यांना ह्या आयुष्याची इतकी सवय झाली असेल की ह्यापेक्षा काही वेगळं आयुष्य असू शकतं ह्याची त्यांना कल्पना सुद्धा नसेल.  पण एक गोष्ट मात्र अगदी लगेच नजरेत भरते आणि ती म्हणजे त्या बायकांच्या अंगावर असलेलं सोनं.  अक्षरश: किलोकिलोनं सोनं  घालतात ह्या बायका.  हातात चमचमणार्‍या डझनावारी बांगड्‌या  बघून तर मला त्या सोनेरी बेड्‌याच वाटल्या.

इथे कुवेतमधे त्या मानाने बायका बर्‍याच स्वतंत्र आहेत.  सगळ्यात पहिले बुरख्याची सक्ती नाही.  बायका driving करु शकतात, नोकरी करु शकतात.  त्यामुळे इथे बायकांच्या चेहेर्‍यावर हसू दिसतं.

काल अचानक माझ्यासमोर अगदी टिपिकल सौदी बायका आल्या….. नवर्‍यासोबत अगदी दबून असलेल्या.  त्या नवर्‍याच्या चेहर्‍यावर इतकी मग्रुरी होती ना…..  जणू काय त्या सगळ्या बायका त्याची मालमत्ता होती आणि त्याला जसा हवा तसा वापर तो करु शकत होता.  त्या बायकांचे वाकलेले खांदे, झुकलेल्या नजरा बघून अगदी कसंतरीच झालं आणि मनात विचार आला…….

बुरख्याआडच्या वेदना… गुरफटून राहतात तशाच
सोन्याचा मुलामा चढवून…मिरवत राहतात अशाच
तेलाच्या खाणीतलं ऐश्वर्य जगापुढे दाखवताना
पैसा आणि मग्रुरीच्या कैफ़ात दुनियेला झुकवताना
दुर्लक्ष करतात……..
त्या काळ्या बुरख्याआड चिणून टाकलेल्या संवेदनांकडे….
दाबून टाकतात ते सारे उसासे.
छोट्याशा डोळ्यांच्या फटीतून… कावर्‍याबावर्‍या नजरा
भिरभिरत राहतात फ़क्त
सवयच होऊन गेलेली त्यांच्या उमाळ्यांना
दबून रहायची.
त्या छोट्याशा फ़टीतूनच अनुभवायची दुनिया.
बुरखे सुद्धा काळेच
पुरुषी अहंकारासारखे…!
कुठल्याही रंगाच्या भावनेला काळवंडून टाकणारे.
त्या उदासी आवरणाला आता रंगाचंच वावडं झालेलं…
फुलण्याची….खुलण्याची स्वप्नंच करपलेली….
वखवखलेल्या वासनेची पूर्ती…..हे एकच काम उरलेलं,
बुरख्यावरची जरतारी कलाबतूच काय ती थोडी हसते
बाकी सगळं भकास…..!
कधीतरी एखादी ठिणगी ह्या काळ्याशार अंधारात पेटून उठेल…
आणि उजळेल आसमंत थोडावेळ….!
अशी आशा तरी जागत असेल हा ह्यांच्या मनात….?
की ह्या अंधाराची सोबतच आता त्यांना हवीहवीशी वाटत असेल….
नुसतेच प्रश्न…..!
जितक्या जमिनी, तितकेच अंधार
पण उगवणारा सूर्य एकच.
तो कितीसा पुरणार सगळ्यांना….!
आता अंधारालाच पेटून उठावं लागणार आहे कधी ना कधी
फाडून टाकावे लागणार आहेत….स्वत:चे बुरखे स्वत:च
आणि जन्माला घालावा लागणार आहे आपला स्वत:चा सूर्य !