गीतकार कैफी आझमी-१

      कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. गावात 'हकीकत' नावाचा सिनेमा लागला होता. मला या सिनेमाविषयी काहीच माहिती नव्हते. युद्धपटांबद्दल बरे मत असावे असा चित्रपटही याआधी पाहिलेला नव्हता.पोस्टरवरची चित्रे, एकंदरीत कास्ट आणि संगीतकार मदनमोहन एवढं वाचून मी जायला निघालो. मित्र एकमेकांत 'अरे वो पैदाइशी बुढ्ढा आदमी है, उसकु जाने दो जिधर जाना है...' असं म्हणून 'तोहफा' बघायला गेले. 

      'हकीकत' मनात घुसून बसला. एकीकडे 'मस्तीमें छेडके तराना कोई दिल का' गात आपल्याच मस्तीत जीप हाकणारा तर दुसरीकडे आपल्या हाताखालच्या सैनिकाने भेट दिलेले, गावाकडच्या मातीत रुजलेले फूल 'तुझ्या बायकोने तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने पाठवले आहे, तर यावर तुझाच अधिकार नाही का' असे म्हणून त्या सैनिकालाच परत करणारा जिंदादिल अधिकारी विजय आनंद, एकीकडे प्रेमिकेनं नाकारलेली अंगठी, या अंगठीतच काहीतरी गडबड आहे बघ, जिला जिला द्यावीशी वाटली तिनं तिनं तिचा फक्त अव्हेरच केला...' असं म्हणून फेकून देऊन हसणारा तर दुसरीकडे आपण वाट चुकलो आहोत तर आपला शोध घेणं बंद होईल आणि आपले सैनिक तडफडून मरतील या कल्पनेनं हादरलेला कर्तव्यदक्ष अधिकारी बलराज सहानी, स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची खबर खांदे ताठ ठेवून ऐकणारा आणि अचानक घायाळ होऊन 'आज दीवाली है ना, अच्छा तोहफा मिला दीवालीका...' म्हणणारा आणि ही खबर आता त्याच्या आईला कशी कळवावी हे न कळालेला, पत्राचे असंख्य मसुदे लिहून फाडून टाकून त्या कागदी बोळ्यांच्या गराड्यात हताशपणे बसलेला जयंत...आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर व्हायोलिनच्या आर्त स्वरांसारखी मनात वाजत राहणारी 'हकीकत' ची गाणी... 'हकीकत' चे गीतकार कैफी आझमी उर्फ अख्तर हुसैन रिझवी यांच्याशी थेट झालेली पहिली ओळख ती अशी. 

      मग नंतर कैफींनी लिहिलेली बरीच ओळखीची आणि आवडीची गाणी ध्यानात येऊ लागली. 'है कली कली के लब पर तेरे हुस्न का फ़साना' हे रफीचे (आणि त्यातले 'मेरा दिल धडक रहा है, तू लचक संभल संभलके, कहीं रुक न जाये जालिम, इस मोड पर जमाना') , 'प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखलाके, तुझको पर्दा रुखे रोशन से हटाना होगा' हे तलत महमूद व आशा भोसले यांचे आणि 'आना ही पडेगा' हे तलतचे ही खय्यामने सुमधूर चालींत बांधलेली 'लालारुख' मधील गाणी याच कैफी आझमींची, अशी जुनी ओळख निघाली. 'कागज के फूल' साठी 'या फूल ही फूल थे दामन से, या काटों की भी आस नहीं, मतलब की दुनिया है सारी बिछडे सभी बारी बारी' हे आणि 'वक्त ने किया क्या हसीं सितम, तुम रहे न तुम, हम  रहें न हम' हे लिहिणारा कैफीच हे कळाल्यावर तर तो अधिकच जवळचा झाला. सुरैय्याच्या खटकेबाज आवाजातली 'शमा' मधली (संगीतकार गुलाम मोहम्मद) 'आपसे प्यार हुआ जाता है, खेल दुश्वार हुआ जाता है' आणि 'धडकते दिल की तमन्ना हो, मेरा प्यार हो तुम, मुझे करार नहीं जब से बेकरार हो तुम' ही पण गाणी कैफीचीच आणि 'शोला और शबनम' (संगीतकार खय्याम) मधील 'जीतही लेंगे बाज़ी हम तुम, खेल अधूरा छूटे ना' आणि 'हाँटिंग' म्हणावे असे रफीच्या आवाजातले 'जाने क्या ढूँढती रहती है ये आँखे मुझ में, राख के ढेर में शोला है न चिंगारी है' ही गाणेदेखील कैफीचीच, हे कळाले. अशी ही जुनी 'जान-पहचान' निघालेला शायर कैफी आझमी.

      उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमीचा जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफीला त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. त्यानंतर लखनौ व अलाहाबाद येथून कैफीने अरबी, फार्शी आणि उर्दूचे शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षापासूनच शायरी करणाऱ्या कैफीची पहिली गझल गायली होती ती गझलसम्राज्ञी बेगम अख्तर यांनी. मार्क्सवादाचा पुरस्कार करणाऱ्या कैफीने आपले नंतरचे आयुष्य कम्युनिस्ट पार्टीला वाहून टाकले होते. पार्टीचे हे काम करत असतानाच त्याच्यातला संवेदनशील शायर उत्तमोत्तम रचनांची निर्मिती करत राहिला.

      १९६४ साली आलेल्या 'हकीकत' च्या आधी कैफी आझमीशी इतकी नाती जोडलेली आहेत याची कल्पनाच नव्हती. 'हकीकत' मधल्या गाण्यांत बाकी कैफी आझमी आणि मदनमोहन यानी मिळून जोरकस पंचाईत करून टाकली. 'कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों' कुणाला प्रचारकी थाटाचं वाटेल तर त्यातच कैफी 'कट गये सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया' असं लिहून आजही हृदयाला हात घालतो. 'मै यह सोचकर उस के दर से उठा था' हे काव्य नाहीच, ते तर गद्यच आहे असं कुणी म्हणावं तर त्या शब्दांच्या आसपास घोटाळणारे व्हायोलिनचे सूरच काव्यमय वाटू लागतात. 'जरासी आहट होती है' आणि ' खेलो ना मेरे दिल से' ही तर लता मंगेशकर- मदनमोहन जोडीच्या 'ऑल टाईम ग्रेट' मधीलच गाणी. पण माझी सर्वाधिक पसंती बाकी 'होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा' या रफ़ी, तलत, भूपेंद्र, मन्ना डे आणि कोरसने अजरामर करून ठेवलेल्या गाण्याला. रस्ता चुकलेले, थकलेले, उपाशी सैनिक. त्यातच आपण मृत झालो आहोत असा आपल्या सहकाऱ्यांचा समज झालेला. त्यामुळे शोधमोहीमही थांबवण्यात आलेली. एवढंच नव्हे तर आपल्या मृत्यूची बातमी आपल्या घरी कळवण्यात आलेली. आणि मग आपल्या घरी काय हलकल्लोळ उडाला असेल, आपल्या प्रियेची काय अवस्था झाली असेल या कल्पनेनं खचलेल्या, हताश झालेल्या सैनिकांच्या ओठावर आलेले कैफीचे शब्द--

' होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा, 
जहर चुपकेसे दवा जानके खाया होगा...
'छेडकी बातपर अरमां मचल आये होंगे
गम दिखावेकी हसीं में उबल आये होंगे
नाम पर मेरे जब आंसू निकल आये होंगे
सर न कांधेसे सहेली के हटाया होगा...' 

      या कडव्यातला तलतच्या आवाजातील दर्द कंपागणिक मोजून घ्यावा. 'आदमी मर जाता है तो उसका क्या रह जाता है?' --'रारंगढांग' मधल्या सुभेदार ग्यानचंदला पडलेला तोच तो सनातन प्रश्न! काय होत असेल आपल्या घरी? मेजसे जब मेरी तसवीर हटाई होगी'... दु:ख परत ताजं होत रहायला नको म्हणून आपला फोटोही कुणीतरी बाजूला काढून ठेवला असेल... आपल्या आठवणी विसरण्यासाठी 'बंद कमरेमें जो खत मेरे जलाये होंगे'.... आणि शेवटी न राहवून एखाद्या मैत्रिणीच्या गळ्यात पडून गदगदून रडली असेल बिचारी...'सर न कांधेसे सहेली के हटाया होगा'... कुणीतरी मग काहीशा हट्टानंच तिची वेणी घातली असेल, पण हृदय जळून गेलेल्या प्रियेच्या चेहऱ्यावर त्याचा काय परिणाम होतो ते पहा....

'जुल्फ जिद करके किसीने जो बनायी होगी 
और भी गम की घटा मुखडे पे छायी होगी 
बिजली नजरोंने कई दिन न गिरायी होगी 
रंग चेहरेपे कई रोज न आया होगा'

      'कैफीच्या कारकीर्दीचे सर्वोच्च शिखर' असे 'हकीकत' ला हिंदी चित्रपटसंगीताचे जाणकार म्हणतात, ते पटावे असा हा 'हकीकत'.

      त्यानंतर आलेल्या 'कोहरा' (संगीतकार हेमंतकुमार) मधील 'झूम झूम ढलती रात, लेके चली मुझे अपने साथ', 'ये नयन डरे डरे, ये जाम भरे भरे', 'ओ बेक़रार दिल हो चुका है मुझको आसुओंसे प्यार' आणि सदाबहार 'राह बनी खुद मंज़िल' ही गाणीही गाजली. त्यानंतरच्या 'दो दिल' मधलं ' तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे' हे महंमद रफीचं गाणं म्हणजे उत्तम शायरी, मधुर सुरावट आणि खानदानी गायकी यांचा मिलाफच आहे. यातली इसी मस्त नज़र से पिलाए जा मेरे सामने ये जाम रहे ना रहे । कैफी आझमीच्या गाण्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बहुदा त्यांचे संगीतकार हे प्रथम दर्जाचे यशस्वी संगीतकार नसून दर्जेदार, पण दुसऱ्या फळीतले असेच आहेत. अर्थात हे वर्गीकरण हे केवळ लोकप्रियता आणि आर्थिक यश या निकषांवर केले आहे. खय्याम, मदनमोहन, रोशन, हेमंतकुमार यांच्या दर्जाविषयी प्रश्नच नाही, फक्त हे संगीतकार शंकर जयकिशन, नौशाद, सलील चौधरी, एस. डी. बर्मन यांच्याइतके आर्थिक यश मिळवू शकले नाहीत. पण त्यामुळे कैफीची शायरी झाकोळली गेली नाही.उदाहरण म्हणून 'बहारों मेरा जीवन भी सवारों, कोई आए कहींसे' हे 'आखरी खत' मधील संगीतकार खय्याम यांचे लताबाईंनी गायलेले गाणे घ्या किंवा 'अनुपमा' मधली संगीतकार हेमंतकुमार यांची सगळी गाणी घ्या!  (धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार - लता, कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं - लता, भीगी भीगी रात सन सन सनके जिया - आशा, क्यूँ मुझे इतनी खुशी दे दी के घबराता है दिल - आशा आणि मन्नादांच्या धीरगंभीर आवाजातलं अविस्मरणीय 'या दिल की सुनो दुनिया वालो' )

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.