गीतकार कैफी आझमी-२

     'शारदाला पुढं आणण्याचा प्रयत्न करणं ही संगीतकार शंकर यांची घोडचूक होती' असं ओ. पी. नय्यर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. नय्यरसाहेब पुढं हसून हेही म्हणाले की 'अर्थात महेंद्र कपूरला गाणी देऊन मी तरी दुसरं काय केलं म्हणा!' पण नय्यरसाहेबांची ही चूक काही सरसकट म्हणता येणार नाही. कैफीचं 'बदल जाये अगर माली, चमन होता नहीं खाली, बहारें फिर भी आती है, बहारें फिर भी आएंगी' हे किती सुंदर आहे! एरवी फक्त संगीतकार रवी यांच्याकडं मोजकी चांगली गाणी गाणारा (आणि नंतर नंतर तर चक्क दादा कोंडकेंसाठी पार्श्वगायन करणारा) हा गायक इथे कैफी - ओ पी. या जोडीबरोबर मैफिल जमवून गेला. कैफीचे संगीतकार मदनमोहन यांच्याबरोबर बऱ्यापैकी सूर जुळले असावेत असे वाटते. हकीकत' तर आहेच, पण त्यानंतरच्या 'नौनिहाल' मध्येही कैफीच्या शब्दांना मदनमोहन यांनी अप्रतिम स्वरकोंदणे दिली आहेत. 'मेरी आवाज सुनो' तर ओळखीचे आहेच, पण तुम्हारी ज़ुल्फ़ के सायेमें शाम कर लूँगा' हे बाकी अफलातून म्हणावे असे गाणे. नजर मिलायी तो पूछूंगा इश्क का अंजाम नजर झुकाई तो खाली सलाम कर लूंगा काय किंवा 'जहान-ए-दिल पे हुकूमत तुम्हें मुबारक हो, रही शिकस्त तो वो अपने नाम कर लूंगा' हा शेर काय, दोन्हीं शेरांनाही प्रतिभेचा परिसस्पर्श आहे. तीच गोष्ट संगीतकार रोशन यांच्या बाबतीतली. 'अनोखी रात' हा तसा सामान्यच चित्रपट - संजीवकुमारचा नैसर्गिक अभिनय असूनही- पण गाणी बाकी एकेक खणखणीत वाजवून घ्यावीत अशी. गीतकार इंदीवर यांनी कैफीच्या तोडीस तोड गाणी लिहिली, पण माझ्या मते चित्रपटातले सर्वोत्कृष्ट गाणे कैफीच्याच लेखणीतून उतरले.

'मिले न फूल तो काँटोंसे दोस्ती कर ली
इसी तरह से बसर हमनें जिंदगी कर ली' 

      वादळी, पावसाची रात्र. विचित्र परिस्थितीत एकत्र आलेले चार जीव. प्रत्येकाची वेगळी कहाणी. काचेच्या तावदानावरून वाहणाऱ्या पावसाच्या धारा. तरुण आणि देखणा परीक्षित सहनी. रोशनची साधी पण मधुर सुरावट. शतकातून एखाद्या वेळी जन्माला येतो तो रफीचा आवाज. आणि कैफी आझमीचे खोल गहिरे शब्द... 

'वो जिनको प्यार है चांदीसे, इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी, हमने खुदखुशी कर ली'

   'हीर राँझा' या चित्रपटाविषयी फार बोललं - लिहिलं जातं. संपूर्ण चित्रपट शायराना अंदाजात लिहिला गेलेला आहे. या चित्रपटातील गाणी आणि काव्यमय संवाद- दोन्ही कैफीचेच. पण मला स्वतःला यातली गाणी फारशी आवडत नाहीत. (चित्रपट तर मुळीच आवडला नव्हता). मदनमोहन यांचं संगीत फारफार तर 'ठीक आहे' असं म्हणावं इतपत.पण या अलौकिक प्रतिभावंताच्या प्रतिभेला लागलेली ओहोटी कुठंतरी कळते. 'मिलो न तुम तो हम घबराए' 'दो दिल टूटे दो दिल हारे' आणि 'ये दुनिया ये महफ़िल मेरे काम की नहीही गाणी गाजली, पण मला ती विशेष आवडत नाहीत. त्यानंतरच्या 'महाराजा' मधलं तुमसे बिछडकर चैन कहां हम पायेंगे' हे मदनमोहन यांनी संगीत दिलेलं गाणं अधिक आवडतं. 'पाकिजा' मधलं 'चलते चलते' हे एक अप्रतिम गाणं. गुलाम महंमदांनी या गाण्याला दिलेला ठेका (मग तो एकताल आहे, झपताल की केहेरवा याची फिकीर न करता) आठवायचा. घुंगरुचे 'छळ्ळक छळ्ळक'. या गाण्यातल्या चिरागांसारखीच बुझत आलेली मीनाकुमारी. दूरवरुन ऐकू येणारी रेल्वेची शिटी. 'शबे इंतजार आखिर कब होगी मुक्तसर भी ये चिराग बुझ रहे है मेरे साथ जलते जलते' यानंतर आलेल्या 'परवाना' मधल्या'सिमटी सी शरमाई सी किस दुनिया से तुम आयी हो' या किशोरकुमारच्या गाण्याने - ते गाणे म्हणून कितीही चांगले असले तरी - रसभंग झाल्यासारखा वाटतो! 'पाकिजा' चा माहौलच असा आहे की त्यातल्या गाण्यांच्या उल्लेखानंतर इतर काही ऐकावेसेच वाटत नाही.

      १९७२ साली आलेल्या 'बावर्ची' मधील सगळी गाणी कैफीची होती. संगीतकार मदनमोहन. मला स्वतःला यातली गाणी आणि हा चित्रपटही अतिशय आवडतो. 'तुम बिन जीवन कैसा जीवन , 'काहे कान्हा करत बरजोरी', 'मोरे नैना हाये नीर' आणि सगळ्यात कळस म्हणजे भोर आयी गया अंधियारा'. यात तर किशोरदा, मन्नादा आणि हरिंद्रनाथ चटोपाध्याय या तीन बेंगॉली बाबूंनी धमाल उडवून दिली आहे. 'दिन ये संदेसा लेकर पूरबसे आता है, मेहनत जो बाटे वोही फल मिलके खाता है' या ओळींवर ठुमकत चालणारा पक्का खवट म्हातारा हरिंद्रनाथ, 'सुबहकी किरनें आई है, खुशियांही खुशियां लायी है' गिटारच्या वेस्टर्न साथीने गाणारा मॉडर्न असरानी आणि मान तिरपी करून मन्नादांच्या सुरेल दाणेदार आवाजात 'देखो कहता है तुमसे सवेरा, छोडो छोडो ये तेरा मेरा' म्हणून या विस्कटलेल्या कुटुंबाला एकत्र आणणारा बावर्ची राजेश खन्ना .

      कैफी आझमी आणि मदनमोहन यांच्या युतीचे दखल घेण्यासारखे शेवटचे दोन चित्रपट म्हणजे हसते जख्म आणि हिंदुस्थान की कसम. पैकी हसते जख्म मधील 'तुम जो मिल गये हो तो ये लगता है' हे रफ़ीचे आणि 'बेताब दिल की तमन्ना यही है' व 'आज सोचा तो आँसू भर आए' ही दोन लताबाईंची गाणी अप्रतिम आहेत. हिंदुस्तान की कसम मधील 'हर तरफ़ अब यही अफ़साने है' हे मन्नाडेंचे गाणे बरे आहे तर 'है तेरे साथ मेरी वफ़ा' हे लताबाईंचे गाणे चांगले आहे.
 

      १९८० च्या दशकात कैफी आझमींनी 'अर्थ' चित्रपटासाठी अतिशय आशयसंपन्न गीते लिहिली 'झुकी झुकी सी नजर करार है की नही, दबा दबा सा सही, दिल में प्यार है की नही' 'कोई ये कैसे बतायें की वो तनहा क्यों है' आणि माझे सर्वात आवडते गाणे म्हणजे तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो'. याशिवाय 'कानून और मुजरिम' मधील सी. अर्जुनच्या संगीतदिग्दर्शनाखाली सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेले 'शाम रंगीन हुई है तेरे आंचल की तरह' हेही एक सुश्राव्य गाणे.

      असा हा हरफनमौला शायर गीतकार आपल्या शायरीइतकेच आशयपूर्ण आयुष्य जगून १० मे २००२ रोजी अल्लाला प्यारा झाला.त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वहात असताना मनात एक कृतज्ञतेची भावना आहे. आपल्याला त्याने दिलेल्या अगणित सुरेख गाण्यांबद्दल, त्यातून आपल्याला मिळालेल्या चिरंतन आनंदाबद्दल त्याचे आपल्यावरचे ऋण जाणवते आहे. 'फतह का जश्न इस जश्न के बाद है' असं लिहून गेलेला हा शायर 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' म्हणतो आहे. ते बाकी आपल्याला जमेल की नाही ही शंका अस्वस्थ करुन जाते आहे!

संजोप राव

ऋणनिर्देशः

या लेखासाठी श्री. विनायकराव गोरे यांनी कैफीच्या गीतांची तपशीलवार सूची आणि इतर बहुमूल्य माहिती पुरवली आहे. त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.