माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'. किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला.
डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले.
"राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे."
फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला.
रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले.
"ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी" पुस्तक प्रकाशनाच्या वेळी श्री माधव रिसबूड श्रोत्यांशी संवाद साधताना.डावी कडूनः-डॉं. नरेंद्र दाभोलकर, श्री माधव रिसबूड, ज्योतिषी नंदकिशोर जकातदार व लेखक प्रकाश घाटपांडे