नाडी भविष्य आणि रिसबूड
त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नदीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत.
शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे?
श्रद्धेचा दुसरा भाग
श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला.
पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका
अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी दिन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! ता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक.
शेवटचा लेख
फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो.
प्रकाश घाटपांडे