शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात नुकत्याच प्रकाशात आलेल्या एक गुणवंत / भावी प्रशासकीय अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी त्यांचे मत दिले आहे. त्यांच्यामते शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी व खर्च जास्त असतो. उत्पन्नाचे मार्ग व खर्चाच्या बाबी अर्थातच दिलेल्या नाहीत. याच वेळी मला अलिकडेच वाचलेली एक बातमी आठवली. गाढवाचं लग्न या वगनाट्यातील जुन्या अभिनेत्रीवर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्या अभिनेत्रीने म्हटल्याप्रमाणे लोकांनी अभिनय करतानाच्या काळात जे प्रेम केले ते आता दाखवले जात नाही. हे वाचताना मला एक जुनी बातमी आठवली. एक वृद्ध व नामवंत वादक याच उपासमारीने त्रासले होते. त्यांना शासनाने व अन्य कलावंतांनी मदत करावी, असा प्रतिसाद लोक देत होते. याच संदर्भात भीमसेन जोशींनी त्यांचे मत देताना म्हटले होते की "ज्या काळात या लोकांना समाज प्रेम व कलेच्या सन्मानाखातर पैसा देत असे, त्या काळात मिळालेला पैसा हे व्यसने किंवा अन्य अनुत्पादक कारणांसाठी उधळतात, त्यांना वृद्धपणी उपयोगी पडेल अशी गुंतवणूक करावी वाटत नाही. आता समाजाच्या नावाने बोलण्यात काय अर्थ आहे. "
काही विशिष्ट अपवाद आपत्कालीनतेचे जरूर असतील, पण सर्वसाधारणपणे भविष्याचा काही विचार न करताच उधळण्याची वृत्ती दिसते. अशा वेळी एखाद्या मुलीच्या वाढदिवसाच्या एक हजार रुपयांनी रुग्णालयात भरती होणाऱ्या ( पहा आजचा 'सकाळ') किती शेतकऱ्यांचे प्राण वाचवावेत किंवा किती कलाकारांना शासनाने / समाजाने मदत करावी?