मला भावलेले दत्ताराम

'दत्ताराम गेले' अशी बातमी कालच सकाळी एका फोरमवर वाचली. मन थोडे बधिर झाले पण दिवसभरच्या कामाच्या गडबडीत मी ती विसरून गेलो. एकदा वाटले, ही बातमी खोटी असावी. पण जेव्हा संध्याकाळी परत बघितले तेव्हा खात्री पटली. वाईट बातम्या कधीच खोट्या नसतात. घरी परतत होतो, तेव्हा ह्या बातमीची मला पुरती जाण आली होती. आजूबाजूला शहरातली नेहमीची गजबज होती, नेहमीचीच रोषणाई होती, पण मनात मात्र अंधार दाटून आला होता.

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुग समजले जाते अशा सुमारे १९४६ ते १९७६ ह्या काळात ज्या व्यक्तिंचा हे संगीत आम्हाला देण्यात सहभाग होता, त्यात शंकर जयकिशनचे नाव फार वरचे लागेल. पन्नाशीच्या दशकात जे तरूण, किंवा पौगंडावस्थेतले, किंवा बालवयाचे होते, अशा सर्वांवर ह्या संगीतकार द्वयीने अद्वितीय मोहिनी घातली. अशा शंकर जयकिशनचे १९५१ पासूनचे ऱ्हिदम- ऍरेंजर दत्ताराम वाडेकर हे गोव्याचे गृहस्थ होते. नशीब काढायला चाळिशीच्या दशकाच्या सुरुवातीस मुंबईत आल्यावर दत्तारामांनी गोव्याची संगीताची अभिजात परंपरा चालू ठेवली, ती तबला क्षेत्रातले दिग्गज, पं. यशवंतराव केरकरांकडे तबला शिकून. व्यायामाचीही आवड होती, व व्ही. पी. रोडवरच्या एका व्यायामशाळेत त्यांची शंकरशी ओळख झाली. शंकर व्यामाशाळेच्या बाजूला असलेल्या खोलीत रियाझ करत असतांना एकदा दत्तारामांनी ऐकला, व 'मीही वाजवतो की तबला' असे म्हणून त्याला थोडासा सोलोही वाजवून दाखवला. ह्यातून शंकरने त्यांना त्याच्याबरोबर चित्रपटांसाठी वाजवण्यास निमंत्रित केले. 'मी तेथे जात असे, व थोडासा घाबरून, अचंबित होऊन बाजूला उभा रहात असे' दत्ताराम मला गेल्या भेटीत सांगत होते. 'ते सर्व वातावरण, तेथील यंत्रसामुग्री वगैरे... हे सर्व आपल्याला कसे जमेल, अशी शंका होती.' पण पोटापाण्यासाठी काहीतरी करणे भाग होते. तेव्हा हाती असलेल्या कलेच्या आधारे चित्रपटात काहीतरी काम मिळवण्याचे प्रयत्न चालू होतेच. सज्जाद हुसैनचा नेहमीचा तबलजी गावाला गेला, की तो थोडेसे काम मला देई, पण ते तेव्हढ्यापुरतेच. तेव्हा शेवटी धीर करून शंकरबरोबर काम करू लागलो. सुरुवातीला पडेल ती कामे करायचो, वाद्ये पुसण्यापासूनची सर्व. हळूहळू आत्मविश्वास येत गेला'.

प्रत्यक्ष रेकॉर्डिंगला वाजवण्याची सुरुवात कशी झाली? 'आवाराच्या एका रेकॉर्डिंगच्या वेळी नेहमीचा ढोलकवादक आला नाही. लताबाईही आल्या होत्या व वेळ जात होता. सिंगरच्या बूथमध्ये शंकर, जयकिशन व लाताबाई ह्यांची काही चर्चा चालली होती. शेवटी शंकर बाहेर आला, तो थेट माझ्याकडे. 'दत्तू, तुम बजाना, हमे भरोसा है तुम अच्छाही बजाओगे'. मीही तयार झालो, व ते गाणे वाजवले. 'एक बेवफ़ासे प्यार किया' हे ते गाणे.' दत्ताराम जुन्या आठवणीत रमून गेले होते.

१९५१ मध्ये आत्मविश्वासाने मजबूत व अत्यंत वजनदारपणे वाजवलेल्या ह्या गाण्यानंतर दत्तारामांनी मग मागे वळून पाहिले नाही. त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या 'नगिना' पासून शंकर- जयकिशनची ऱ्हिदम आघाडी सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली, व ती त्यांनी ज्या समर्थपणे पेलली, त्याला तोड नाही. आजूबाजूला अत्यंत गुणी व प्रभावशाली असे ढोलक, नाल (ढोलकी) व तबला वाजवणारे एकेक कलाकार होते. पुण्यवान हे एक बुजुर्ग त्यांतील एक. लालाभाऊ गंगावणे हे दुसरे. व गुलाम महम्मदांचा, अप्रतिम हात व भन्नाट डोके असलेला भाऊ अब्दुल करीम, हे तिसरे. ह्या कलाकारांचा वाजवण्याचा स्वतःचा वेगवेगळा ढंग असायचा. पुण्यवान व दत्ताराम वजनदार व डौलदार वाजवणारे, अब्दुल करीम एकदम तय्यारीने, अत्यंत नवनव्या जागा घेत वाजवणारा. 'त्याला दोन-तीन जणांबरोबर वाजवायाला आवडत नसे' दत्ताराम मला म्हणाले., ' पण मी त्याला कधीकधी बांधून ठेवत असे' ते म्हणाले. तेव्हा गाण्याच्या मूडनुसार वादक निवडायचे, व शक्यतो त्यांना त्यांच्यात्यांच्या लकबीनुसार वाजवण्याची संधी द्यायची, हे जोखमीचे आणि खरे तर कसरतीचे काम दत्तारामांनी किती समर्थपणे पेलले आहे ह्याचा थोडासा मागोवा घेतो.

ढोलकवादनात शंकर जयकिशनकदे साधारणपणे दोन विशिष्ट लकबी दिसून येतात. एक म्हणजे धिम्या लयीच्या गाण्यांना वजनदारपणे लावलेले ठेके. उदा. 'एक बेवफ़ासे प्यार किया (आवारा)', 'उसे मिल गयी नयी ज़िंदगी (हलाकू)', 'मेरे सपनेमे आना रे, सजना (राजहठ)', 'आंसू की आग लेके तेरी याद आयी (यहुदी)', 'तेरा जाना (अनाडी), 'भैय्या मेरे, राखी के बंधन को निभाना (छोटी बहेन)', 'दिल अपना और प्रीत पराई (दि. अ. प्री. प.)', 'ये तो कहो, कौन हो तुम, कौन हो तुम (आशिक़), 'ये हरियाली और ये रास्ता (हरियाली और रास्ता)', 'जुही की कली मेरी लाडली (दिल एक मंदिर). इतके दमदार ठेके इतर कुठेच आढळून येत नाहीत. दुसरी विशिष्ट लकब म्हणजे उत्तम तय्यारीने वाजवलेली, लग्ग्यांवर लग्ग्यांची बरसात करणारी, तबला- ढोलकवादनात रस असलेल्यांना मूढ करणारी अब्दुल करीमांची खास शैली. ही बहुतेक नाचाची अथवा जलद लयीतली गाणी असत. 'गोरी गोरी गोरी (बेगुनाह)', 'मै पिया तेरी (बसंत बहार)', 'हाय तूही गया मोहे भूल रे (कठपुतली)','बाक़ड बम बम बम (कठपुतली)', 'बन के पंछी' (अनाडी)', 'तेरा जलवा (उजाला)', 'ओ मोरा नादान बालमा (उजाला), ' अंदाज़ मेरा मस्ताना (दि. अ. औ. प्री. प.)', 'बेगानी शादी मे (जिस देश मे गंगाअ बहती है)', 'काश्मिर की कली हुं मै, मिझसे ना रुठो बाबुजी (जंगली)', 'तुझे जीवन की डोर से (असली नक़ली)', 'तुम्हे और क्या दूं (आयी मिलन की बेला)' इ.

आणि अशा सुद्रुढ व निर्मितीला भरपूर वाव असलेल्या वातावरणात दत्तारामांनी एका नव्या ठेक्याला जन्म दिला. त्या ठेक्याची सुरुवात आपल्याला 'आवारा हूं (आवारा)' ह्या गाण्यापासूनच दिसते. पुढे हा ठेका ढोलकच्या अंगाने विकसीत होत गेला ...' प्यार हुवा, इक़रार हुवा है (श्री ४२०)', 'ईचक़ दाना, बिचक़ दाना (श्री ४२०)' असे होत होत तो पूर्ण विकसीत झाला तो 'अनाडी'मधल्या 'वो चांद खिला' ह्या गाण्याच्या वेळी. मेलडीला सुंदररित्या तोलून धरणाऱ्या ह्या ठेक्याने असे स्वतःचे रूप धारण केले, व फ़िल्म- इंडस्ट्रीमध्ये त्याचे नामकरण झाले 'दत्तू ठेका'. हा लोभस ठेका दत्तारामांनी संधि मिळेल तसा वाजवला व अजरामर केला. शंकर-जयाकिशनसाठी 'मै रंगीला प्यार का राही (छोटी बहेन)', 'तुने मेरा दिल लिया (शरारत)', 'मै का करू राम (संगम)' अशी ही काही  ढोलकवर वाजवलेली गाणी. तसेच त्याला काँगोच्या अंगानेही वाजवले गेले---'सायोनारा ( लव्ह इन टोकियो)', 'जाने मेरा दिल किसे ढूंढ रहा है (लाट साहेब)', 'चक्के पे चक्का (ब्रम्हचारी)' इत्यादी.

स्वतः  चांगले तबलजी असल्याने दत्तारामांनी शंकर-जयकिशनची तसेच इतरही काही गाणी सुंदर वाजवली आहेत. 'मनमोहना बडे झूठे (सीमा)' चा शांत स्वच्छ एकताल त्यांनी वाजवला आहे. सलिल चौधरी त्यांचे खास दोस्त. 'त्या काळात त्याचे काही खास चालले नव्हते, व तो कलकत्त्याला जायची तयारी करू लागला होता' दत्तारम मला सांगत होते. 'इतक्यात त्याच्याकदे मधुमतीचे काम आले. त्यातील 'आजा रे परदेसी' व 'घडी घडी मोरा दिल धडके' ही दोन गाणी मी वाजवली. त्यानंतर सलिल व मी, असे आम्ही दोघे खारदांड्याच्या एका बारमध्ये रात्री पीत बसलो होतो. सलिल उदासच होता, त्याचा आत्मविश्वासच गेला होता. 'पण मी पैज लावून सांगतो तुला, ही गाणी खूप चालणार, तुला तुझा परत जाण्याचा निर्णय बदलावा लागणार' मी त्याला म्हटले. आणि तसेच झाले!' ते म्हणाले. माझ्या तबला व ढोलक ह्या वाद्यंविषयीची आत्मियता त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी. 'बात बात पे रूठो ना' ला कुणी वाजवलय हो?' ह्या माझ्या प्रश्नाचा रोख त्याच्या अंतऱ्याच्या तिसऱ्या ओळीवर वाजवलेल्या लग्गीवर होता, हे त्यांनी लगेच जाणले. ती लग्गी म्हणून दाखवत त्यांनीच मला प्रतिप्रश्न केला, 'कशी वाजवलीय मी?' कानाच्या पाळीला हात लावून 'बहोत अच्छे!' असे म्हणण्यापलिकडे मी काय म्हणणार होतो? 

दत्तारामांनी शंकर जयकिशनसाठी बाँगो व काँगो ही वाद्ये इत्क्या खुमारीने वापरली आहेत, की तशी मजा परत आली नाही. 'सबकुछ सीखा हमने (अनाडी)' मधला पिक-अप् आजही आंगावर शहारे आणतो. मेलडीच्या बरोबर जाणारे बाँगो, काँगो वादन फक्त इथेच ऐकले. उदा. 'लाख छुपाओ, छुप न सकेगा (असली नक़ली)' चे प्रील्युडचे संगीत ऐकावे. काही विलक्षण बाँगो-काँगोवर त्यांनी केलेली गाणी : 'बोल री कठपुतली (कठपुतली)', 'मैं रंगीला प्यार का राही (छोटी बहेन)', 'कहे झूम झूम रात ये सुहानी (लव्ह मॅरेज)', 'दुनिया वालोंसे दूर (उजाला)', 'सुक्कु, सुक्कु (जंगली)', 'छेडा मेरे दिल ने (असली नक़ली)', 'धडकने लगता है (दिल तेरा दिवाना)', 'अल्लह जाने क्या होगा (हरियाली और रास्ता)', 'यहॉ कोई नही तेरा मेरे सिवा (दिल एक मंदिर) इत्यादी. कर्सी लॉर्ड, कावस लॉर्ड, बुज्जी लॉर्ड व लेस्ली हे भरवश्याचे वादक ही वाद्ये वाजवायचे.

दोन्ही तबला अथवा ढोलक व काँगो एकाच वेळी वाजतयात, हे तेव्हा फक्त शंकर जयकिशनकडेच ऐकायला मिळायचं. 'ओ शमा मुझे फ़ूक दे (आशिक़)', 'लाखो तारे (हरियाली और रास्ता)', 'बुड्ढा मिल गया (संगम), 'ओ सनम तेरे हो गये हम (आयी मिलन की बेला) हे अशा गाण्यांची काही उदाहरणे. तसेच गाण्याच्या काही भागावर तबला/ढोलक व इतर भागांवर काँगो ही कारामतसुद्धा फक्त इथेच ऐकायला मिळाली --' अंदाज़ मेरा मस्ताना (दिल अपाना और प्रीत परायी), हे असे एक उदाहारण.

दत्तारामांनी साईड- ऱ्हिदमपण भरपूर व वैविध्याने सजवला. ह्यात मॅरॅखस, खंजिरी, झांज, चिपळ्या, ढोल इत्यादी वाद्यांचा समावेश होता. आणि एकाच गाण्यात मॅरॅखस व खंजिरी दोन्ही वाजणार-- एक मुख्य गाण्यावर (मेलडीवर) तर दुसरे मधल्या संगीतावर (इंटरल्युडस् वर). झांज ऑफबीट वाजणार व रंगत देणार. एखाद्या गाण्याला ढोल मुख्य संगत- वाद्य वाजणार, पण दोन ओळींमधल्या म्युझिकपीसवर तबला वाजणार--- 'लो आयी मिलन की रात (आशिक़)', एक ना नाना तऱ्हा!  चोंदक ह्या ताश्यासारख्या वाद्याचाही त्यांनी सुरेख उपयोग केला, तसेच ताश्याचाही--उदा. 'है आग हमारे सीने से (जिस देश मे गंगा बहती है)'.

तीसरी कसमची कथा उत्तर प्रदेशात घडते. तेव्हा तिथे नेहेमीसारखा पंजाबी अंगाने ढोलक न वाजवता, तो नौटंकीच्या अंगाने वाजवला गेला!

दत्तारामांनी स्वतः संगीतबद्ध केलेली काही गीते तर आता सदैव आठवणीत राहातील अशी आहेत. त्यांपैकी 'दत्तू ठेका' असलेली काही गाणी म्हणजे 'मिठी मिठी बातोंसे बचना जरा (अब दिल्ली दूर नही)', 'चुन चुन करती आयी चिडीया', 'मस्तीभरा है समा'. ह्याव्यतिरिक्त 'आसू भरी है ये जीवन की राहे (परवरिश), 'दिल्ने उसे मान लिया (संतान)', 'हाले दिल हमारा (श्रीमान सत्यवादी)', 'मुझे मिल गयी है, मुहब्बत्की मंज़िल (फर्स्ट लव्ह)', 'दिल धूंडता है, सहारे, सहारे (काला आदमी) ही आणिक काही, आजही रसिकांच्या लक्षात राहतील अशी गाणी.

संगीतकाराना एका विशिष्ट रागाची आवड असते, तसेच एखाद्या विशिष्ट तालाचीही. उदा. नौशादांना दादऱ्याची अशी आवड दिसते, मदन मोहन अनेक गाणी रुपकमध्ये करतांना आढळतो. शंकर-जयकिशनची तबल्यावरची अनेक गाणी झपतालात आहेत. 'कहॉ जा रहा है (सीमा)', 'भय भंजना (बसंत बहार), ' मासूम चेहरा ये क़ातिल अदाऐ (दिल तेरा दिवाना), 'आवाज देके (प्रोफ़ेसर)'. वर उल्लेखिलेल्या दत्तारामाच्या स्वतः संगीतबद्ध केकेल्या गाण्यातही झपतालातली गाणी आढळतात-- 'आंसू भरी है', 'दिल धूंडता है, सहारे, सहारे'. तेव्हा मी त्यांना ह्याबद्दल विचारले. 'तसे काही मुद्दाम केले असे नाही, सहजच झाले' अशी त्यांची ह्यावर प्रतिक्रिया होती. कलावंतांचे सृजन अगदी सहज, नकळत होत असावे.

ज्या संगीताने मी लहानपनापासून न्हाऊन निघतो आहे, व जे आता माझ्या पिंडाचाच एक भाग होऊन बसले आहे, अश्या संगीताच्या घडणीत माहत्वाचा सहभाग असलेल्या ह्या कलाकाराशी, अगदी अल्प काळ का होईना,  त्या संगीतावर थोडीशी खोलात जाऊन मी चर्चा करून शकलो, हे मी माझे भाग्य समजतो. गेले दोन-तीन वर्षे त्यांची प्रकृति म्हणावी तशी ठीक नव्हती. दोन हार्ट-ऍटॅक येऊन गेले होते व वयाबरोबर येणारी इतरही काही दुखणी आलेली होतीच. पण पहिलवानी खाक्या इतका होता, की ते तरूण असतांना कसे असतील, त्याची प्रचिती यावी. आणि जाणवण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे उमेद कायम होती. आजारी असतांनाही त्यांनी शेजारीच ठेवलेल्या थुंबावर दोन-चार हात मारले. थोड्याश्याच परिश्रमाने त्यांना दम लागला, पण ते थांबले नाहीत. शेवटी मलाच ते सहन होईना, व आता कृपया थांबवा वाजवणे असे मला त्यांना नाईलाजाने सांगावे लागले. ज्यांच्या ऱ्हिदम ऍरेंजमेंटस् नि मी आयुष्यभर मोहून निघालो, त्यांना 'वाजवणे थांबवा' असे म्हणावे लागावे ह्यासारखा दैवदुर्विलास कोणता? 

काळ कुणासाठीही थांबत नाही. आणि जगही वेगाने पुढे धावत आहे. 'रफी व्हू?' हा प्रश्न आमच्या एका मित्राने मुंबईच्या 'ऱ्हिदम हाऊस'मध्ये ऐकल्यलाही आता चार-पाच वर्षे लोटली आहेत. तरीही त्या सुवर्णयुगाची मजा ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवली, ती मंडळी जिवंत असेपर्यंत ह्या आनंदाची खुमारी असेलच!