त्रिमिती
जीवनातल्या एखाद्या अनुभवावर आधारित निरीक्षण मांडायच ठरवल की लगेच जाणकार नाण्याची दुसरी बाजू आपल्या समोर ठेवातात. कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समोर येणे ही अभिनंदनीय गोष्ट आहे पण ती चूक की बरोबर म्हणून होणारा वादही मग अटळ आहे. कोणतीही गोष्ट मनात आली की अमूक म्हणजेच बरोबर आणि बाकी सर्व चूक असा 'बुलियन' तर्क आपल्या मनात का बरे येतो?त्याला कारण आहे आपली परंपरागत विचारसरणी. पेहराव, भाषा, आहार, संस्कृती, कला, साहित्य सगळीकडे आपण अशी विचारसरणीच का ठेवतो?नाण्याच्या तिसऱ्या बाजूचा विचार का होत नाही?खर सांगायच तर नाण्याची ही तिसरी बाजू अस्तित्वात आहे, नकळत आपण तिचा स्वीकार केला आहे फक्त तिचे असणे अजून अंधारातून बाहेर आलेले नाही.
अशा वेळी अमूक व्यक्ती चूक आहे असे म्हणण्याआधी आपण त्रिमितीने विचार केला का? दर वेळी ही अशी एकच बाजू घेण्याची विचारधारणा कशाला? विचारवंत, कवी, लेखक संपादक कोणीही असला तरी आधी तो माणूस असतो ना! आणि म्हणूनच तडजोडीची त्याची स्वतःची एक मर्यादा आणि पद्धती असते. काळानुसार, परिस्थितीनुसार आपल्या आवडी निवडी बदलत जातात याचा अनुभव कित्येकांना आला असेल. अनुभव, वाचन, सहकारी मित्रपरिवार अशी अनेक कारणे अगदी साध्या साध्या आवडीनिवडीत बदल करून आणायला समर्थ असतात. हा झाला एखाद्या गोष्टीबद्दल चा त्रिमितीय विचार. जरा भूतकाळात डोकावून पहा म्हणजे अशी एका बाजूने ठाम राहून केलेली स्वतःचीच मतप्रदर्शने आता तुम्ही स्वतःच कालबाह्य ठरवाल. अगदी साधे सोपे उदाहरण द्यायचे झाले तर सचिन तेंडुलकरचे आहे. तो एक तर उत्तम फलंदाज आहे अथवा नाही याच दोन बाजू आहेत ना?पण आता त्याला उत्तम म्हणणारे किती आहेत? एक काळ असा होता की आता त्याला नावे ठेवणारेच त्याचे गोडवे गाण्यात अग्रेसर होते. तर काही जण ' तो दहा वर्षापूर्वी असा होता आता तसे राहिले नाही.'..इत्यादी लंगडी समर्थने देतात. कशाला? या प्रश्नाचे उत्तर एक तर हो किंवा नाही असेच यायला हवे ना? पण जरा चौकटीबाहेर जाऊन या सर्व समर्थनांकडे बघा. ही नुसती समर्थने नाहीत तर हे आहेत त्रिमितीय विचार.
हाच त्रिमितीय विचाराचा नियम साहित्य आणि कला प्रांतातही लागू आहे. अमूर्त चित्रांच चित्रकलाविश्वात आगमन झाले तेव्हा समीक्षकही गोंधळून गेले. चित्र आणि आकार हे समीकरण मेंदूत एवढ पक्क झाल होत की त्याबाहेर विचार कसा करावा ते त्यांनाही कळेना. परिचित आकार नाही आणि पूर्णपणे आकृतिहीन अशा रंगलेपनाकडे कोणत्या भूमिकेतून पाहाव ते त्यांना कळेना. हीच तार्किकता संगीताला आणि नृत्यालाही लागू आहे. आजच्या चित्रपटातील संगीत आणि नृत्य पाहता, 'आजचे संगीत काय संगीत आहे? नृत्य आहे की कवायत आहे?' असा विचार मनात डोकावेल. पण अशा संगीतावर आणि नृत्यावर रिमिक्सवर फिदा होणारेही आहेतच ना? विचारांना याच रेषेवर आणखी वाढवत नेले तर आजच्या कवितांना कविता तरी का म्हणाव? मराठीला मराठी तरी का म्हणाव असे प्रश्न कुणी विचारले तर नवल नाही.
समाजातील विविध जातीचे, आर्थिक गटातले विविध थरातले लोक साहित्य चित्रकला आणि सांस्कृतिक क्षेत्राकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात विलक्षण साम्य आहे. भारतात विविधतेतील एकता जर कुठे असेल तर ती या एकतेत आहे. ते सगळेच लोक कोणतेही नवे बदल झाले अथवा होणार असा अंदाज आली की अस्वस्थ होतात. वर्तन आणि पोशाखातला आधुनिकपणा समाज किरकोळ विरोधानंतर स्वीकारतो. दोन पिढ्यांपूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडून नोकरी अशक्यप्राय कल्पना होती. आज दिवसरात्र असा भेद न करता स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने अनेक कार्यक्षेत्रात आघाडीवर आहेत. पुरूषांनी कमावून आणायचे आणि रांधावाढा उष्टीकाढा हे स्त्रियांचे काम असा दृष्टिकोन आता कालबाह्य ठरला आहे. प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभे असणे ही गरज झाली आहे.. भावनिक आणि व्यवहारिकही. त्यामुळे त्यावर आधारित सर्वमान्य राहणीमानाचे कित्येक चौकटबद्ध धागे आता कालबाह्य आहेत. तीच गोष्ट आहे आहे मुले आणि लग्नाबद्दल. या सर्व अतिशय व्यक्तिगत बाबी असल्या तरी त्याबद्दल समाजाच्या सर्व थरात चर्वितचर्वण होतेच. उच्चवर्ग अथवा तळाचा वर्ग या सर्वातून आपली सूटका करून घेतो मध्ये खितपत पडतो तो मध्यमवर्ग. काही वर्षांनी असाही काळ येईल की मध्यमवर्गातील मुला मुलींनी लग्न करणे, न करणे, लग्नाशिवाय मुले अथवा लग्नानंतरही मूल न होऊ देण्याचा निर्णय समाजही स्वीकारेल.
शाळामहाविद्यालयातील शिक्षणाचा आणि प्रत्यक्ष नोकरीसाठी लागणाऱ्या कौशल्याचा काडीएक संबंध नसणारी व्यवस्था किंवा त्यामधी दरी काही नवीन नाही. पुस्तकी पंडितांना मग अशिक्षित कामगाराने कृतीतून शिकवणे हा त्या पंडीताचा हक्कच आहे असा एक जमाना होता. आज पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार कौशल्यात निपुण असणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाहून अधिक हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे. मग मुलांना शिस्त नाही अशा गप्पा हे प्राध्यापक मारणारच. आम्हाला नवे इथे काही देण्यासारखे प्राध्यापकांजवळ नाही ही झाली नाण्याची दुसरी बाजू. या दोन्हीचा समतोल साधून काम करणारी महाविद्यालये सुद्धा आहेतच ना. थोडक्यात म्हणजे प्रत्यक्ष अनुभवावर अथवा मन लावून काम करणाऱ्या एका वर्गामुळे अनेक व्यवस्था अचूक काम करत आहेत. या वर्गाचा बुद्ध्यांक मग पुस्तकी जगात रमणाऱ्या एवढा नसेलही. बसचालक, कामगार, भाजीवाले, सुतार, उपाहार गृहे अशा सर्व ठिकाणी मन लावून काम करणाऱ्यांनी आपले काम बंद केले तर बुद्ध्यांकाच्या गप्पा करणाऱ्यांना अन्न वस्त्र निवाऱ्या शिवाय राहण्याची वेळ येईल हे त्रिमितीय सत्य आहे.
एकांगी विचार हा माणसाला समग्रतेपासून दूर खेचणारा आहे. जातिव्यवस्थेचा सर्वात मोठा फटका बसलेला एक समूह एकांगी विचारसरणीच्या प्रभावाखाली जातिव्यवस्था अधिक घट्ट करण्याला प्राधान्य देतो आहे. आयुष्यभर भ्रष्टाचाराशी लढत राहणाऱ्या व्यक्तीच्या घरातील मुले खुशाल लाच देण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. अशा गोंधळवून टाकणाऱ्या मनातल्या विचारांचा जाहीरपणे उच्चार करायला घाबरणारे अनेक विचारवंत घराघरात आहेत. खर आहे, त्यांनाही जगायच आहे,चैनीत जगायच आहे. दर वेळी विचारस्वातंत्र्याने पोट कसे भरणार? आजच्या आघाडीच्या दैनिकातील अग्रलेख पाहिले तर दर्जेदार जीवनशैलीच्या आकर्षणाने विचारवंतांची झालेली कोंडी लक्षात येईल. लोकांना काय हव आहे? ते शोधण आधी महत्त्वाच. लोकांच्या ह्या शक्तीवर तर मोठी साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात . बहुमताने जे सिद्ध झाले त्याचा दर्जा कसा हे तर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणार सत्य आहे त्या सर्व वादातून पुढे जाऊन त्रिमितीय विचार करणाऱ्यांची आज समाजाला गरज आहे. बुवाबाजीच्या नादी लागलेला एक वर्ग आहे आणि देवळात न जाणारा नास्तिक वर्ग एक आहे. पण या कोणत्याही एका गटात न मोडता माणसाला माणसाचा दर्जा देण्यात गुंतलेला , कर्म करत राहणारा एक मोठा वर्ग आहे, ही सर्वात मोठी कोणत्याही धर्मात सांगितलेली परमेश्वराची आराधना आहे हे त्रिमितीचे सत्य आहे.
आज मानवाचा मेंदू कार्यरत नसेल तर त्याला मृत असा दर्जा देतात. 'ब्रेनडेड' असे त्याचे विश्लेषण आहे. श्वास आणि हृदयाचे ठोके सुरु असलेला माणूस जर मृत होऊ शकतो तर माझ्या मते इतर सर्व सत्ये, आवडीनिवडी त्रिमितिय आहेत. र्भिन्न जात, धर्म, संस्कृती यामुळे एकता कशी निर्माण होणार? आपला प्रत्येक प्रश्न हा दुसऱ्यात गंतलेला आहे.सगळे नवीन योग्य नाही आणि सगळे जुने चांगलेच आहे असेही नाही. पारंपारिक पद्धती आणि नवी विचारसरणी या दोहोंचा मेळ घालणारी, व्यवहारिकतेशी जवळीक साधणारी, मानवी सामंजस्य आणि तारतम्य यावर आधारित त्रिमितीय विचारसरणी ही एक गरज म्हणून समोर आली आहे.