लिंग कोण ठरवणार?

काही इंग्रजी शब्द मराठीत सर्रास वापरतांना कोणत्या शब्दास कोणते लिंग वापरावे हा एक वादाचा विषय आहे. पुणेकर ब्रेड ला "तो ब्रेड" म्हणतात, तर नागपूरकर "ती ब्रेड". ह्याउलट पुण्यात "ती पेन" असा प्रयोग रूढ आहे, तर नागपूरात "तो पेन". वास्तविकत: पेन ही वस्तू असल्याने "ते" पेन हाच प्रयोग सर्वात संयुक्तिक ठरायला हवा.

(मी बहुतकरून नागपूर आणि पुणे, ह्या दोनच ठिकाणी राहिले, त्यामुळे मला सोलापुरी, कोल्हापुरी, मुंबईकरी प्रयोग माहिती नाहीत.) परंतू जर असे काही इंग्रजी शब्द मराठीत रूढ झालेच आहेत, तर त्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. केवळ पुणेरी म्हणजे शुद्ध, असा नियम लागू नसावा.

मराठीत (आणि संस्कृतात) साधारण आकारा प्रमाणे लिंग ठरवले जात असावे, असा माझा अंदाज आहे. मोठ्या आकारास "तो/ते" आणि छोट्यास "ती" असे संबोधले जाते. उदा. तो रस्ता, ती गल्ली. तो समुद्र, ती नदी. (ह्यावरून आदिकाळापासून स्त्रीलिंगा विषयीचा biased attitude दिसून येतो, हा मुद्दा वेगळा.) शिवाय साधारणत: स्त्रीलिंगी शब्द आकारांत/इकारांत असतात, आणि पुल्लिंगी/नपुंसकलिंगी शब्द अकारांत, उकारांत. उदा. ते पत्र, तो कागद, ती शाई.

आज मात्र जर मराठीचा विस्तार करावयाचा असेल, तर काही परप्रांतीय शब्दांना मान्यता देण्यावाचून गत्यंतर नाही, हे आपण न ठरवता सुद्धा सिद्ध झालेलेच आहे. काही अपवाद वगळता प्रत्येकाच्या बोली भाषेत हे शब्द अनेकदा येत असतात. तेव्हा त्यांचे व्यवस्थीत मराठीकरण तरी व्हावे असा माझा मुद्दा आहे.

मला सुचलेले काही "वादग्रस्त" शब्द वर नमूद केलेलेच आहेत, त्या व्यतिरिक्त अजून काही:

  • संगणक "तो", परंतू कंप्यूटर "ते", असे का?
  • ईमेल "ती" की "ते"

सर्व मराठी भाषिकांमध्ये हया विषयावर चर्चा कधी ना कधी होतच असते. त्यामुळे कृपया आपल्याला अडलेले, नडलेले, खटकलेले, सगळे शब्द ह्या चर्चेत आणावेत. केवळ आपल्या प्रांताचा (नागपूरी, पुणेरी) असा विचार न करता, मराठी भाषेचा विचार इथे करायचा आहे, हे सांगणे न लगे.