पाऊस -- बनगरवाडीतला आणि कांदेवाडीतला

नुकताच पाऊस वाजतगाजत डेरेदाखल झालाय, तेव्हा ग्रेसच्या भाषेत सांगायचं तर 'पाऊसनांदीची पिंजण' म्हणून मला आवडणारी पावसाची दोन वर्णनं येथे देत आहे. दोन्ही वर्णनं गाजलेल्या पुस्तकांतली. दोन्ही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली. पण त्यांच्यातल्या साम्याचा भाग एवढाच. एक ग्रामीण जीवनावरची अलिप्त कादंबरी, तर दुसऱ्या कथासंग्रहात भरलेला आहे तो मुंबईतला मध्यमवर्गीय लिप्ताळा. बनगरवाडीतला एकूणच तटस्थ, 'जसं-आहे-तसं' कथन करणाऱ्या निवेदनाचा सूर पावसाळ्याच्या या वर्णनातही जाणवतो; तर गंगाधर गाडगीळांच्या 'पावसाळी हवा' [कथासंग्रह - कडू आणि गोड] या कथेत पाऊस एका संसारी पुरुषाच्या दृष्टीतून येतो.

बनगरवाडीतलं वर्णन, उगाचच 'साऱ्या सृष्टीने हिरवा शालू पांघरला' अशा वाक्यांत गुंतून पडत नाही; तर रोखठोकपणे ती धनगरांची वस्ती पावसाळ्याला कसं तोंड देते, हे सांगतं. झगझगीत पोपटी रंगाच्या गवताबरोबरच मग गळक्या छपरांचं, घोंघावणाऱ्या माशा-चिलटांचं, चिखलाचं आणि कुऱ्हाडींवर चढणाऱ्या गंजाचंही वर्णन येतं.

"मे महिना संपला आणि जून आला. उन्हाळा संपला. पावसाळा आला. इंद्रगोप दिसू लागले आणि मृग निघाला. आभाळ झाकोळून आले. स्वच्छ ऊन नाहीसे झाले. वारा सुटला. झाडेझुडे गदगदू लागली. धूळमाती चौफेर उडू लागली. आभाळाकडे बघून लोक म्हणू लागले, 'वारा पाऊस घालवील.' पण तसे झाले नाही. सडासडा धारा आल्या. मृगाचा पाऊस बनगरवाडीला झोडपत राहिला. भटकी कुत्री भिंतीच्या आडोशाला उभी राहिली. लवकर उघडीप होण्याचे दिसेना. धनगरांची धावाधाव झाली. डोक्यावर रिकामे पोते घेऊन त्यांनी वाड्यात भिजणारी मेंढरे काढून झोपड्यात आणली. घरात दाटीवाटीने उभ्या राहिल्या मेंढरांनी अंगे झाडली. भिजल्या लोकरीच्या वासाने धनगरांची घरे दरवळली. सरीवर सरी आल्या. तापलेल्या जमिनीतून वाफा निघाल्या. धूळ उडाली. चिखल झाला आणि मग तोही वाहून गेला. खडे उघडे पडले.

काडाने शाकारलेली घरे गळू लागली. सुरेख सारवलेली जमीन ठिकठिकाणी ओली होऊन उखणू लागली, तेव्हा धनगरणी चरफडल्या आणि गळणाऱ्या जागी त्यांनी लहानमोठी भांडी ठेवून दिली. मेंढऱांच्या धडपडीतूनही भरलेल्या भांड्यांत ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज कान किटवू लागला. धाब्याच्या घरातून गळू लागले. तेव्हा डोक्यावर रिकामी पोती घेऊन धनगर माळवदावर चढले. जिथे पाणी साचले होते, माळवदाला भोक पाडून आत शिरत होते, ती भोके त्यांनी दगडमाती घालून तात्पुरती बुजवली.

हवेमध्ये गारवा आला. धनगरांच्या कुऱ्हाडींवर गंज धरू लागला आणि धनगरणींनी साठवून ठेवलेले मीठ पाझरू लागले.

पोपटी रंगाच्या गवताने जमिनीतून डोकी वर काढली. अंगणात, माळवदावर, छपरांवर - जिथे उगवू नये तिथे गवत उगवू लागले. सर्वत्र झगझगीत पोपटी रंग दिसू लागला.

अंगठ्याच्या नखावर बसू शकतील एवढ्या बारक्या बेडक्या एकाएकी दिसू लागल्या. वाटेने चालताना टणाटण उडू लागल्या. त्यांच्यावर कावळे झडपा घालू लागले. छोटीशी पंखे असलेले किडे हजारो-लाखोंनी उडू लागले आणि साळुंक्या-चिमण्यांनी त्यांचा फडशा पाडला. त्यातून वाचले ते दिवे लागताच त्यांवर झडप घालून मेले. दोन दिवसांनी त्यांची पातळ पंखे ठिकठिकाणी गळून पडलेली दिसली आणि पंख टाकलेले ते लहान अळीसारखे पिवळ्या रंगाचे किडे नाहीसे झाले. विटकरी रंगाचे लांबट वाणी एकमेकांच्या पाठुंगळी बसून अनेक पायांवर चालू लागले. बोटाएवढे काळे वाणी आळशीपणाने इकडेतिकडे करू लागले. माणसा-जनावरांचा स्पर्श होताच वेटोळे घालून पडू लागले. धनगरांची पोरे मुद्दाम हात लावून ते गोल पैसे तळहातातून नाचवू लागली. माशा फार झाल्या. झोपड्यांतून घोंगावू लागल्या. मेंढरांच्या नाकांवर बसू लागल्या. चिलटे फार झाली आणि धनगरांच्या डोळ्यांसमोर उडू लागली.

नांगरून पडलेल्या जमिनीतील ढेकळे विरघळली. जमिनींनी पाणी पिऊन घेतले. ठिकठिकाणी लहानमोठी डबकी साचली आणि निळ्याकाळ्या आकाशाचे प्रतिबिंब त्यांत दिसू लागले. रानातून जाताना लोकांच्या, मेंढरांच्या, गुरांच्या पायांना चिखलाचे लपके चिकटू लागले. माळरान भिजले आणि हिरव्यागार माळावर काळीभोर मेंढरे हिंडू लागली. आणि त्यांच्या पाठींवर बसून काळे कोतवालपक्षी घोगरा आवाज काढू लागले. कुणाच्याही दृष्टीला न पडण्याची खबरदारी घेऊन चित्तर उंच स्वरात ओरडू लागले."

...

बनगरवाडीच्या तुलनेत 'पावसाळी हवे'तलं वर्णन थोडं अलंकारिक असलं तरी, तेव्हाच्या गिरगावातील मध्यमवर्गीय माणसाच्या तोंडी ते कृत्रिम वाटत नाही. खरं तर, 'दक्षिणेकरता पोट सावरत धावणाऱ्या भटजीसारखे ढग','दमेकरी म्हाताऱ्यासारखी हवा' यासारख्या उपमा आणि चेतनागुणोक्ती अलंकाराचा केलेला सुरेख उपयोग यातून वर्णन खुलतं. बनगरवाडीतल्या त्रयस्थ निरीक्षणाच्या अगदी विरुद्ध, या कथेत बाहेरच्या निसर्गवर्णनाबरोबरच कथानायकाची मन:स्थिती रेखाटण्यावर भर दिला आहे. दोन लेखकांचे, एकाच ऋतूच्या वर्णनाचे दोन वेगळे मार्ग! दोन्हीही तितकेच प्रभावी.

"रात्रभर उकाड्यानं नुसतं गुदमरून जायला झालं होतं. कधी न धुतलेलं गरम जाकीट घातलेल्या दमेकरी म्हाताऱ्यासारखी हवा झाली होती. शरीर नुसतं चिवचिवलं होतं. आणि मन निपचित पडलं होतं.

पण पहाटेच्या सुमाराला धावत्या सरींचे सपकाऱ्यावर सपकारे मारून पावसानं सारं वातावरण थंडगार करून सोडलं. पाणी पिऊन वाऱ्यानं एक भला मोठा थंड सुस्कारा सोडला आणि मग तास-दोन तास ढगांच्या पखाली तुडुंब भरून आणून रित्या करण्याचा त्यानं सपाटा चालवला.

पायगतीचं पांघरूण अंगावर घेऊन मी त्यात गुरगुटलो. जागेपणीच झोपेची सुस्ती मी अनुभवली. एक प्रकारची सौम्य प्रसन्नता येऊन मला बिलगली. आणि जलबिंदूंनी डवरलेल्या अर्धोन्मीलित मोगऱ्याच्या कळीप्रमाणे माझ्या मनाची स्थिती झाली. हातातला खाऊ थोडा-थोडा खाऊन, तो खूप वेळ पुरविणाऱ्या लहान मुलाप्रमाणे मी कंजूषपणे तो आनंद थोडा-थोडा उपभोगीत होतो. मनाच्या गळक्या भांड्यात सुखदु:खं साठवून ठेवता येत नाहीत हे मला माहीत नव्हतं थोडंच! पण सुखाला आचवलेल्या ह्या दरिद्री जगात माणसाच्या मनाचा असाच संकोच होतो.

थोड्या वेळानं संधिप्रकाश कुठून तो झिरपू लागला. आणि पाय आखडून गाढ झोपी गेलेल्या कांदेवाडीतल्या कंगाल इमारतींच्या अंगावरचं अंधाराचं मळकं ठिगळं लावलेलं वस्त्र त्यानं दूर केलं. फाटक्यातुटक्या लक्तरांप्रमाणे दिसणाऱ्या त्या इमारतींच्या कळकट कौलांच्या झिंज्यातून पाणी ठिपकत होतं. आणि खिडक्यांचे डोळे किलकिले करून त्या बावळटपणे पावसाकडे पाहत होत्या. इतक्यात कुठचंसं दार कुरकुरलं, 'ऊं ऽ ऽ ऽ. मी नाही जा!'

मला वाटलं की, कोणाच्यातरी कुशीत डोकं खुपसून आपणदेखील तसंच कुरकुरावं. मी पांघरूणात अधिकच गुरगुटलो, आणि त्या नुसत्या कल्पनेनंच मनातलं समाधान इतकं ओसंडलं की ते कुठं साठवावं ते मला दरिद्र्याला कळेना!

गरम चुलीमागे बसून डोळे मिटून गुरगुरणाऱ्या मांजराप्रमाणे मी कितीतरी वेळ बिछान्यात पडून होतो. पण हळूहळू ती सौम्य प्रसन्नता झिरपून गेली. आणि मनाचं भांडं रिकामं झालं. घड्याळाची टिकटिकदेखील ऐकायला येऊ लागली.

तेवढ्यात घरातल्या दिव्याचं बटन वाजलं. उजेडाचा एक लांबट चौकोन जमिनीवर उमटला. माझी आणि त्याची फार जुनी मैत्री! एके काळी माझ्या आईनं बटन दाबलं की, तो माझ्या अंथरुणाशेजारी येऊन बसत असे. आता बायकोच्या संसारदक्षतेच्या तो हकीगती सांगतो.

थोड्या वेळानं स्टोव्हचं गाणं सुरू झालं. मध्यमवर्गीय संसाराच्या सुखदु:खाचं ते गाणं मी अनेकदा ऐकलं असेल. पण त्या वेळी त्या गाण्यातलं सारं कारुण्य माझ्या हृदयाला जाऊन भिडलं. आणि एका स्निग्ध खिन्नतेचा एकएक थेंब अगदी सावकाशपणे माझ्या मनात ठिपकू लागला.

समाधान आणि खिन्नता ह्यांचं इतकं जवळचं नातं आहे की, माझ्या मनातल्या समाधानाची खिन्नता आणि खिन्नतेचं समाधान केव्हा होतं ते माझं मलाच कळत नाही.

ह्या आळसट, नाजूक अनुभूतीचा डाव कुजेल अशी भीती वाटायला लागली, तेव्हा चटकन उठून गॅलरीत आलो.

वात्रट वारा अधूनमधून आपले ओले हात झाडून पावसाचे शिंतोडे उडवीत होता. वाळत घातलेले कपडे जागच्या जागी खिदळत होते. टेलिफोनच्या तारांवरून भराभर सरकत जाऊन खाली उड्या घ्यायचा खेळ काही थेंबांनी चालवला होता. रस्त्यात मोकळ्या सुटलेल्या एका वासरानं एकदम कान टवकारले, नाक फेंदारलं, आणि आपल्या शेपटीचा गोंडा हवेत झुलवत ते तिरप्या उड्या मारीत उधळलं. आणि एक कुत्रा मारे उसन्या वीरश्रीनं त्याचा पाठलाग करीत मोठमोठ्यानं भुंकू लागला.

आकाशात ढगांचं गढूळ पाणी साठून राहिलं होतं. आणि शेणानं सारवलेल्या टोपलीखाली कोंबडीची पिलं झाकून ठेवलेली असावी, त्याप्रमाणे मुंबईवर ढगांचं झाकण पडलं होतं."

[हाच लेख येथेही वाचता येईल.]