नमस्कार,
हल्ली गावांमध्ये तरुणांची वर्दळ दिसत नाही, नाही का? गावातल्या चावडया, कट्टे, बुजूर्ग लोक व्यापून असायचेच पण तरुणही असायचे. आता तसे दिसत नाही.
तरुण लोक गावात न दिसण्यामागे काय कारण असावे? 'गावात नौकरी मिळत नाही', 'कमाईची साधने नाहीत' - ही कारणे वर पाहता दिसतात. पण खरेच तसे आहे का? आणि असेल तर काय?
खरे म्हणजे आपली शिक्षण पद्धती व्यवस्थित पाहिली ना तर एक मोट्ठा खड्डा दिसून येतो. तो आहे अनुत्तीर्णांसाठीचा! म्हणजे असे की उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकरता एक (धोपट) मार्ग आहे. अनुत्तीर्ण काय करतात बरं? कुणालाच कल्पना नाही, त्यांनी काय करावे याची! हाच तो खड्डा आहे ज्यात आपल्यातले काही पडतात आणि काही वाचतात.
आपल्याकडच्या ग्रामीण भागात हा प्रश्न अजून मोठा आहे. शिक्षणाच्या मार्गातून बाहेर पडलेले तरुण शहरात येतात; शिक्षण नाही म्हणून पुरेश्या संधी मिळत नाहीत आणि ही मुले आणखी खोल अशा आर्थिक संकटात सापडतात. मुळातच आपल्या शिक्षण पद्धतीत बदल हवे आहेत, पण एवढे मोठे बदल करण्याआधी (किंवा करतांना) शिक्षणापासुन वंचित राहणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल?
विज्ञान आश्रमाने या प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यात फार मोठे यश मिळवले आहे. फार वर्षांपूर्वी विज्ञान, अवकाशशास्त्र आणि दैनंदिन कामातील प्रावीण्य (ज्यांना आपण आता बारा बलुतेदारांची कामे म्हणतो) या गोष्टी सारेच विद्यार्थी शिकत. शारिरीक श्रम आणि बुद्धी चातुर्य या गोष्टी सोबत असत. कालांतराने तथाकथीत बुद्धीवादी वेगळे आणि श्रमाची कामे करणारे वेगळे, असे चित्र तयार झाले.
ती जुनी पद्धत विज्ञान आश्रमाने परत आणली आहे. इथे शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी हे शिक्षण अर्धवट सोडलेले किंवा अशाच प्रकारच्या अडणींत सापडलेले असतात. २-३ वर्षांच्या इथल्या शिक्षणानंतर ही मुले स्वत:चा व्यवसाय करण्याइतपत तयार होतात.
यांची प्रावीण्ये नेमकी काय असतात? - 'मोटार(शेतातील) दुरूस्ती', 'ट्रॅक्टर तयार(!) करणे', 'रक्त तपासणी करणे', 'बांधकाम करणे', 'भुजल पातळी तपासणे', 'कुक्कुटपालन करणे', 'गाड्यांची दुरुस्ती करणे'... आणि असेच काही. शहरात तर या साऱ्यांचा उपयोग आहेच, पण गावांतही रोजगार उपलब्ध होतो की नाही? पाबळ गावात एवढी प्रगती आहे की कुठलीही दूरध्वनी यंत्रणा नव्हती तेव्हाच या गावात WLL तंत्रज्ञावर चालणारे एक NET CAFE स्थापण्यात आले. याच गावातील लोक ते अजुनही चालवतात. या कामासाठी लागणारे संगणकाचे ज्ञान इथल्या लोकांना आहे. संगणकाची बांधणी, दुरूस्ती यांना करता येते.
अमेरिकेच्या MIT या शिक्षण संस्थेने विज्ञान आश्रमात एक Fab-lab तयार केली आहे. Fab-lab म्हणजे Fabrication Laboratory. इथले विद्यार्थी जेव्हा एखादे नविन उपकरण तयार करतात तेव्हा, Fab-lab मधे यंत्राच्या सहाय्याने त्याचे पहिले वहिले रूप तयार केले जाते. ही Fab-lab जगातील अत्याधुनिक यंत्रांपैकी एक आहे.
एक उदाहरण द्यायचे तर - 'राम' आणि त्याच्या मित्रांनी आश्रमात एक पोल्ट्री बांधली. त्यांनी काय काय केले? आराखडा तयार केला-म्हणजे Engineering Drawing ची मुलभूत तत्त्वे त्यांनी आत्मसात केली. त्यांनी मोजमाप केले - म्हणजेच त्यांना Engineering Measurements चा अनुभव आला. किती वेळेत काम पूर्ण होइल याचा ताळमेळ बसवला - म्हणजेच जमाखर्च आणि वेळेचे मूल्यमापन झाले. सगळे काम झाल्यावर रंधा मारला - म्हणजेच गुणवत्तेचा पैलू! ...
या सगळ्यामागचा उद्देश काय आहे? - 'विज्ञान आश्रम' हे एक 'Prototype' आहे, एका यशस्वी आणि जुन्याच पण आपण विसरून गेलेल्या शिक्षण पद्ध्तीचे. आपल्या गावांमधली माणसे गावातच सुखाने कशी राहू शकतील, गावांची समृद्धी कशी करू शकतील, याचे गमक शिक्षण पद्धतीमधे आहे. पण असे अनेक विज्ञान आश्रम तयार केल्याशिवाय जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणुनच शहरातून आणि गावांमधुन असणाऱ्या शाळांनी/लोकांनी यात सहभाग घ्यावा.
ही महिती विज्ञान आश्रमाबद्दल बोलत असली तरी विज्ञान आश्रम ही एकच संस्था अशी आहे असे नाही. मला सांगायला आवडेल, की पाबळच्या या आश्रमाला भेट जरूर द्या. चांगली गोष्ट ही की महाराष्ट्रात २५ जि. प. शाळांमधे विज्ञान आश्रमाच्या सहाय्याने हा प्रयोग चालू आहे. मराठवाडा, विदर्भ हे भागही यात आहेत.
ही सर्व महिती थोडी अव्यवस्थित आहे असे मला वाटत आहे. पुढच्या लिखाणात सुधारणा करेन. आपल्याला काही शंका असेल, माहिती हवी असेल तर मला जरूर सांगा.
... अमितराज देशमुख (माझा दू. क्र. ९८५०१४१६७१)