कोडे : सुटकेचा अजब मार्ग

चला , आज एक कोडे घालतो...

एका आटपाट नगरात एकदा चार दरोडेखोरांनी मिळून दरोडा घातला. त्या नगराचे गृहमंत्री आपल्या आर. आर. आबांसारखेच कर्तव्यतत्पर होते, त्यामुळे त्यांच्या खात्याने तीच तत्परता दाखवून त्या चोरांना पकडले आणि न्यायालयासमोर उभे केले. न्यायाधीश महाराज आपल्या मुंबई बाँबस्फोट, मुंद्राक घोटाळा या सारख्या निवडक खटल्यांमध्ये अडकले होते. आणि तशीही या चोराकडून दंड म्हणून २५० वैगरे कोटी मिळणार नाहीत याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी सरळ या चोरांना सोडून द्यायचे ठरवले. पण तसे केले असते तर वृत्तवाहिन्यांनी आठवडाभर भंडावुन सोडले असते, असा विचार करून न्यायाधीशांनी त्या चोरांना एक कोडे घातले. जर त्या चोरांनी कोडे सोडवले तर त्यांना सोडून देण्यात येईल (आणि मिडियाला सुद्धा आडवे करता येईल, इतकी हुशार मंडळी तुरुंगात का ठेवायची असे म्हणून) आणि जर त्यांनी कोडे सोडवले नाही तर मात्र त्यांना पकडून तिहारला पाठवण्यात येईल अशी घोषणा झाली.

ते कोडे खालील प्रमाणे होते. सोबतच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे चार कैद्यांना उभे करण्यात आले. ते सर्वजण एकाच दिशेला बघत होते. त्यांना अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की

पहिला चोर, दुसऱ्या आणि तिसऱ्याला बघू शकतो
दुसरा चोर, तिसऱ्याला बघू शकतो
तिसरा आणि चौथा मात्र कुणालाही बघू शकत नाहीत.
प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक टोपी ठेवण्यात आली होती. त्यांना सांगण्यात आले होते की एकूण दोन पांढऱ्या आणि दोन काळ्या टोप्या आहेत. प्रत्येक जणाला तो स्वतः कुठल्या रंगाची टोपी घालत आहे हे माहिती नाही. आणि त्यांना शिक्षेपासून वाचवण्यासाठी एकच गोष्ट करायची होती, ती म्हणजे आपल्या डोक्यावर कुठल्या रंगाची टोपी आहे ते ओरडून सांगायचे. कुणाही एकाने असे अचूक ओरडले तरी सर्वांची सुटका होणार. अर्थात या साठी नेहमीचे नियम लागू होतेच ते म्हणजे

कुणीही वळून बघायचे नाही किंवा हालचाल करायची नाही
एकमेकांशी बोलायचे नाही
डोक्यातून टोपी काढायची नाही

आता आपल्या सारख्या विद्वत जनांना प्रश्न असा आहे की कोण आपल्या डोक्यावरील टोपीचा रंग कुठल्या क्रमांकाचा कैदी अगोदर ओळखेल आणि का ?

उत्तर अर्थातच व्य. नि. द्वारे पाठवावे ...