पोपटी

  • २ किलो. गोड्या वालाच्या शेंगा
  • १ मातीचा माठ
  • मीठ चवी प्रमाणे
  • बटाटे ३/४
  • कांदे ३/४
  • खरवडलेला नारळ (कांदे, बटाट्यांमध्ये सारण म्हणून)
  • मसाला (सारणासाठी)
  • भांबुर्डीची पाने
  • भरपुर पला-पाचोळा, सरपण
४५ मिनिटे

पोपटी ही एक गावरान पाककृती (?) आहे. शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसुन गरमागरम खाण्यात जी मजा आहे ती शब्दात सांगणे खूप अवघड आहे.
अलिबाग ते रेवदंडा (जि. रायगड) या परिसरात जे वाल पिकतात त्यांना गोडेवाल म्हणतात. अशा वालच्या शेंगा घ्याव्या. ताज्या ताज्या शेतातून काढून आणल्या असतील त फ़ारच उत्तम. (या शेंगा दिसायला थोड्याफ़ार घेवड्याच्या शेंगेसारख्या दिसतात पण आकाराने लहान असतात) या शेंगा अवश्यकता वाटल्यास धुवून घ्याव्या.
बटाटे व कांदे धुवून घ्यावेत. कांदे सोलून घ्यावेत. भरली वांगी करतात त्याप्रमाणे कांदे व बटाटे कापून घ्यावे.
सारण तयार करण्यासाठी खरवडलेला ओला नारळ, मसाला, मीठ, थोडे तिखट चवी प्रमाणे एकत्र करावे. कापलेल्या कांदे व बटाट्यांमध्ये हे सारण भरावे. प्रत्येक कांदा / बटाटा छोट्या सुताने बांधून घ्यावा.
मातीचे मडके घेऊन त्याच्या तळाच्या पाव भागात सर्वात खाली भांबुर्डीचा पाला भरावा. मग त्यावर वालच्या शेंगा, बटाटे, कांदे आणि चवी प्रमाणे मीठ टाकावे. उरलेल्या जागेत भांबुर्डीचा पाला ठासुन भरावा.
सगळे सरपण एकत्र करावे. त्यामधे या माठाला ठेवावे (पाला ठासून भरलेला असल्यामुळे आतले जिन्नस बाहेर येत नाहीत) आणि बिनदिक्कत आग लावून द्यावी. जाळ करतान एक दक्षता घ्यावी, माठाच्या सर्व बाजूंनी सरपण असेल. ३० ते ४० मिनीटे असाच जाळ राहू द्यावा. आपण ठेवलेला माठ लालबुंद झालेला आपणांस आढळून येईल. आशा वेळी त्यावर जळत असलेले सरपण थोडे बाजुला करून माठावर ओंजळीतून पाणी शिंपडावे. पाण्याच फ़ेस झाला तर पोपटी झाली असे समजावे.
काठीने तो माठ बाहेर काढावा. काठीनेच वर भरलेला भांबुर्डीचा पाला काढावा. मग़ शेंगा, बटाटे, कांदे काढून घ्यावे. आणि गरम गरम शेंगा सोलून खाव्या. शेंगा खाल्यावर ३० मिनीटे पाणी पिण्याचे टाळावे.

मी अत्ता माझ्या गावला नागांव येथे गेलो होतो. माझे एक स्नेही श्री. केळकर (रा. चौल) यांच्याकडे गेलो असता पोपटी कशी करतात हे बघण्याचा व खाण्याचा योग आला. तेंव्हाच ठरवलं मनोगत वर ही आगळी वेगळी डिश द्यायची. खरं म्हणजे हे सगळं करणं आपल्या शहरात शक्य नाही. तरी पण नुसतं वाचण्यात देखिल मजा आहे.
या प्रांतातील प्रत्येक शेतकरी एकदा तरी पोपटी करतोच. विशेषतः होळी शिमगा यात पोपटीची धमाल असते. लोकांच्या शेतातील वालच्या शेंगा चोरून त्याची पोपटी लावली जाते.
कुणी सदस्य जर अलिबाग रेवदंडा या भागात असतील आणि या व्यतिरीक्त अजून माहिती कुणास असेल तर जरूर द्यावी. कुणी तेथे गेल्यास जरुर चौकशी करावी.
याच वालच्या दाण्यांची भाजी करतात त्याला डाळींब्या म्हणतात. डाळींब्या म्हणजे तेथील पक्वान्न आहे. माझी आई उत्तम डाळींब्या करते, तिच्याकडून पाककृती घेऊन मनोगत वर निश्चीत पाठवेन.

आनंद भातखंडे ...