रगडा पॅटीस

  • ५-६ उकडलेले बटाटे
  • चिंच मूठभर
  • मिरच्या ७
  • हिरवे वाटाणे(कोरडे किराण्यावाल्याकडे मिळतात ते) कुकरचे ३/४ भांडे
  • कांदे २ मध्यम
  • गूळ सुपारीयेवढा
  • मोहरी, तिखट पूड,मसाला इ.
  • तेल फोडणी आणि परतण्यापुरते
  • सैंधव चिमूटभर
  • बारीक शेव/आलू भुजिया
३० मिनिटे
२ जण

रगडा:
१. वाटाणे संध्याकाळी कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. भिजवताना अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकावा.
२. १२-१४ तासांनी उसळ बनवायला घ्यावी.
३. भिजलेले वाटाणे कुकरमधे मऊ शिजवावे.
४. तेल हळद मोहरी फोडणी करुन त्यात कांदे बारीक चिरुन घालावे आणि हलवावे. अगदी थोडे पाणी टाकून कांदे शिजू द्यावे.
५. आता शिजलेले वाटाणे, मसाला, गरजेप्रमाणे तिखट पूड,मीठ घालून पाणी घालून शिजू द्यावे.
६. वाटाणे चमच्याने दाबून पहावे. सहज दाबले गेल्यावर उसळ शिजली असे समजावे.

चिंचेची  चटणी:
१. चिंच कोमट पाण्यात १ तास भिजू द्यावी. भिजल्यावर त्याचा मुठीने दाबून कोळ काढावा.(बिया आणि शिरा टाळाव्या.)
२. पातळ हवे तितके पाणी, सैंधव, बारीक केलेला गूळ घालून नीट मिसळावे.

मिरचीची चटणी:
१. ४-५ मिरच्या मिक्सरमधे बारीक करुन त्यात मीठ आणि अर्धा पेला पाणी टाकावं.

पॅटीस:
१. उरलेल्या ३ मिरच्या बारीक कराव्या.
२. उकडलेले बटाटे, थोडे कमी मीठ(उसळीत आहेच ना!) आणि बारीक केलेल्या मिरच्या असे मळावे. फार मळू नये अथवा लगदा चिकट होतो.
३. लगद्याची ५-६ सेमी व्यासाची चप्पट पॅटीस करावी. 

अगदी खाण्याच्या वेळी पॅटीस तव्यावर खमंग नारिंगी रंगावर परतावी. बटाट्याचा थोडा खमंग वास आला पाहिजे. पॅटीस चांगली परतलेली असली कि रगडा पॅटीसला छान चव येते. परतून कुरकुरीत झालेले पॅटीसचे कवच, चटणीचा आंबट गोड तिखटपणा.आणि उसळ.वा! सकाळपेक्षा संध्याकाळी हा पदार्थ खायला जास्त मजा येते असे मला वाटते. 
उसळीत २-३ पॅटीस, चिंचेची चटणी, हवा असल्यास कांदा बारीक चिरुन, मिरचीची चटणी आणि वर शेव पसरुन वाढावे. बटाट्याची भाजी व पोळी किंवा उसळ व पोळी यापेक्षा हा पदार्थ अंमळ जास्तच पोटात जातो असे (भेळ गाडीवाल्यांचे!) निरीक्षण आहे.. 

सगळे गाडीवाले