पदोपदी ऊर्जा!

अं? नाही नाही. दर पावलागणिक ऊर्जेबद्दल, ती वाचवण्याबद्दलच्या व्याख्यानांबद्दल मला लिहायचे नाही.

इथे माणसांच्या दर पावलागणिक वीज निर्माण करण्याचा यशस्वी कार्यक्रम कसा केला जात आहे त्याविषयी सांगत आहे.

एमआयटीच्या जेम्स ग्रॅहॅम आणि थॅडियुस यूझिक ह्या दोघा विद्यार्थ्यांनी बोस्टन दक्षिण स्थानकात असा प्रयोग केलेला आहे. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत थेट रूपांतर करण्याचा हा प्रयोग आहे. पावलांच्या दाबाने किंचित वर खाली होणाऱ्या ठोकळ्याची जमीन तेथे बनवलेली आहे. हे ठोकळे परस्परांपासून किंचित वरखाली सरकले की डायनॅमो तत्त्वाने वीज निर्माण केली जाते. पूर्वी सायकलच्या मागच्या चाकला चिकटून फिरणारे डायनॅमोचे उपकरण तुम्ही पाहिलेले असेल. अशा उपकरणात हालचालीच्या ऊर्जेचे विजेत रूपांतर केले जाते.

असे म्हणतात की ६० वॉटचा एक दिवा सुमारे सेकंदभर प्रज्वलित होईल इतकी विद्युत ऊर्जा माणसाच्या एका पावलासरशी निर्माण होते. (अशाच सुमारे २८५२७  पावलांनी एखादी आगगाडी सुमारे एक सेकंद चालवता येईल!)

ह्या आधी इटलीमध्ये एका स्थानकात नमुन्याला असे स्टूल बनवून ठेवले होते. त्यावर बसून उठले की एक फ्लायव्हील फिरायचे आणि त्या ऊर्जेने चार एलईडी लागायचे. लोकांना हे पाहून इतकी मजा वाटायची की ते पुन्हा पुन्हा बस ऊठ करायचे.

हे केवळ प्रदर्शनासाठी संकल्पित नसून एक दिवस प्रत्यक्ष इमारतींमध्ये अशा उपकरणांचा अवलंब करण्याचा मनोदय आहे. सध्या हे जरी बाजारात मिळणाऱ्या तयार भागांपासून बनवीत असले तरी ते महाग आहे. पुढे पुढे स्वस्त मार्ग सापडेल असे वाटते. हे सगळे मी फिजऑर्ग.कॉम ह्या संकेत स्थळावर वाचले . चित्रही तिथलेच आहे.

बोस्टनमध्ये राहणाऱ्या मनोगतींना दक्षिण स्थानकात जाऊन हे सहज पाहून येता येईल, असे वाटते.

खूप पूर्वी एका कारखान्यात मुलाखतीला आलेल्या माझ्याबरोबरच्या एका अभियांत्रिकी उमेदवाराने त्याचा अभियांत्रिकी प्रकल्प असाच काहीसा असल्याचे सांगितले होते, त्याची आठवण मला हे वाचून झाली. मुलाखत घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर त्याचा विलक्षण प्रभाव पडलेला मला आठवतो. त्या प्रकल्पातही त्याने साखरकाऱखान्यात ऊस टाकायला येणाऱ्या बैलगाड्या जेथून जातात त्या रस्त्यात असे उपकरण बसवले होते. त्याने दर बैलगाडी गेली की अशी वीज निर्माण होत असे म्हणतात.

विचार करा अशी उपकरणे जर मुंबईत सीएसटी आणि चर्चगेट स्थानकांच्या दरवाज्यात आणि जिन्यांवर लावली तर केवढा उजेड पडेल, नाही का?!!