चणे खावे लोखंडाचे ... तेव्हा मनुष्य वाचे??

चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे असे काही तरी वचन शाळेत मराठी अक्षरलेखनाच्या वहीत वाचले होते, त्याची मला आज आठवण झाली.

ब्रह्मपदी नाचायला लोखंडाचा उपयोग काय होईल ते जरी अद्याप कळलेले नसले तरी खाण्यात लोहाचे प्रमाण कमी असल्यास रक्तक्षय होतो हे आपल्याला माहित आहे. डब्ल्यू एच ओ च्या अंदाजाप्रमाणे जगातल्या पाच वर्षे किंवा कमी वयाच्या मुलांच्या जवळजवळ पंचमांश मुले, आणि सर्व स्त्रियांपैकी पंचमांश स्त्रिया अन्नात लोहाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनिमियाग्रस्त असतात. विकसनशील देशात ह्यामुळे सदोष प्रसूती, खालावलेली शालेय प्रगती, आणि रोडावलेली उत्पादकता अशा तऱ्हेने आरोग्य आणि अर्थव्यवस्था अशा दोन्ही प्रकारे हे महाग पडते. इंग्लंड सारख्या विकसित देशातही २१ टक्के मुली आणि महिला ह्याने प्रभावित आहेत असे म्हटले जाते.

ह्यावर उपाय म्हणजे खाण्यात लोहाचे प्रमाण वाढायला हवे. विकसनशील देशात लोहसमृद्ध मांस फार महाग पडते. लोहाच्या औषधी गोळ्या ह्या देशांत वितरित करणे जिकीरीचे असते आणि लोकांना त्या खायला नको असतात. लोहाने समृद्ध असे गव्हाचे पीठ किंवा तांदुळ वापरण्याचा अनुभव चांगला आहे.

 लोहसमृद्ध पिकांची लागवड करण्याने लोहविपन्नतेवर विजय मिळवता येईल असे म्हणतात. पिकांच्या जनुकीय अभियांत्रिकीने आणि निवडक प्रजननाने शेतकरी जगातल्या दोन अब्ज लोकांचे भले करू शकतील असे वाटते. जनुकीय अभियांत्रिकीने पिके लोहसमृद्ध करण्याने अन्नातील लोहाची खनिजे पाकप्रक्रियांतून टिकून राहतील,  असे म्हणतात. सोबत दिलेल्या आलेखाच्या चित्रप्रतिमेवर टिचकल्यास, मोठे चित्र दिसेल आणि तांदुळातल्या लोहाच्या वेगवेगळ्या प्रमाणांविषयी अधिक माहिती 'जिज्ञासूं'ना मिळेल! अधिक माहितीसाठी जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या ह्या पानावर जा.

अर्थात हे तंत्रज्ञान वापरण्यात काही अडचणी आहेत. चहासारख्या पेयांमुळे लोहशोषणाला अडथळा येत असल्याने लोहसमृद्ध अन्नाबरोबरच खाण्यापिण्याच्या काही सवयीही बदलायला लागतील असे वाटते. शिवाय अनेक देशांचा अन्नाच्या जनुकीय अभियांत्रिकीला विरोध आहे. तेव्हा सध्या ह्याकडे कुतुहलाने पाहिले जात आहे.

पण मी म्हणतो हरकत काय आहे.  हे तंत्रज्ञान जर उद्या खरोखरच वापरात आले, तर नुसते तांदूळच काय, गहू, ज्वारी, मका आणि हो - चणेसुद्धा - अशा लोहसमृद्ध अन्नाचे सेवन केल्याने वर लिहिलेल्या वीस टक्के बालकांना आणि वीस टक्के महिलांना ब्रह्मपदी नाचता येईल की नाही ते सांगता आले नाही तरी निदान मनुष्यपदी तरी सुखासमाधानाने आणि आरोग्याने 'नाचता' येईल, असे वाटते.

काय म्हणता?

हे सगळे मी सायंटिफिक अमेरिकन च्या ह्या पानावर वाचले. वरील आलेखाचे चित्र जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या ह्या पानावर आहे.

मला समजले,  उमजले ते मी लिहिले आहे. नुसत्या माझ्या सांगण्यावर जाऊ नये. हे संदर्भ वाचावे (आणि त्यावर लिहावे!) आणि माझे काही चुकले असले राहिले असले तर सांगावे, ही विनंती.