शौकीन - तीन हिरवट म्हाताऱ्यांची कथा

Shaukeen DVD: Standard Edition

स्त्रीचे तारुण्य - यौवन म्हणा हवे तर - मर्यादित काळासाठी असते, पण पुरुष हा आयुष्यभर - निदान मनाने तरी - हिरवटच रहातो, अशा अर्थाची एक ग्राम्य म्हण आहे. पंचावन्न -साठीच्या आसपास घोटाळणाऱ्या पुरुषाची हीच व्यथा असते. आता सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. लैकिकार्थाने निवृत्ती सुरू झालेली असते. गृहस्थाश्रम संपलेला आहे, पण वानप्रस्थाकडे बाकी काही केल्या पावले वळत नाहीत अशी सांजवेळेसारखी सैरभैर अवस्था असते. एकीकडे वैवाहिक आयुष्यात आजवर साथ देणारी सहधर्मचारिणी आता 'त्या'तून निवृत्त झालेली असते, तर दुसरीकडे शरीरात आणि मनात कसलीशी भूक अजूनही ढुसण्या देत असते. आसपास घोटाळणारे यौवन परतपरत खुणावत असते. प्रलोभनांकडे मन वळते तर आहे, पण किंचित अपराधी भावनेने. जोवर आपण बाजूला होत नाही तोवर हा तारुण्याचा प्रवाह पुढच्या पिढीकडे जाणार नाही, हे पटते तर आहे, पण... हा 'पण' फार मोठा आहे.'अचपळ मन माझे नावरे आवरीता...'
बासू चटर्जींच्या 'शौकीन' मधल्या तीन म्हाताऱ्यांची हीच कहाणी आहे. त्यांच्या आयुष्याची भरती ओसरली आहे, काहींचे संसार फुलले आहेत, काहींचे विझून गेले आहेत... पण एकंदरीतच उतार सुरु झाला आहे. स्कॉचच्या बाटल्यांच्या जागी आता होमिओपॅथीच्या गोळ्यांच्या बाटल्या आल्या आहेत.सिग्रेटींच्या पाकिटांच्या ठिकाणी मफलर आणि कानटोप्या आल्या आहेत. 'तसल्या' पुस्तकांच्या कप्प्यात आता (बायकोची) जपाची आणि स्तोत्रांची पुस्तके आली आहेत. पांढरे, पिकलेले केस आणि टकले, सुटलेली, ओघळलेली पोटे आणि चष्मे, 'वॉकिंग स्टिक्स' आणि औषधांच्या गोळ्या...पण मन? मन मात्र अद्याप कुठेतरी अतृप्त आहे. खरोखरच सगळे संपले आहे का? आयुष्य सार्थ झाले असेल कदाचित, पण ते संपूर्ण झाले का? शरीर सुखाने भरुन गेले आहे. पण ते काठोकाठ भरले आहे की कदाचित एखादा शेवटचा घोट?
मग ही अस्वस्थ अधिरता कुठूनकुठून डोकावत रहाते. काहीतरी उफाड्याचे दिसते आणि नजर तिथे चिकटून रहाते. एखादा अजाण स्पर्श होतो आणि मग हात तिथे रेंगाळलेलाच रहातो. कुणी 'काका', 'आजोबा' म्हणतं आणि या कारंज्यावर विरजण पडतं. मन हिरमुसून एवढंएवढं होऊन जातं. पण ते क्षणभरच. परत कुठेतरी एखाद्या पैंजणाची छुमछुम ऐकू येते  आणि मन मिटलेले डोळे उघडतं...
पुरुषाची ही चमत्कारिक अवस्था बासुदांनी 'शौकीन' मध्ये अचूक पकडली आहे. अशोककुमार, ए.के. हंगल आणि उत्पल दत्त हे ते तीन शौकीन म्हातारे. हंगलबाबू एका कंपनीत उच्च अधिकारपदी आहेत आणि आपल्या तरुण आणि सुंदर सेक्रेटरीपासून काहीशा वेगळ्या अपेक्षाही  बाळगून आहेत. उत्पल दत्त एका चाळीचे मालक आहेत आणि महिन्यातून एकदा भाडे वसूल करायला जाताना एकट्याच रहाणाऱ्या आपल्या भाडेकरु तरुणीकडून इतरही काही पदरात पडेल अशी उम्मीद बाळगून आहेत. अशोकदा सुखाचे निवृत्त आयुष्य जगताहेत आणि घरातल्या नवीन मोलकरिणीपासून रस्त्यावरुन जाणाऱ्यायेणाऱ्या पोरींपर्यंत सगळ्यांना चवीचवीने न्याहाळताहेत. जवानीच्या गावाला परत एकदा जाण्याची या तीघांची इच्छा तर आहे, पण ते धाडस काही होत नाही. 'क्या सब कुछ खत्म हो गया है?' हा प्रश्न तीघांनाही भेडसावतो आहे, पण त्याचे उत्तर मिळवण्याची काही हिंमत होत नाही. मग सगळे मिळून ठरवतात की चला एकदा सोक्षमोक्ष करुनच टाकू. पण इथे, या गावात नको. लांबवर फिरायला म्हणून जाऊ आणि जे उरलंसुरलं आहे ते सगळं उधळून टाकू...
अशी जिवाचे मुंबई करायला ते गोव्याला येतात. तेही त्यांना अकस्मात मिळालेल्या ड्रायव्हर मिथुन चक्रवर्तीच्या सांगण्यावरुन. मिथुनची मैत्रिण रती अग्निहोत्री गोव्यातल्या एका नाईटक्लबमध्ये गायिका आहे. तिच्याच बंगल्यात हे तीघे मुक्काम ठोकतात. रती स्वभावानं मोकळी आणि बिंधास आहे. या बुढ्ढ्यांना तिचा हा मोकळेपणा म्हणजे आमंत्रण वाटतं. मग ते ठरवतात की रोज दोघांनी मिथुनला घेऊन फिरायला जायचं, एकानं रतीबरोबर बंगल्यात थांबायचं आणि...
आणि काय? अहो, या जवानांचं मन भलेही असेल तरुण, पण शरीर? त्याचं काय? शरीर त्यांना त्यांच्या वयाची, त्यांच्या बुढाप्याची आठवण करुन देतं. आधी एकमेकांपुढं नाचक्की व्हायला नको म्हणून ते गड सर केल्याच्या बाता मारतात, पण शेवटी आपण काहीच करु शकलो नाही याची कबुली देतात. बिचारे शेवटी निसर्गापुढे आपली हार मान्य करतात आणि  रतीसमोर आपला खरा इरादा स्पष्ट झाला नाही यातच सगळं आलं असं मानून खालच्या मानेनं परत येतात. मग आपल्या हातून चुकून झालेल्या या पापाचं परिमार्जन म्हणून कुणी मिथुनला मुंबईत नोकरी देऊ करतं, कुणी या लवकरच लग्न करणाऱ्या जोडप्याला मुंबईतल्या आपल्या चाळीत जागा, तर कुणी आणखी काही...  
पुरुषी फणा ठेचला गेलेले हे म्हातारे आता आपापल्या घरी आले आहेत. पराभूत भावनेनं आणि आता आपण म्हातारे झालो हे मान्य करुन. पण जित्याची खोड अशी थोडीच जाणार?  काही दिवस गेले आणि हंगलबाबू पुन्हा एकदा आपल्या सेक्रेटरीशी गूळपीठ जमवण्याच्या नादात गुंतून गेले, दत्तसाहेब भाडेवसुलीला जाताना पुन्हा आपला पोशाख ठीकठाक करु लागले, अशोकदांना रस्त्यावरुन जाणारं काहीतरी रंगीबेरंगी दिसलं आणि त्यांनी जवळचा चष्मा काढून लांबचा चष्मा लावला...
असा हा हलकाफुलका, गमतीदार 'शौकीन'. जरा नाजूक विषयावरचा पण कमालीच्या संयमानं हाताळल्यानं कुठेही उतू न गेलेला. अशोककुमार, ए. के. हंगल आणि उत्पल दत्त यांच्या सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयानं अधिकच मजेदार झालेला. संपूर्ण साहेबी 'एटिकेट' सांभाळणारे हंगलबाबू, काहीसे रांगडे, चिक्कू आणि कमालीचे अधिर असे दत्तसाहेब आणि मोहात अडकणारे पण आता आपण ती शिखरे ओलांडून पुढे आलो आहोत हे शहाणपण आलेले अशोकदा हे मिश्रण 'शौकीन' मध्ये फक्कड जमून गेलं आहे. अर्धीच सिग्रेट ओढायची हा निग्रह करुन अर्धी तोडून टाकताना हळूहळू तिच्या टोकाकडं सरकणारी बोटं, डाक बंगल्यात स्पेशल मसाजसाठी आलेल्या तरुणीला नाकारताना 'ये डर नही था की कुछ कर न बैठूं, बल्की ये की कुछ कर न पाउं' हा कबुलीजबाब आणि 'जिन चीजोंसे जिंदगी जिंदगी लगती है, डॉक्टर उन्हीं को मना कर देते है' हा चिरंतन संवाद यातून अशोककुमार कायम लक्षात रहातात. 'चलो हसीन गीत इक बनायें' हे रतीबरोबरचे गाणे गाताना त्यांची झालेली दमछाकही अशीच गमतीशीर. 'वही चल मेरे दिल' हे सुरेश वाडकरांचे गाणेही सुश्राव्य आहे. पण सगळ्यात जास्त लक्षात रहाते ते 'शौकीन' मधले आनंद बक्षींचे आर्डीनी संगीतबद्ध केलेले किशोरदांचे सुरेल आणि अर्थपूर्ण गाणे:
जब भी कोई कंगना बोले, पायल छनक जाये
सोयी सोयी दिल की धडकन, सुलग सुलग जाये
करूं जतन लाख मगर मन मचल मचल जाये
यातले 'जीवन से ये रस का बंधन तोडा नही जाये' हे अगदी पटते.