तुझ्या शहरात मी आलो, खुळ्यागत हिंडणे आले
नको त्या सावल्या आता उरी कवटाळणे आले
तुझ्या आल्या सयी काही, तुझ्याजोगे कुणी दिसले
तिथे चमकून माझ्या पावलांनी थांबणे आले
तुला मी भेटलो होतो, दिसांची त्या पळे झाली
खरे आहे, तुझ्यानंतर मला न मोजणे आले
उन्हातान्हात धुंडाया निघालो स्वप्ननगरीला
धुळीच्या ऐवजी कैसे कपाळी चांदणे आले
तुझ्या नुसत्याच स्मरणाने पुन्हा बहरून मी गेलो
मला नव्हते वसंताच्या घरी बोलावणे आले