आऊ-आबा

आज प्रत्यक्ष सोनं देणे तर शक्य नाही पण फोनवर तरी किमान मनसोक्त गप्पा माराव्या म्हणून आऊला फोन केलेला. गेल्या दशमीला सरस्वतीला गोऱ्हा झाला हे ऐकून अत्यंत आनंद झाला पण आऊला त्याच दरम्यान खूपच जबरी मलेरिया झाला होता हे ऐकून का माहित नाही अचानक डोळ्यात पाणी उभं राहिलं. कितीवेळा मनवलं तिला की इकडे शहरातल्या घरी ये, आता आम्हाला सेवा करण्याचा चान्स दे तरी ती ऐकत नाही. माझं मनवणं संपत नाही आणि तिचं नाही म्हणणं संपत नाही. आज मी तिला नेहमीप्रमाणे मनवत होते तर ती म्हणाली,"बंडी, मलेरियात मी गेलेच होते पण दत्तदिगंबराचं अजून काही करणं लागत असेन म्हणून परत आले. तुझे आबा गेले तेव्हापासून मी एकटंच राहण्याचं ठरवलंय बेटा. आता त्यांच्याकडे जाण्याची वेळ जवळ येतेय तर मला माझा निर्णय बदलायला लावू नकोस. तुम्ही जिथे आहात तिथे सुखी रहा.. बस्स मला अजून काही नको. मी जशी आहे तशी ठीक आहे."
तिचं नेहमीचं सडेतोड बोलणं, परक्या शहरी राहतेयस जपून राह्यजोस वगैरे सुनवणं या गोष्टी तिला बोलायची आणि मला ऐकायची सवय झाली आहे. माझे आबा आता हयात नाहीत, त्यांच्याबद्दल कधीमधी बाबा-आऊ यांचं तोंडी बोलणं सोडलं तर दुसरं काहीच नाही माझ्याकडे - या सर्वांची माझ्या मनालाही सतत टोचणी असते. ते किमान प्लँचेटमार्फत तरी बोलतील म्हणून कितीक प्रयोग करून झाले पण ते नाही आले. आजही ते आले तर मला हवेच आहेत.. पण आज आऊच्या तोंडून तिने आबांकडे जायची कल्पना ऐकून का माहिती नाही पण कसंसंच वाटत आहे. कशातच मन लागत नाहिये. आजवर तिने कधी एका शब्दानेही स्वतःहून आबांबद्दल काही बोलायला विषय काढला नव्हता, आज अचानक ती स्वतःहून बोलली आणि तेही असं की काही बोलायलाच सुचेना. एकतर मी माझे म्हणावेत असे नातेवाईकच कमी.. आबांचं सुख तर नव्हतंच माझ्या नशिबात पण आता किमान आऊतरी...