उपासमार

मेसचा डबा खा‌ऊन संपला तेव्हा आपण अंमळ जास्तचं जेवल्याची जाणीव त्याला झाली. काल अर्धवटं राहिलेली एक कथा वाचून संपवली तेव्हा खूप काही चांगलं वाचल्याच्या तृप्तीनं त्याचं मन भरून आलं. त्याला कुणाशीतरी बोलायची तीव्र इच्छा झाली.

रूम पार्टनर अभ्यासाचं पुस्तक समोर धरून फोनवर बोलण्यात मग्न होता. त्यानं स्वतः:चा फोन उचलला आणि वाचलेल्या कथेविषयी आता बोलू शकू अशा एखाद्या मित्राचा नंबर शोधू लागला. नंबर डायल करून त्यानं फोन कानाला लावला.
"हॅलो मी बोलतोय."
"अरे वा! बऱ्याच दिवसांनी."
तो मनातल्या मनात म्हणाला हा शेवटचे दोन फोन विसरला वाटतं. विसरणारंच म्हणा कारण दोन्ही वेळेस पठ्ठ्या मीटिंगमुळे "अरे बिझी आहे. नंतर कॉल करतो" या एक वाक्याच्यावर बोलला नव्हता.
"काही नाही रे... सहजंच... कसं चाललयं तुझं?"
"मस्त मजेत... तुझं काय चाललयं?"
"विशेष काही नाही... नवीन काय वाचलंस?"
"सध्या सर्टिफिकेशनची तयारी चालू आहे. या विक‌एण्डला आहेत पेपर."
"ओके..... म्हणजे बिझी दिसतोयस..."
"हो रे... सध्या जरा बिझीच आहे. मी नंतर कॉल करतो तुला"
"ओके. चल बाय."
"ओके. बाय."
दुसऱ्या एका मित्राबरोबरपण असंच काहीसं संभाषण झालं. तो मित्र जिमॅटच्या तयारीत बिझी होता.
त्यानं लॅपटॉप उघडला आणि गूगल टॉक उघडलं. एक मित्र आणि मैत्रीण असे दोघजणं ऑन ला‌इन दिसतं होते. त्यानं मित्राला "हाय" असा मेसेज टाकला आणि उत्तराची वाट बघत तो थांबला. तब्बल पाच मिनिटं वाट बघितल्यानंतर त्यानं मैत्रिणीला तसाच मेसेज टाकला आणि पुढच्या पाच सेकंदातच तिचं स्टेटस "बिझी" दिसायला लागलं. वेदनेची एक तीव्र कळ त्याच्या काळजात उमटली. आपल्याला टाळत तर नसेल ना ती अशी दाट शंका ये‌ऊन त्याची विचित्र तगमग व्हायला लागली.

तो विचार करू लागला. हे असं आजकाल नेहमीच होतं. एखाद चांगल साहित्य वाचल्यावर, चांगला चित्रपट बघितल्यावर किंवा असंच एखाद्या विषयावर काही बोलावसं वाटलं की कुणी सापडतचं नाही. एवढे मित्र आहेत पण संवादाची भूक बऱ्याच वेळी भागतंच नाही. ज्या व्यक्तींशी खूप बोलावंस वाटतं त्या व्यक्ती आपल्याला टाळताहेत अशी दाट शंका यायला लागते किंबहुना तशा प्रकारचे इशारे त्या लोकांकडून मिळायला लागतात. हे खूपच वेदनादायक असतं. पूर्वी फोन नव्हते त्याकाळी लोक एकमेकांना आवर्जून भेटायला जायचे. तसल्या भेटींमधून मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. आता त्याकाळीसुद्धा नकोशा व्यक्तींची टाळाटाळ होतंच असेल पण एखादं माणूस आपल्याला एवढ्या लांबून भेटायला आलं आहे तर त्याला थोडा वेळ देण्याचं सौजन्य लोकांमध्ये असायचं. मग फोन आले, आणि पाठोपाठ इंटरनेट आयुष्यावर ये‌ऊन कोसळलं. आपल्यासारख्या काही भाबड्या जिवांना वाटलं चला आता मित्र फोन डायल करण्याच्या अथवा मा‌उस क्लिक करण्याच्या अंतरावर आले. पण झालं भलतंच. फोनवर आणि चॅटींग करताना सर्रास खोटं बोललं जा‌ऊ लागलं. आता उगाच त्या फोन किंवा इंटरनेटसारख्या निर्जीव गोष्टींना दोष देण्यात काय हशील. कारण या माध्यमांनी माहिती आदान प्रदान करण्याचा वेग व क्षमता वाढविण्याच्या संदर्भातलं आपलं काम निर्विवादपणे चोख बजावलं. माणसाच्या माहितीची भूक अपेक्षेपेक्षा जास्तचं भागली (अगदी सरकारंसुद्धा माहिती अधिकाराच्या नावाखाली संवेदनशील नसेल अशा म्हणजेच नको असलेल्या माहितीची खिरापत वाटायला लागली). [float=font:brinda;place:top;]पण मग मनाच्या कोठ्या भराभर रिकाम्या झाल्या आणि रित्याचं राहायला लागल्या. एकमेकांच्या संभाषणात माहिती चिक्कार पण संवाद अगदीच दुर्मिळ झाला.[/float] मग इमोशनल कोशंटचा नावाच्या गोष्टीचा शोध लागला. तो वाढविण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरं निघाली.

त्याच्या मनात उलट सुलट विचारांची वर्दळ उडाली.
- "मैत्री" म्हणजे कॉलेजला जायला, किंवा दारू प्यायला, किंवा सिगरेट ओढायला, किंवा पिक्चर बघायला किंवा रूम शे‌अर करायला लागणारी सोबत.
- "प्रेम" म्हणजे (लग्ना‌आधीच्या किंवा लग्नानंतरच्या) सेक्समध्ये संपणारा, जमिनीच्या दोन बोटं वरूनच होणारा रम्य प्रवास.
- "लग्नानंतरचं वेल-सेटल्ड आयुष्य" म्हणजे घर, गाडी, इन्वेस्टमेंट्स, प्रमोशन, मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांचं सेटलमेंट आणि या सर्वांना असलेली प्रतिष्ठेची झालर हे सर्व चढत्या क्रमानं मिळवण्याची आणि सांभाळण्याची एका जोडप्याची प्रचंड पराकाष्ठा.
- आणि "समाधान" म्हणजे योगाच्या व्हिडी‌ओज बघून किंवा योगाच्या तत्सम शिबिरात असंख्य लोकांबरोबर हजेरी लावून, गुरुजींच्या शब्दाबरोबर कानातून आणि प्राणायामच्या खोल श्वासाबरोबर नाकातून आत शिरणारं अद्भुत रसायन.
अशा मजेशीर व्याख्या त्याला सुचल्या. अरबट चरबट खाल्ल्यानंतर मळमळल्यासारखं वाटत तसं त्याला असला सगळा विचार करून वाटू लागलं.

त्याला वाटलं हे सगळं एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून अथवा बोलून सांगायला किती मजा आली असती. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने आपला ब्लॉग उघडला आणि तो टा‌इप करू लागला.