कोणी सांगा सुख म्हणजे काय असतं?

दोन जुळ्या मुली. सारखाच पोषाख, सारखीच चप्पल, अगदी केशभूषाही सारखी. एक आजीबाईंच्या कडेवर तर दुसरी वडिलांच्या. पती-पत्नी, सासू-सासरे आणि दोन जुळ्या मुली असा हा संपूर्ण परिवार पोहचलां होता, एका भव्य प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर.

"उव्यां... अं...उव्यांअ...... उव्यांअ..... अं....."

दोघं बहिणी अगदी एका तालात आणि सुरांत, एकही शब्द नसलेलं गाणं गात होत्या.

"ए सोनू बघ,बघ कोण आहे समोर?" आजीबाई.

"मोनू बघ, सँटा आले आहेत बघ.... ओळखते का तू त्यांना?" वडील.

"सँटा बाबा तुम्हाला भेटवस्तू देतील,खाऊ देतील." वडील.

"अं..... अं....... अं........."

                     जिंगल घंटेचा मधुर नाद जसजसा त्यांच्या कानांवर पडू लागला तसं त्यांचं रडणं कमी-कमी होऊ लागलं. दोघांना सँटाने कडेवर घेतल्यावर त्या शांतच झाल्या आणि गोड हसू लागल्या. त्यांतल्या एकीचे चिमुकले, छोटे पांढरेशुभ्र २ दात दिसू लागले. सँटाने त्यांना यांत्रिकतेने केक दिले आणि तो त्या हास्यात रममाण होऊन गेला. लगेच मुलींच्या वडिलांनी ते क्षण  कचांकचां कॅमेऱ्यात बंद केले.

                     तो दिवस होता, २५ डिसेंबर २००३. ठिकाण होतं, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेचं, खेळाचं मैदान आणि प्रदर्शन होतं , "उत्सव". सालाबादाप्रमाणे ते नाताळच्या वेळेतच भरवलं होतं. नवीन वर्षाच्या निमित्ताने लोकं खरेदी करतात हे ब्रीद लक्षात घेऊन ते प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

                      डोक्यावर पांढऱ्या-शुभ्र केसांचा झुबका, पांढऱ्या गोंड्याची लाल रंगाची टोपी, पांढऱ्या मिशा, पांढरीच दाढी, पोटाला उशी लावल्यामुळे पोट बाहेर आलेलं, सुटलेल्या पोटांवर कपड्याचा पांढरा पट्टा, लाल रंगाचा सैल-ढगळा कोट आणि लाल रंगाचीच पँट घातलेली चर्या म्हणजेच सँटा, सकाळी १० वाजेपासून त्या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर उभा होता. प्रदर्शनाला येणाऱ्या मोठ्या माणसांना हस्तांदोलन करून नाताळच्या शुभेच्छा आणि लहानांना केक 'भेट' म्हणून देत होता. त्याच्या मदतीला त्याची 'केकांची पिशवी' भरण्यासाठी स्वागत कक्षावरची एक 'सुंदर तरुणी' होती. स्वागतकक्षामध्ये केकच्या खोक्यांचा ढिगारा लागला होता. आज्ञेप्रमाणे सँटा फक्त लहान मुलांना आणि चिमुकल्या बाळांनाच केक देत होता. मोठ्यांनाही केक देण्याची इच्छा असून फक्त हस्तांदोलन आणि शुभेच्छा देत होता. सुरुवातीला सँटाच दोघं हातांमध्ये हातमोजे होते. केक काढायला व द्यायला त्या हातमोज्यांचा त्रास होत होतां. मग त्याने ते काढून एका बाजूला ठेवून दिले. त्यामुळे त्याची एक 'तांत्रिक अडचण' पण सोडवली गेली.

                        सुरुवातीला प्रदर्शनाला गर्दी जरा तुरळकच होती. दुपारी २ वाजेपर्यंत सँटाची जास्त धावपळ उडाली नाही. अडीच वाजेला मात्र उभं राहणं अशक्य झालं. त्याने जेवणाच्या सुटीची परवानगी मागितली. ४ वाजेपर्यंत परत येण्याच्या कबुलीवर त्याला सुट्टी देण्यात आली. १५ मिनिटे तर तो अद्भुत पोषाख बदलून, साधारण/नेहमीचे कपडे घालण्यात गेले. मग तो जेवणाला गेला.

                        दुपारी ४ नंतर मात्र गर्दी वाढायला लागली. माणसांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. सँटा पोटात अन्न गेल्यामुळे पूर्वीच्याच उत्साहाने काम करू लागला. प्रत्येक लहान मुलाला केक दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं 'हास्य' तो आपल्या डोळ्यांत साठवू लागला. 'सकाळ-सकाळचा कोवळा सूर्यकिरण', 'हिरव्या झुबक्यांमधून उमललेली कळी' किंवा अजून काही काही ..... असल्या कविकल्पना त्याच्या मनांत आल्याच नाहीत. त्याला दिसत होत ते फक्त आणि फक्त निरागस हास्य. निसर्गाने कदाचित ह्याच सुखासाठी मनुष्याची निर्मिती केली असेल. 'कोणी सांगा सुख म्हणजे काय असतं?' ह्या प्रश्नाला एक छोटंसं उत्तर सापडल्याचं समाधान फक्त त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. जुळ्या मुलींच्या आजीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचं हास्य , त्या मुलींच्या वडिलांच्या शून्य भावना असलेल्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्या लहान गुलाबी ओठांमध्ये उमटलेलं, लहान लहान दोन दात दाखवणारं हास्य ह्यात त्याला फक्त 'उत्तर' दिसत होतं.

                        एका परिवाराने त्यांच्या मुलाचं आणि मुलीचं छायाचित्र सँटासोबत घेतलं आणि त्याचे पैसे देऊ केले. पण 'सँटाची कल्पना' ही प्रदर्शन आयोजकांची असल्याने त्याने ते घेतले नाही. संध्याकाळी ६ नंतर तर प्रदर्शन आयोजकांचं आणि त्यांच्या मित्राचं पूर्ण कुटुंब, सँटाच चमूत सामील झालं.

"अंकल सँटा, अंकल सँटा शाल वुई हेल्प यू ?" आयोजकांची मुलगी.

"वुई विल फिल युवर बॅग विथ केक्स. ओ.के.?" आयोजकांच्या मित्राची मुलगी.

                         सँटाला ह्या चिमुकल्यांचे इंग्रजी बोल फार-फार आवडले.त्याने त्यांची मदत स्वीकारली व त्या चिमुकल्या त्याला एक-एक दोन-दोन केक आणून  सँटाच पिशवीत टाकू लागल्या. ह्या मुळे सँटाची आणि स्वागत कक्षावरील तरुणीची त्रेधातिरपीट जरा कमी झाली. त्या लहानग्या मुलींनी त्याची पिशवी खाली होऊ दिली नाही. जणू काही एक स्पर्धाच लागली होती, लहानग्यांची लहानग्यांशी. बघूया देणारा थकतो की घेणारां? छायाचित्राद्वारे सँटा कुणाच्या 'आठवणींच्या गाभाऱ्यात', 'कुणाच्या बालपणीच्या अल्बमामध्ये' , तर 'कुणाच्या घरातल्या टी.व्ही. वर पोहचला. सँटाला त्या विचाराने सुखाच्या लाटा त्याच्या अंगावर उडत असल्याचा भास झाला. त्या लाटांमध्ये तो चिंब भिजल्यासारखं त्याला वाटू लागलं.

                         दरम्यान सँटाच ओळखीची काही मंडळीही प्रदर्शनाला भेट देऊन गेली. येताना आणि जाताना सँटाकडे टकमका बघू लागली. काही-काही मुला-मुलींनी तर, ' तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय...!' अशी पावतीही त्याला दिली. सँटाने मात्र दाढी-मिशी ठीक करीत फक्त एक 'मिश्किल हास्य' केले आणि हस्तांदोलन करून नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

                          आपल्या पोषाखाची काळजी न करता सँटा लहान मुलांना हसवण्यात  अगदी रममाण झालां. एक मुलगी तर हट्टालाच बसली. ती त्याच्या कडेवर एकदाची जी बसली उतरायलाच तयार होईना. तिला २ केक दिल्यावरही ति त्याला सोडेना. मग झाली का अडचण. पूर्ण १० मिनिटे थांबल्यावर ती स्वतःहून उतरण्यास तयार झाली. सँटाला तिने हस्तांदोलन केलं आणि आईच्या आदेशानुसार बोबड्या सुरांत म्हटलं,'मेली क्लिस्तमस सँटा......'. लहान मुलांनी-चिमुकल्यांनी सँटाला लक्षावधी 'पापे' दिले आणि हस्तांदोलन केले. काहींनी घंटानाद ऐकला तर काहींनी त्याची दाढी-मिशी चाचपून पाहिली. काही त्याच्या अंगा-खांद्यावर खेळले सुद्धा. प्रदर्शनाला येणारे तरुण, सुंदर तरुणी, लग्न झालेली स्त्री-पुरुष, म्हातारे-म्हाताऱ्या ह्यांच्याशी हस्तांदोलन करताना त्याला एक वेगळाच आनंद होऊ लागला. त्याच्या जीवनात असं काही आधी घडलेलं नव्हतं आणि घडणारंही नव्हतं. एक आजी ३ नातवंडासोबत प्रदर्शनाला आलेली होती. तिघा लहानग्यांना प्रत्येकी २ असे ६ केक देऊनही आजीबाईंचं समाधान झालं नाही. त्या आजीबाई म्हटल्या.

"और ३ दो भैय्या, घरपे और ३ बच्चे है उनके लिए चाहिये.. और अगर ये बच्चे रास्ते मे मांगने लगे तो उनको क्या दु ? और तुम तुम्हारे घरसे थोडेही दे रहे हो....प्रदर्शनवालोका खर्चा होगा तुम्हारा थोडी होगा....देदो."

                          एकीकडे होता आजीबाईंचा हपापलेला, स्वार्थी स्वभाव आणि  दुसरीकडे  सँटाला दिसत होतं ते फक्त 'निरागस-निःस्वार्थी हास्य'. एरवी अशा क्षणी संतापणाऱ्या सँटाने अगदी शांतपणे, आजीबाईंना ३ केक देऊ केले.

                            गर्दी आता उच्चांक गाठत होती. सँटाची घाई होत होती. त्याचं शरीर आणि मन दोघंही एका वेगळ्याच चैतन्याने भारावलेले वाटत होते.केकांचे खोकेच्या खोके संपत होते. लहान-चिमुकल्यांची सँटाला मदत चाललीच होती. स्वागतकक्षावरील तरुणी सँटाला खोक्यातून केक बाहेर काढण्यास मदत करीत होती. रात्री ९ नंतर गर्दी जरा कमी होऊ लागली. केकही संपण्यात आले होते. लहानग्या चिमुकल्या मात्र थकल्या नव्हत्या. प्रदर्शनाचे आयोजक स्वागतकक्षाजवळ आले, त्यांनी सँटाची विचारपूस केली आणि शेवटी १०-१२ केक उरवण्यास सांगून ते निघून गेले. पण सँटा मात्र बेभान झालां होतां. त्याला देहाचं, कपड्यांचं कसलं-कसलं भान राहिलं नव्हतं. तो केक वाटण्यात मग्न झाला होतां. लहान मुलांचं हास्य तो क्षणाक्षणाला कुठेतरी साठवून ठेवत होता. शेवटी १० च्या सुमारास केक संपले. जवळपास ५० हजार केक सँटाने दिवसभरात वाटले.पण कोटी-कोटी हास्य त्याने आपल्या काळजात सामावून ठेवले होते. त्याचा चेहरा विलक्षण तेजस्वी झाला होता. सुखाच्या परमोच्च बिंदूवर तो उभा होता. त्याला जगण्याचं समाधान लाभलं होतं. तो तितकाच शांतही दिसत होता. ह्या सगळ्यांत तो १०-१२ केक मागे ठेवण्यास विसरलां.

                            शेवटी १०.३० वाजता रात्री, प्रदर्शनाच्या स्वागतकक्षात ७ व्यक्ती होत्या. आयोजक, त्यांची पत्नी, आयोजकांचे मित्र, त्या मित्राची पत्नी, त्या दोघां परिवारांची 'कन्यारत्ने' आणि सँटा व स्वागतकक्षावरची तरुणी. तरुणीने आयोजकांना केक न उरवल्याबद्दल सांगितलं आणि सँटाने दिवसभरात एकही केक न खाल्ल्याचंही तक्रारवजा सांगितलं. लगेच आयोजकांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवरून त्यांच्या एका मित्राला १० केक आणण्यास सांगितलं. केक लगेच आले. प्रत्येकाने खाल्ले. आयोजकांनी भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्याने सँटाचे चिमुकल्यांसोबतचे छायाचित्र घेतले. त्यांनी त्याला ठरल्याप्रमाणे दिवसभराची कमाई म्हणून ३०० रु. दिले.

 सँटा, सँटाचा वेष बदलून, आपल्या नेहमीच्या पोषाखात बाहेर आला. आयोजकांनी त्याला विचारलं.

"काय करतोस? शिकतोस की नाही? ".

"यांत्रिकी अभियांत्रिकीच्या ३ ऱ्या वर्षाला आहे. तुम्ही ज्या पटांगणावर उभे आहात त्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मी विद्यार्थी."

"मी पण यंत्र अभियंता आहे. तुला आयुष्यात यश मिळो ही सदिच्छा."

स्वागतकक्षावरील तरुणीने सँटाला म्हटलं.

"बेस्ट ऑफ लक. बाय द वे तुमचं नाव नाही सांगितलंत?"

"संदिप विनायक पाटिल..............................."

सँटा मात्र त्याच्या मनाच्या स्वर्गात फिरत होता. त्याला हा सगळा कृत्रिम संवाद ऐकूच येत नव्हता. तो ह्या पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्वच विसरला होतां. आनंदाचा निर्झर झराच जणू त्याच्या चेहऱ्यावर खळाळत होता.

"बाय गुड नाइट संदिप....." तरुणी.

'मी' मात्र कोटी-कोटी हास्य , अनंत पापे, अगणित हातांचे मखमली स्पर्श, न मोजता येणारे व न जाणता येणारे स्वभाव आणि असंख्य प्रकारचे चेहरे मनात साठवून अंडाभुर्जीच्या गाडीकडे निघालो होतो. कुठल्यातरी मोठ्या उपाहारगृहात जाऊन यथेच्छ भोजन करावं असं एक मन सांगत होतं तर एकीकडे जगात ह्याहीपेक्षा मोठं किंवा दुसरं सुख नसेल अश्या आविर्भावात मी शंभराच्या ३ नोटांकडे बघत होतो. [float=font:mohini;place:top;]कसलीचं इच्छा मनात राहिली नव्हती. ह्या क्षणी कुणीही येऊन मला सांगितलं असतं की बाबारे पटेल ते माग, तरी मी त्याच्याकडे कसलीच अपेक्षा केली नसती.[/float] एकवेळ असंही वाटून गेलं की आयोजकांनी मला पैसे न देता, माझ्याकडून 'मला शक्य होईल तितकी' रक्कम ह्या सुखाच्या बदल्यात घेतली तरी चालेल. मी डबल अंडा-भुर्जीची आज्ञा दिली. भुर्जी आल्यावर भुर्जीवर ताव मारला. भुर्जीच्या मिटक्या मारत असताना एक संवाद कानांवर पडला.

"अरे, आज समोरच्या प्रदर्शनामध्ये वसतिगृहातला एक मुलगा सँटा बनला होता म्हणे."

"अरे हो, मी पण गेलो होतो बघायला पण काही ओळखीचा वाटला नाही. जाऊदे कोणी तरी 'पुडी' सोडली असेल.

त्यांना तो 'मी'चं होतो हे सांगण्याचा स्वार्थी विचारही माझ्या मनात आला नाही. कारण "कोणी सांगा सुख म्हणजे काय असतं?" ह्या माझ्या  जन्मापासून चालत आलेल्या प्रश्नाला, छोटंसं का होईना, पण 'उत्तर' मात्र सापडलं होतं. उलट मला माझ्या पोषाखकौशल्याचा अभिमान वाटत होता. भुर्जी खाताना, 'भुर्जी खाणारा सँटा' असा गुदगुल्या करणारा विचारही माझ्या मनात आला.

लेखात मी 'तांत्रिक अडचण' म्हणून एक उल्लेख केला आहे त्यांमागील हेतू असा. २५ डिसेंबर २००३ पर्यंत माझ्या खरखरितं हाताला ह्या जगातील कुठल्याही मुलायम हाताने स्पर्श केलेला नव्हतां.( येथे मुलायम ह्याचा अर्थ मुलीचा हात असा घ्यावा.) हातातील हातमोजांमुळे तो होत नव्हता. तर ही होती तांत्रिक अडचण.

त्या रात्री मी वसतिगृहाच्या पायऱ्यांवर पहाटेच्या ३ वाजेपर्यंत चांदण्या आणि चंद्राकडे बघत बसलो होतो. 'जगात कुठेच सुख नाही' असं म्हणणाऱ्याच्या श्रीमुखात २ लगावायलाही त्याचं मन तयार झालं होतं......!

२००७ च्या नाताळसणाच्या 'मनोगतींना' हार्दिक शुभेच्छा आणि अभीष्टचिंतन, एका 'छोटंसं सुख' सापडलेल्या मनोगतीकडून.