अमर्यादित आनंद ! (भाग २)

"अमर्यादित आनंद ! (भाग २)", मग आधी भाग १ वाचला पाहिजे बुवा. पण अश्या नावाचं लेखन तर आपल्याला कधी दिसलं नाही. मग ही भानगड आहे काय नक्की? त्याचं असं आहे, "कुणी सांगा सुख म्हणजे काय असतं"? ह्या लेखात 'अमर्यादित आनंद' नामिक एक संज्ञा आली होती, त्याला अनुसरून हे दुसरे लिखाण केले आहे.

दिवस होता ५ मे २००७.के.ई.एम. हॉस्पिटल. शस्त्रक्रिया विभाग. सगळीकडे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक ह्यांची तुडुंब गर्दी. आणि एका शस्त्रक्रिया गृहात (ऑपरेशन थिएटरमध्ये) पृथ्वीवरील एका जिवाची, जगण्यासाठीची, आणि तज्ज्ञ चिकित्सकांची, जगवण्यासाठीची... धडपड चाललेली. ही होती "मेंदूची ऍन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया".मेंदूतील रक्तवाहिनी म्हणजेच "अर्टेरी" मध्ये जर रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण झाला असेल, तर तो दूर करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करावी लागते. एक बारीक नळी जी आपल्या शरीरातूनच काढली जाते, तीच्या टोकाला एक छोटासा फुगा लावलेला असतो.तो फुगा, ज्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला आहे त्या जागेपर्यंत पाठवला जातो आणि मग दाब देऊन फुगवला जातो. त्यामुळे रक्तवाहिनीचा आकार वाढतो आणि रक्तप्रवाह सुरळित होतो. हे सगळं घडवून आणायला लागतं उच्च तंत्रज्ञान, तज्ज्ञ चिकित्सक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा.तो ही, ह्या शस्त्रक्रियेच्या केस मध्ये फक्त उपकरणांची किंमत, औषधांची किंमत आणि "स्टेंट" नावाचं उपकरण जे तिथेच सोडलं जातं(मेंदूमध्ये) त्याची किंमत एवढाच.एवढ्यासाठी लागणार होते ३ लाख, ३५ हजार रुपये.

त्या दिवशी,महेश अचानकंच भेटला आणि सहज चहा पीत असताना, सांगायला लागला,

"माझा एक मित्र आहे, चाळीसगावचा, त्याची परिस्थिती गरिबीची आहे. त्याच्या वडिलांची ऍन्जिओप्लास्टीची सर्जरी करायची आहे.त्याच्यासाठी एखाद्या समाजसेवा करणाऱ्या संस्थेकडून निधी मिळवता आला तर बरं होईल".

लगेच मला जगण्यातला "अमर्यादित आनंद" दिसू लागला. मला माझ्या कार्यालयातील 'संजय नवगाळे' ह्यांची आणि त्यांच्या "संवेदना" नामक संस्थेची आठवण झाली आणि मी त्याला मदत करण्याचं वचन दिलं. मी 'संजय नवगाळे' ह्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली, पण त्यांनी सांगितलं की ३,लाख ३५ हजार रुपये, इतकी मोठी रक्कम ते नाही देऊ शकत. त्यांनी मला, "कॉग्न्निझंट फाउंडेशन" कडे मदत मागण्यासाठीचा सल्ला दिला. त्या नुसार मी, एक कॉग्निझंट सदस्य म्हणून, ई-मेल मधून त्यांना विनंती केली. पण बरेच दिवस झाले तरी त्यांच्याकडून मला हवा तसा प्रतिसाद नाही मिळाला.दिवसांमागून दिवस जात होते, शस्त्रक्रियेची तारीख जवळ येत होती, मी स्तब्ध होऊन विचार करत होतो. मला ही थोडं, थोडं हरल्यासारखं वाटायला लागलं होतं. ह्या जगात "पैसा" खरंच खूप महत्त्वाचा आहे, जिथे गरज असते, तिथे तो नसतो आणि जिथे तो असतो तिथे काडीचीही गरज नसते.मी ही परिस्थितीसमोर हात टेकून "कॉग्न्निझंट फाउंडेशन" ला आठवण ई-मेल टाकणं बंद केलं.

माझ्या काकांच्या मुलीचं लग्न होतं, २९ एप्रिलला. शस्त्रक्रिया होती ५ मे ला.मी हार तर मानलेलीच होती, म्हणून मी त्राण घालवण्यासाठी मोठी सुट्टी घेण्याचं ठरवलं आणि मला परवानगीही मिळाली. त्या नुसार मी २८ एप्रिलला रात्री घरी जाणार होतो. पण २८ एप्रिलच्या दिवसा असा काही प्रकार माझ्या आयुष्यात घडला की ज्याने मला "अमर्यादित आनंद" दिला. सकाळी मी कार्यालयात येत असताना 'संजय नवगाळे' मला भेटले, त्यांनी त्या मित्राच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेबद्दल चौकशी केली. मी जरा नाराजीच्या सुरात त्यांना सगळा प्रकार सांगितला. एका वेगळ्याच विश्वासाने त्यांनी मला, एका "डिस्ट्रिबुशन लिस्ट" (लोकांचा समुह) ला ई-मेल करायला सांगितलं.पण मला तर आशाच नव्हती, दिवसभर मी माझ्या प्रोजेक्टच्या कामामध्ये इतका गुंतलो होतो की मला वेळच मिळाला नाही, ई-मेल करायला. संध्याकाळी मी लवकर निघणार होतो, जाता जाता, मी त्या सांगितलेल्या लोकांना, ई-मेल केला. ४-४५ ला मी ई-मेल पाठवला आणि बघतो तर काय १५ मिनिटे माझं आउटलुक अक्षरशः बंद पडलं, आणि ५ वाजता पुर्वस्थितीत आलं, पाहतो तर काय? मला एकूण १६५ ई-मेल आलेले. मी प्रत्येक ई-मेल उघडून वाचू लागलो. कुणी म्हणतं आहे, चेक माझ्या जागेवर येऊन घेऊन जा, कुणी म्हणतं आहे, तुझा अकाउंट नंबर सांग, त्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्स्फर करतो. तर कुणी म्हणतं आहे आम्ही आधी कॅश गोळा करू आणि मग उद्या, परवा चेक देऊ.

"जय कॉग्निझंट", "जय मानवता"....पृथ्वीवर माणूस जिवंत आहे ......!!!! निर्मात्या बघ, बघ तू जे काही निर्माण केलंस ना ते आता भरपूर भयाण ही झालं आहे आणि तेवढंच ते सुंदरही झालं आहे.....!!!! मला अक्षरशः आनंदाचा झटका बसल्यासारखं वाटायला लागलं, आनंदाने उड्या माराव्यात की काय असं वाटायला लागलं. मी ई-मेल मध्ये विशाल वाबळे, रुग्णाच्या मुलाचा मित्र, ह्याचा संपर्क क्रमांक दिलेलाच होता आणि अकाउंट नंबर, माझ्या रूम पार्टनरचा दिलेला होता, त्यामुळे मला लग्नाला जाण्यात काहीच गैर वाटलं नाही. मी संध्याकाळी ६ वाजता, सगळे चेक गोळा करून घरी निघायला लागलो तेव्हा वाटेत मला माझा एक मित्र भेटला.

"अबे वो क्या था ऍन्जिओप्लास्टी वाला मेल? करिब का दोस्त है क्या तेरा"?

"तुझे कैसे मिला वो मेल"? मी म्हणालो.

"अबे तुने पुरी दुनिया को मेल डाला है, वो डिस्ट्रिबुशन लिस्ट एक्स्पांड करके देख..... चल बाय."

मी रात्री, घरी जाऊन परत इंटरनेटवर बसलो तर मला भरपूर मेल्स आलेले. सिंगापुरला कॉग्निझंट साठी काम करणाऱ्या एका सहकाऱ्याचा मेल. मी १० हजार रुपये ट्रान्स्फर केलेले आहेत, प्लीज चेक कर. नेदरलँड हून एका सहकाऱ्याचा मेल, माझे वडील, त्यांची सुद्धा "ऍन्जिओप्लास्टी"ची शस्त्रक्रिया झालेली आहे, ते तुला रात्री कॅश पैसे देतील, तेवढ्या रकमेचा चेक तू, तुझ्या अकाउंट मधून दे. अमेरिकेतील एका सहकाऱ्याचा मेल, मी ५०० डॉलर्स उद्या तुझ्या अकाउंट मध्ये ट्रान्स्फर करेल, प्लीज चेक कर आणि तेवढी रक्कम रुपयांमध्ये रूपांतरित करून चेक दे. वाचून डोळे थक्क झाले. "वैश्विक नागरिकत्व" किती समर्पक उदाहरण आहे हे. अपार आनंदाच्या सागरात माझं मन गिरक्या घ्यायला लागलं. माणूस म्हणून जगल्याचं सार्थक वाटायला लागलं. मग मी, सगळे चेक विशालकडे सुपूर्त केले आणि परत विचार करायला लागलो, माझं घरी जाणं आवश्यक आहे का? माझं इथे असणं महत्त्वाचं आहे का? पण मग मी जास्त विचार केला नाही. शनिवार, रविवार कार्यालयाला सुट्टी असल्याने, कुणाचे मेल्स आले नाहीत. मी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन माझे मेल्स आणि अकाउंट मधील रक्कम चेक केली.खरोखर लोकांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवलेला होता. चेक रुग्णाच्या नावे न काढता, डीन के.ई.एम हॉस्पिटल, मुंबई ह्यांच्या नावे काढायचा होता. जे जे, चेक मी दिले, त्यांची एक झेरॉक्स प्रत मी माझ्याकडे ठेवून घेतली.

सोमवारी, मला कार्यालयामधून एक फोन आला. त्यांनी बरीच चौकशी केली. खरंच ही शस्त्रक्रिया आहे का? रुग्णाची परिस्थिती खरंच खराब आहे का? अश्या स्थितीत काय कुणास ठाऊक कुठून मला बुद्धी सुचली आणि मी बोलू लागलो अर्थातच त्यांचं बोलणं संपल्यावर. समोरून एक ४०-४५ वर्षांची बाई बोलत होती हे मी हेरलं होतं.

"माझा इंजिनियरींगचा एक मित्र आहे. त्याच्या गावाकडचा मित्र म्हणजेच रुग्णाचा मुलगा. त्याने बी.एस्सी केलं आहे आणि तो नोकरीच्या शोधात आहे. रुग्ण एका स्थानिक पतपेढीत काम करतो. मी रुग्णाला किंवा त्यांच्या मुलाला अजून पाहिलेलं नाहीये.माझ्या स्वतःच्या मित्राची कळकळ बघून मला त्याला मदत करावीशी वाटली म्हणून मी मेल केला. माझ्याकडे आता फक्त, एकच पुरावा आहे आणि तो म्हणजे विशाल वाबळेची कळकळ. आणि चेक हा "डिन" च्या नावे इश्यू करावयाचा असल्याने त्यात कुणाचाही असां वैयक्तिक फायदा नाही". एवढं बोलून मी थांबल्यावर मोठा श्वास घेतलां. बाईंना माझं म्हणणं पटलेलं होतं, त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टच्या सगळ्या सभासदांना पैसे जमवण्यासाठी विनंती केली होती.त्यांनी ११ हजार,५०० चा चेक विशालकडे सुपूर्त केला होता.मी माझ्या गावी असताना मला माझे मेल्स चेक करणं शक्य नव्हतं, म्हणून मी माझ्या कार्यालयातील मित्र, विशाल पुराणिक ह्याची मदत घेण्याचं ठरवलं. तो कॉग्निझंटच्या फोनवरून मला फोन करायचा आणि मग मी त्याला माझ्या मेल मधून आलेल्या मेल्सला उत्तर करायला लावायचो. आणि हे करत असताना आम्ही तास-तास फोन वर बोलायचो. माझ्या घरच्यांना पण मग हळूहळू समजायला लागलं की चिरंजीव काय प्रताप करता आहेत तर? नाही तर त्यांना वाटायचं एवढे फोन म्हणजे कुणातरी मुलीचेच असले पाहिजेत.

७ मे ला मी इकडे पुण्यात परत आलो. तो पर्यंत शस्त्रक्रिया झालेली होती. एकूण १ लाख ८ हजार ५०० रुपये आम्ही मिळवून दिले होते.उरलेली रक्कम त्यांनी स्वतः टाकली होती आणि काही रक्कम त्यांनी कोणत्यातरी संस्थेतून घेतली होती.तरी मला मेल्स येणं बंद नव्हतं झालं, लोकं मला सांगायला लागली की, जरी शस्त्रक्रिया झालेली असली तरी नंतरच्या खर्चासाठी पैसे देतो.मी ते घेणं नाकारलं, कारण आता मी काही डीन च्या नावे चेक देऊ शकत नव्हतो. ज्या,ज्या लोकांनी माझ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते आणि मी त्यांच्यासाठी चेक दिले होते, त्यांना मी झेरॉक्स स्कॅन केलेले चेक ई-मेल द्वारा पाठवले. सगळ्यांना लक्ष-लक्ष धन्यवाद देणारा ई-मेल टाकला आणि मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटू लागलं.

माणूस जिवंत आहे रे बाबा.....!!! हेलेन केलर ने वयाच्या ११ व्या वर्षी, तिच्यासारख्याच अंध, बहिरा आणि मुका असलेल्या एका गरीब मुलाच्या शिक्षणासाठी पैसे गोळा केले होते. तिला ओळखणाऱ्या सगळ्या लोकांना विनंती केली होती पैसे देण्याची. त्या मुलाच वय होतं, केवळ ६ वर्षे. ह्या ओळी वाचताना माझं मन सुन्न झालं होतं. ११ वर्षाचा असताना काय करत होतो मी? गोट्या- भोवरे खेळत होतो.आणि मला दुसऱ्यासाठी जगायची बुद्धीही वयाच्या २४ व्या वर्षी यावी? मी ०.०१ % जरी हेलेन केलर बनू शकलो म्हणजे माझ्या मनुष्य म्हणून जगण्याचं सार्थक झाल्यासारखं होईल.