"अमर्यादित आनंद ! (भाग ३)"

मला अजूनही आठवतं, साधना शाळेचं पटांगण, मूल्यशिक्षणाचा तास.... आणि बी. जी. आबा म्हणजे आमच्या मुख्याध्यापकांच भाषण....

"मी लहान असताना माझ्या हातेडच्या शाळेत, ५ वीत ४ झाडं लावली होती, त्यातली २ तोडली गेली, पण २ झाडं आज ही दिमाखानं उभी आहेत....मला जगाला काहीतरी दिल्याचा आजही अभिमान वाटतो". आबा बोलत होते. माझ्या कानांत कुणीतरी लोहरस ओतत आहे असं वाटायला लागलं, आपल्याला का नाही सुचलं झाडं लावायला? आबांना कसं काय सुचलं हे? की त्यांना कुणी सांगितलं असेल तसं करायला? आज मी इथे पटांगणात लावू शकतो का झाडं? पण मी तर आता १० वीत आहे, मग मी शाळा सोडल्यावर कोण काळजी घेईल त्या झाडांची? आपण ५ वीत असताना काय करत होतो? आबा मी ५ वीत असताना तुम्ही इथेच होतात मग का नाही सांगितलं आम्हा सगळ्या मुलांना तुम्ही असं त्या वेळी? आजच का? कारण तसं सांगायला एक व्यासपीठ लागतं आणि ते उपलब्ध झालं आहे , सरकारने सुरू केलेल्या मूल्य शिक्षणाच्या तासामुळे.

१० वी नंतर, १९९९ ते २००१ तर मी शैक्षणिक जबाबदारी (११ वी, १२ वी) सांभाळण्यात मशगुल झालो. २००१ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे मध्ये आल्यानंतर काही तरी करावं असं वाटायला लागलं. आबांची वाक्ये आठवू लागली. फेब्रुवारी २००२ मध्ये, मी द्वितीय वर्षाला असताना, वसतिगृहाच्या आवारात २ आंबे लावायचं ठरवलं. शासकीय कृषी-महाविद्यालयाच्या रोपवाटिकेतुन केशर आंब्याची २ रोपं, मी विकत आणली. २ पैकी १ रोप मी मेसच्या समोर लावलं, आणि दुसरं 'आय-ब्लॉक' नामक इमारत ,जिच्यात मी त्या वर्षी वास्तव्यास होतो, त्या समोर लावलं. जेणे करून मला त्या दोघं रोपांची काळजी कधीही घेता येईल. त्या पैकी, १ रोप लावल्यानंतर ३ ऱ्याच दिवशी, समाजविघातक घटकांनी तोडलं. माझ्या अक्ख्या जीवनातलं पहिलं सामाजिक काम आणि त्यातही, समाजकंटकांनी अडथळे आणावेत का? मी भरपूर रडलो, माझ्या एका मित्राला भेटलो, हृषीकेश हुंबे ज्याने, स्पंदन नामक सामाजिक संस्था स्थापन केली. त्याने माझं, त्याच्या शब्दात सांत्वन केलं. " झाड लावताना ते जगतीलच अशी आशा ठेवू नये. आपण फक्त आपलं काम करत राहायचं". २ वर्षे मी उरलेल्या रोपाची काळजी घेतली, मेसमधल्या मग्ग्याने मी पाणी टाकत असे( बादली नसताना). " ये मेस जवळचं झाड तू लावलं आहेस का"? " तू घरी जाताना मला सांगून जात जा, मी टाकून देत जाईल झाडाला पाणी. अशी किती तरी 'माणसं' मला भेटली. २ वर्षात ते रोप, एका माझ्याएवढ्या उंच झाडात रूपांतरित झालं. मला निर्मितीचा खूप खूप आनंद झाला. त्या झाडाला मिठी मारावी असं वाटायला लागलं. पण मी ह्या आवारातून जगाच्या आकाशात झेप घेणार तेव्हा ह्या झाडाची काळजी कोण घेणार? ती पण काळजी लवकरच दूर झाली. तिथे झाडाच्या समोरच्या मेसमधल्या कामगारांनी मला त्या झाडाची काळजी घेण्याचं आश्वासन दिले आणि मी चिंतामुक्त झालो. महाविद्यालयाने मला पोटापाण्यासाठी नोकरी दिलेलीच होती ( कॉग्निझंट, पुणे). जगावेगळं असं काही करायचंच, असं मनाशी ठाम करून मी २४ जून २००५ रोजी वसतिगृहाच्या बाहेर पडलो. मला ३० डिसेंबर २००५ ला कॉग्निझंट मध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते म्हणून मी ह्या सुटीचा पुरेपूर वापर करून घेण्याचं ठरवलं.

गावी आलो तेव्हा, शाळा नुकतीच सुरू झालेली होती. शेतकरी पावसाची वाट बघत होते. शाळेच्या पटांगणातील बरीच झाडं नष्ट झाली होती. मी इथे शिकत असताना भरपूर झाडं होती. मी ते दिवस परत आणीन, मी इथे भरपूर झाडं लावेल. त्यांची जोपासना करेल. ठरलं, मी , मुकेश आणि प्रशांत कामाचा आराखडा तयार करू लागलो. आपण साधारणतः पहिला पाऊस पडल्यावर झाडं लावायची. त्या झाडांची मी डिसेंबर २००५ पर्यंत काळजी घ्यायची आणि त्या आधी शाळेतील विद्यार्थ्यांना ही झाडं 'दत्तक' द्यायची. आणि 'दत्तक'  देताना ५ वी, ६ वी च्या विद्यार्थ्याला प्राधान्य द्यायचं. रोपं शासकीय रोपवाटिकेतून आणायची.हे सगळं करताना होणारा खर्च आपल्याच खिशातून करायचा. झाडं लावल्यानंतर त्यांना गुरा-ढोरांना खायला उघड्यावर न सोडता त्यांना कुंपण उपलब्ध करून द्यायचं. आणि ह्यातून एकही झाड जगलं नाही तरी चालेल, पण एक छोटा प्रकल्प केल्याचा अनुभव म्हणून आम्ही ह्या कामाकडे बघू लागलो. आणि भविष्यात आपण मोठा प्रकल्प करूच तेव्हा आपल्याला हा अनुभव भरपूर कामाला येईल.

खिशात २० रु. घेऊन मी घराबाहेर पडलो, एक वेगळीच ऊर्जा मला मिळाली होती. मी निघालो होतो, एरंडोलला, तालुक्याच्या गावी, शासकीय रोपवाटिकेत. पहिली फेरी तशी वाया गेली नाही. मला तिथल्या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्या प्रमाणे मी त्यांना संपर्क करून उद्या भेटण्याची विनंती केली.दुसऱ्या दिवशी परत निघालो, भेटलो, त्यांना पूर्ण संकल्पना सांगितली, मी कोण? काय शिक्षण झालं आहे? वगैरे माहिती मी त्यांना सांगितली. त्यांना संकल्पना आवडली. त्यांनी पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं. "२ दिवसांनी येऊन रोपं घेऊन जा, येतांना गाडी घेऊन ये म्हणजे सहज नेता येतील". त्यांचं हे वाक्य ऐकलं आणि मी काम फत्ते झाल्याचा निःश्वास सोडला. संध्याकाळी लगेच मुकेशला ही बातमी सांगितली. मी, मुकेशने लगेच, कमलाकर ( जो आमच्या पेक्षा कामाला जरा चांगला आहे) च्या मदतीने खड्डे खोदून घेतले. आम्ही जवळ-जवळ १०० खड्डे खोदले. मुकेश म्हटला एवढी रोपं भेटतील का? मी म्हटलो तसं त्यांनी सांगितलं नाहीये, पण आपण खड्डे खोदून ठेवूया. रात्री आम्ही कितीतरी वेळ शाळेच्या पटांगणात बसून योजना आखत बसलो होतो. झाडांची लागवड आपण त्याच मुलांकडून करवून घ्यायची ज्यांना आपण झाड 'दत्तक' देणार आहोत.

मी व मुकेश १०० रु. खिशात घेऊन एरंडोलला आलो. साहेबांनी ८० रोपं देण्यास होकार दिला, पण....पण??? त्यांनी सांगितलं की ही रोपं आम्ही कमी दरात विकतो, म्हणजे ३ रु. ला एक प्रमाणे त्या प्रमाणे तुम्हाला पैसे द्यावे लागतील. ही रोपं आतापर्यंत आम्हाला फुकटच मिळतील अशी माझी व मुकेशची धारणा होती, पण त्या संकल्पनेला सुरुंग लागला. मी त्यांना सांगितलं माझ्याकडे आता पैसे नाहीत, मी तुम्हाला नक्की पैशे आणून देईन. आमच्याकडे ही रोपं नेण्यासाठी फक्त १०० रु. आहेत. मग त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी भरपूर प्रकारची रोपं काढून दिली. लगेच तिथे एक टाटा-४०७ वाहन आलं जे भडगावला रोपं घेऊन जाणार होतं. भडगावला आमच्या गावावरून म्हणजे कासोद्यावरुनच जावं लागतं. लगेच माझ्या डोक्यात प्रकाश पडला, "साहेब आम्ही ह्या गाडीत जागा असेल तर आमची रोपं घेऊन जातो, मग तुम्हाला आम्ही हे १०० रु. देऊ शकतो. साहेब म्हटले," तुम्ही चांगलं काम करता आहात......माझा हातभार त्याला लागला तर मला बरं वाटेल, तेव्हा तू मला आता पैशे देऊ नकोस आणि ही रोपं ह्याच गाडीत घेऊन जा".

मी व मुकेश गाडीच्या केबिनमध्ये बसलो. गाडी शाळेच्या वळणाकडे वळाली तेव्हा मला असं वाटायला लागलं, की मी जग जिंकून आलो आहे, माझी मिरवणूक माझ्या गावात आली आहे आणि मी जिंकलेलं जे- जे काही आहे ते दाखवायला आता निघालो आहे." गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र, सूर्य, तारे....." ह्या शाळेनेच मला 'मानवता' शिकवली, ह्या शाळेनेच मला माणूस बनवलं. आणि मी घेऊन आलो आहे, ८० रोपं ....माझी 'मुलं' ..... मुकेश,प्रशांतची मुलं ह्या शाळेचे पांग फेडण्यासाठी. आकाशात पक्षी घिरट्या घेतो, त्याला घिरट्या घेताना जसं वाटत असेल त्याप्रमाणेच माझं मन शाळेच्या विश्वात घिरट्या घेऊ लागलं. शाळेच्या प्रयोगशाळेत आम्ही एक-एक रोप उतरवून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि मुकेश रोपणाच्या कामाला लागलो. त्या आधी मी सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना "पर्यावरण आणि आपला सहभाग" ह्या विषयावर माझे विचार सांगितले. मी प्रत्येक वर्गात जाऊन 'झाड दत्तक' घ्यायला उत्सुक विद्यार्थ्यांच्या जोड्या बनवून त्यांना बाहेर पटांगणात पाठवू लागलो. मुकेश त्या जोडीच्या हस्ते रोपं लावू लागला. अशी एकूण ५७ झाडं आम्ही शाळेच्या पटांगणात लावली. संध्याकाळीच वरूणराजाने आमच्या इवल्या- इवल्या मुलांना चिंब भिजवून जणू काही अंघोळच घातली. आम्ही कितीतरी वेळ त्या पावसात भिजत गप्पा मारत उभे होतो, झाडांना आता संरक्षण कसं द्यायचं हा विचार करीत.

मी, मुकेश आणि कमलाकर सकाळीच कुऱ्हाड घेऊन निघालो. सृष्टीच्या एका घटकाचं रक्षण करायला आम्ही निघालो होतो, त्याच्याच भाऊबंदांवर कुऱ्हाड चालवायला. काटेरी झाडांचे जाड दांडे तोडून प्रत्येक झाडाभोवती ३ असे आम्ही कुंपण तयार करायला लागलो. सगळ्या झाडांना कुंपण तयार करायला जवळ-जवळ ४ दिवस लागले. कुंपणाभोवती अजून संरक्षण म्हणून आम्ही बोराचे काटे लावले. पावसाळा संपून हिवाळा लागला. झाडांना पाण्याची गरज भासू लागली. मी केबीएक्स मध्ये तूर्त डिसेंबर पर्यंत नोकरी पत्करलेली होती. तरी मी संध्याकाळी येऊन झाडांना पाणी घालत असे. शाळेसमोरची लोकं म्हणत, आता भरशील पाणी, पण उन्हाळ्यात पाणी कुठून आणणार? तेव्हा तर इथे माणसांना प्यायला पाणी नसतं. तो ही एक प्रश्न आ वासून उभा होता. मी एके दिवशी झाडांना पाणी घालत असताना , मुकेशने पाहिलं की एक झाड अगदी जमिनीच्या टोकापर्यंत, कुणी तरी तोडून टाकलं आहे. मला पाहिल्यावर रडू आल्यासारखं झालं. एवढं कुंपण लावूनसुद्धा काटे बाजूला सारून कुणी तरी ते उपटलं होतं.मुकेश मला म्हटला, " तोडताना दिसला असता ना तर त्याचा हात नाही तर पाय इथेच तोडला असता". मी शांत.विचारमग्न. २-३ महिन्यांनी मी जेव्हा शाळेत फिरायला गेलो त्या वेळी त्या उपटलेल्या झाडाच्या ठिकाणी, त्याचे जे खोड जमिनीत राहिलं होतां त्याला लागून इवलंसं रोप बाहेर आलेलं होतं त्याला हिरवी पानं ही आली होती.ते माझं मुलं पुन्हा जगायला लागलं होतं. त्या झाडाने मला "धर्म" म्हणजे काय हे शिकवलं.

धर्म म्हणजे काय? झाडांचा धर्म कुठला? माझा धर्म कोणता आहे? झाडांचा धर्म हा की स्वतः साठी जगणं आणि जगता-जगता इतरांसाठी जगणं. कार्बन-डाय-ऑक्साइड घेणं आणि जीवनावश्यक ऑक्सिजन देणं, उन्हात सावली देणं, फळं देणं, फुलं देणं.ते झाड उपटणाऱ्याला ते झाड कधी विचारायला गेलं का की का रे बाबा तू तोडतो आहेस मला? का मला अलग करतो आहेस माझ्या इतर घटकांपासून? त्याने त्या माणसाचा प्रतिशोध घेतला का? त्या झाडाने त्याचा "जगण्याचा आणि जगवण्याचा धर्म" सोडला नाही. त्याने स्वतःच नवनिर्माण केलं, परत ते उभं राहिलं. मला गांधीजींच्या 'अहिंसेचा' अर्थ स्पष्ट समजला.

माझा धर्म आहे मानवता. मी आहे ह्या विश्वाचा नागरिक. मी माणूस म्हणून जगणार, ह्या हातांनी पडेल ते कष्ट करणार, राब-राब राबणार आणि मी एक 'वृक्ष' बनणार. वृक्षाची मुळं जमिनीत पाणी शोधतात, शोषतात, त्यांनी झाडाच्या पानांना , फळांना, फुलांना कधीही पाहिलेलं नसतं. जितकी मुळं महत्त्वाची तितकीच पानं सुद्धा. पानं प्रकाश संश्लेषणाचं काम करतात आणि प्रकाश संश्लेषणातून ऑक्सिजन बाहेर पडतो. माझे हात म्हणजे 'मी' ह्या वृक्षाची मुळं बनतील, ती मी माझ्यासाठी अन्न मिळवण्यासाठी वापरेन.आणी 'मी' ह्या झाडांची पानं म्हणजे माझ्या संपर्कात येणाऱ्या 'चांगल्या व्यक्ती, माणसं'. जी मला माझ्या प्रत्येक सामाजिक कार्यात मदत करतील. आणि ही 'पानं' जे काही 'प्रकाश-संश्लेषण' करतील त्यातून 'ऑक्सिजन' म्हणजे 'समाज-उपयुक्त उपक्रम' बाहेर पडतील.

२ जडून खाक झालेली झाडं, एक तोडून टाकलेलं झाड काय सांगतं मला? धर्म सोडायचा नाही कुठलीही परिस्थिती आली तरी. नवनिर्मितीचं वाण प्यायचं. झाड मारायला गेलं नाही त्या झाड तोडणाऱ्याला किंवा गवत जाडतांना २ झाडांची राख करणाऱ्याला. मग मी चिडून काय करू? चिडून काय फायदा? माझ्या सामाजिक कार्यात अडसर निर्माण करणाऱ्यांकडे तर मी लक्ष सुद्धा देणार नाही. ते कोण आहेत? काय आहेत? ते असं का करतात? का वागतात? हे शोधत बसणार नाही. कारण एकच..... "मेन आर नॉट बॉर्न,दे आर मेड". मी जन्मजात माणूसच होतो, इतर लोकंही असतात. मी आजही माणूस आहे कारण माझ्या आजूबाजुची लोकं तशी होती. ह्या समाजामुळेच मी असा घडू शकलो. माझ्या आई-वडिलांनी, माझ्या शाळेने मला माणूस बनवलं. इतर लोक पण तशी बनतात कारण त्यांच्या आजूबाजुची लोकं तशी असतात. माझ्या ११ वी च्या 'जोशी' सरांच्या कडक भाषेत सांगायचं तर, " इट इज नॉट युवर फॉल्ट, इट इज "मॅनुफॅक्चरिंग कंपनीज फॉल्ट".

ही माझी ३५ मुलं, मुकेशची मुलं, साधना शाळेच्या विद्यार्थ्यांची दत्तक मुलं, दिमाखाने साधना शाळेच्या पटांगणात उभी आहेत, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ओरडून सांगायला, की जग खूप सुंदर आहे, जगणं तर त्याहूनही सुंदर आहे. आणि कुठलही काम करतांना मी एका निराळ्या विश्वासाने बाहेर पडेल निसर्ग मला साद देत आहे हे मनात ठेवुन. कारण मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही १०० खड्डे खोदले होते पण आम्ही फक्त ५७ झाडं लावली होती. बाकी २३ झाडं शिक्षकांनी घरी नेली होती. आणि ३५ आज जिवंत आहेत. उरलेल्या खड्ड्यांकडे मी एकदा गेलो, तेव्हा मला निसर्गाची साद बघायला मिळाली. काही-काही खड्ड्यांमध्ये आकाशात उडणाऱ्या पक्ष्याची विष्ठा पडून तिथे निंबाची छोटी-छोटी झाडं जन्माला आली होती. आणि विशेष म्हणजे बरोबर खड्ड्याच्या मध्यभागिच.काही-काही ठिकाणी बाजुला उगून आली होती. निसर्गाने मला हात दिला होता, प्रतिसाद दिला होता, तु काम करत रहा.

अमर्यादित आनंद क्रमशः

-संदिप विनायक पाटील.