ने मजसी ने दूर ऑनसाइटला...

१३ नोव्हेंबरची ती रम्य सकाळ. माझ्या दृष्टीने रम्य म्हणजे कुठलीच घाई-गडबड नसलेली, सकाळी उठल्यावर निवांत वर्तमानपत्र वाचू देणारी (अर्थात आरामात सोफ्यावर लोळत किंवा खुर्चीवर तंगड्या पसरून नव्हे; कुठे ते चाणाक्ष समानुभवी मंडळींच्या लक्षात आले असेलच) आणि आमच्या कंपनीची सकाळची पहिली बस आणि त्यात खिडकीजवळची जागा मिळवून देणारी...माझ्या 'रम्य सकाळ'च्या अजून कुठल्याच दुसऱ्या कल्पना नाहीत. कार्यालयात आल्यावर देखील कामाच्या फार किचकट ई-मेल्स नसणं, वेळेत सगळी कामे आटोपून घरी पोहोचता येईल अशी आणि एवढीच कामे असणं, कुठलीच मीटिंग किंवा ध्वनीबैठक (कॉल असेही म्हणतात याला संगणक प्रणाली विकास क्षेत्रात) नसणं वगैरे 'रम्य सकाळ' अधिक रम्य करणाऱ्या बाबी असतात. अशा रम्य सकाळी सगळ्या ई-मेल्स वाचून झाल्यावर आणि दिवसभराच्या कामाचे स्वरूप आणि लागणारा एकूण वेळ लक्षात आल्यावर मस्तपैकी एक 'सॉलिटेअर' चा खेळ टाकला की त्या रम्य सकाळीला चार चाँद लागतात. अशीच काहीशी १३ नोव्हेंबरची सकाळ होती. पहिली बस मिळाली, खिडकीजवळची जागा मिळाली, पुणे टाईम्समधल्या चटकदार बातम्या वाचता-वाचता आणि 'आकर्षक' छायाचित्रे बघता-बघता केव्हा हिंजवडीला (दुर्दैवाने याचे नाव आता हिंजेवाडी झाले आहे. तसेच बावधनचे बावधान आणि सांगवीचे संघवी! ) येऊन पोहोचलो ते कळलेच नाही. कार्यालयात माझ्या जागेवर येऊन बसलो आणि ई-मेल्स वाचू लागलो. हळू-हळू लोकं यायला सुरुवात झाली होती. ई-मेल्स वाचता-वाचता एका ई-मेलवर येऊन ठेचकाळलो. केवळ विषयओळीत एक छोटासा निरोप होता. शेवटी <इओएम> असे पण होते. इओएम म्हणजे 'एंड ऑफ मेसेज' चे संक्षिप्त रूप. फक्त विषयओळीत निरोप दिला असेल तर त्याच्या शेवटी एओएम> लिहिण्याचा प्रघात आहे जेणेकरून वाचणाऱ्याचे कष्ट आणि वेळ वाचावेत आणि पाठवणारा जर खूप कामात असेल तर त्याचा ही वेळ वाचावा. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांवरून असे वाटते की असल्या निरोपांमुळे वाचणाऱ्याचा गोंधळ वाढतो, त्याला मिळालेल्या निरोपाचा नीट अर्थबोध होत नाही, त्या निरोपाचं प्रयोजन कळत नाही. एकदा असाच एका व्यवस्थापकाचा निरोप मला आला. त्यात होते, 'व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ? इओएम>'. आता या गृहस्थाला माझी जन्मतारीख कशाला हवी आहे या प्रश्नाने माझ्या मनाचा कब्जा घेतला. मी त्याला जन्मतारीख पाठवली खरी पण अजून एक प्रश्न जोडून पाठवली. त्याने अजून एक ई-मेल पाठवून जन्मतारीख का हवी आहे हे कळवलं. म्हणजे जे एकाच ई-मेलमध्ये होऊ शकलं असतं त्यासाठी २-३ ई-मेल्स ची देवाण-घेवाण झाली. असो.

निरोप वाचताच मी आनंदलो आणि धास्तावलो देखील. विषयओळीत फक्त दोन वाक्ये होती. आपल्या खात्यासाठी कार्याप्रीत्यर्थपरदेशगमनाची (ऑनसाइट म्हणा हवं तर) संधी आहे हे सांगणारी आणि मी त्यासाठी तयार आहे का हे विचारणारी ती दोन वाक्ये होती. मी आनंदलो यासाठी की परदेशवारीची (आणि ती देखील अमेरिकेत) पहिलीच संधी मला चालून आली होती. धास्तावलो या साठी की घरी २-३ महत्त्वाच्या गोष्टींसाठी माझं असणं आवश्यक होतं. ती कामे आटोपून जाता येईल की त्या आधीच जावे लागेल या विचारांनी मी जरा चिंताक्रांत झालो होतो. शिवाय जर ३-४ महिन्यांसाठी जायचे असेल तर कंपनीच्या धोरणानुसार बायकोला घेऊन जाता येणार नाही हे देखील माहीत होते. मग मी पुन्हा एक उलटी-मेल पाठवून काम सुरू होण्याची तारीख, प्रवासाची तारीख, कामाचे स्वरूप, कालावधी वगैरे गोष्टींची चौकशी करणारी प्रश्नावली पाठवली आणि काही अडचण न आल्यास मी तयार असल्याचे कळवले. मी त्वरित बायकोला फोन करून सांगितले. ती पण सुखावली.

आजकाल ऑनसाईटला आणि त्यातल्या त्यात अमेरिकेला जाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. माझ्या मित्रमंडळीमध्ये आणि बऱ्याच ओळखीच्या लोकांमध्ये अमेरिकेला वारंवार जाणारे देखील बरेच आहेत. अमेरिकेला जाणं त्यांच्या इतक्या अंगवळणी पडतं की मी जसं सहजपणे डेक्कनला किंवा आप्पा बळवंत चौकात जाऊन आलो असं म्हणतो तितक्या सहजपणे ते फ्लोरिडा, न्यूयॉर्क, मियामी (की मायामी?), ऱ्होड आयलंड वगैरे नावे फेकत असतात. मी अशावेळी गुपचूप बसतो. कॅलिफोर्निया वगैरे नावांचा उच्चार अगदी गायत्री मंत्राच्या जपाप्रमाणे चालत असला की मग कॅलिफोर्निया नंतर कसबा किंवा कर्वेनगर सांगायला थोडं जड जातं आणि त्याहीपेक्षा जड ते इतरांना ऐकायला जातं. २-३ ऑनसाईटला जाऊन आलेले मित्र भेटले आणि त्यात एकटाच बिचारा नगर आणि नाशिकच्या पुढे न गेलेला मित्र सापडला तर मग विचारायलाच नको. गप्पा दोन अतिशय भिन्न पातळीवर चालतात. एक जण लॉसएंजिल्सच्या अतिरम्य चैनीचे वर्णन करतो तर दुसरा 'पुण्यात ट्रॅफिक किती वाढली आहे आणि विद्यापीठाजवळचा फ्लायोव्हर किती कुचकामी आहे हे सांगतो.

यथावकाश मला सगळी माहिती मिळाली. यथावकाश म्हणजे खरोखरच यथावकाश मिळाली. मग मला माझ्या कामाचे नमुने, माझ्याबद्दलची सगळी माहिती वगैरे नीट संकलित करून सातासमुद्रापार बसलेल्या ग्राहकराजाला पाठविण्याचा हुकूम आला आणि मी तो पाळला. नंतर पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. मग अचानक एक दिवशी आणखी काही सुधारीत माहिती पाठविण्याचा हुकूम आला. तोपर्यंत मी घरची कामे आटोपून घेण्याच्या मागे लागलो होतो. बायकोला नेता येणार नाही हे एव्हाना स्पष्ट झाले होते त्यामुळे मी नाराज होतो खरा पण एका वेगळ्या, आर्थिक महासत्ता असलेल्या सुंदर देशात जायला मिळेल याचा आनंद ही होता. शिवाय मित्रमंडळीमध्ये मला पण आता हिरीरीने फ्लोरिडा वगैरे शब्द फ्ल्वॉवरपॉट त्वेषाने फेकून मारतानाच्या त्वेषाने फेकता येणार होते. कुठल्यातरी एका लहान गावचा मी, आणि एकदम अमेरिकेला जायची संधी आल्यावर कुणीही कसे हुरळून जातात तसा मी हुरळून गेलो होतो. साहजिकच होते ते. साधारण साडे चार महिने अमेरिकेत राहावे लागणार असे कळले. एवढा मोठा कालखंड बायकोशिवाय राहणे अवघड होते. मी माझ्या गटप्रमुखाला तसे सांगितले. तिने काहीतरी (म्हणजे काहीच नाही) करण्याचे आश्वासन दिले.

काही दिवसांनी मग ग्राहकराजा सोबत मुलाखतीचे आमंत्रण मिळाले. मी जरा घाबरलो. डायरेक्टर वगैरे मंडळी मुलाखत घेणार होती. ध्वनिबैठक सेतू (कॉन्फ़रन्स ब्रिज) आरक्षित केला गेला होता. मी जरा तयारी करून मुलाखतीसाठी ध्वनिबैठकीत हजर झालो. दोन अमेरिकन तिकडे बसले होते. हाय, हॅलो झाल्यावर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. सगळ्या प्रश्नांची यथोचित उत्तरे दिल्यानंतर साधारण ४० मिनिटांनी ध्वनिबैठक संपली. मी बाहेर आलो.

बरेच दिवस काही घडले नाही. मला वाटलं ते विसरले किंवा आपली मुलाखत चांगली झाली नाही किंवा आपलं ज्ञान त्यांच्या अपेक्षांच्या तुलनेत फारच तोकडं पडलं किंवा आपण लईच बावळटासारखे बोललो मुलाखतीत...एक ना हजार शंका. पण एका सोमवारी अचानक ई-मेल आला. माझ्या मुलाखतीवर ते बहुधा प्रसन्न झाले होते. माझी जाण्याची तारीख ठरली होती. ५ जानेवारीला इकडून अस्मादिकांचे प्रयाण होणार होते. मी घरी सगळ्यांना सांगितले. सगळ्यांनी अभिनंदन केले. सगळे माझ्याकडे एका वेगळ्याच आदराने (आधी 'कसला बावळट आहे...' या भावनेने बघत) बघायला लागले. मग बायकोला नेता येणार नाही असे सांगितल्यावर सगळे नाराज झाले. पण एक चांगली संधी मी सोडू नये असे सगळ्यांचे मत पडले. बायकोने पण माझी 'हौसलाअफ्जाई' केली. मग घरातल्या कामांचे नीट नियोजन करून ती आटोपूनच जायचे असे ठरले. सगळी कामे करायची आणि त्यासोबतच जाण्याचीही तयारी करायची असे ठरले. पहिलं काम प्रॉपर्टी टॅक्सचं होतं. पुणे महापालिकेच्या सक्षम कारभाराचा प्रत्यय याहीवर्षी आला. कित्येकदा पुढे ढकललेली टॅक्स भरण्याची शेवटची तारीख निघून गेल्यावरही आमची टॅक्सची बिले आली नव्हती. मी एका शनिवारी क्षेत्र कार्यालयात गेलो. क्षेत्र कार्यालयाला नेहमीप्रमाणे तीर्थक्षेत्राची कळा आलेली नव्हती. अजिबात गर्दी नाही असे दिसल्यावर मी झपाझप पावले टाकत आत गेलो. शासकीय कार्यालयात उत्साहाने शिरणारा माणूस मला अजून बघायचाय. मी शिरलो. बाहेरच एक माणूस खुर्ची टाकून बसला होता. मी उगीच जिन्यात वगैरे जाऊन आलो. तरीही हा इसम देवळातल्या देवासारखा निश्चल बसला होता. मग मी बाहेर येऊन विचारल्यावर त्याने निर्विकारपणे 'आज सुटी आहे, सोमवारी या' अशा नेमक्या शब्दात ज्ञानपोई खुली करून मला ज्ञानामृत पाजले. मी तृप्त होऊन घरी परतलो.

महत्त्वाच्या कामांचे नियोजन करता-करता आणि बरीचशी कामे पूर्ण करता-करता मी हळू - हळू खरेदीलाही सुरुवात केली होती. अजून बाहेर मी कुणालाच याविषयी सांगितले नव्हते. पण तारीख आल्यानंतर मी मित्रांना वगैरे सांगितले. घरी याद्या वगैरे तयार करण्याचे काम सुरू झाले. [float=font:vijay;place:top;]सुई, दोऱ्यापासून तर कुकर, शाल पर्यंत आणि डिंकाच्या लाडवापासून तर कायम चूर्णापर्यंत सगळं सोबत असणं किती आवश्यक आहे यावर सल्ल्यांची बरसात सुरू झाली.[/float] थंडीपासून जपण्याच्या आणि आवश्यक गरम कपडे घेऊन जाण्याच्या सल्ल्याचे तर मला अपचन झाले होते. शॉपिंग हा माझा सगळ्यात नावडता उद्योग! सतराशे साठ दुकाने हिंडून आणि दुकानदारांशी हुज्जत घालून वस्तू खरेदी करणे आणि मग आपण किती स्वस्तात आणि किती उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू विकत घेतल्या याची फुशारकी मारत हिंडणे या प्रकारांचा मला भयंकर तिटकारा आहे. शॉपिंग करताना पार्किंगसाठी जागा शोधतानाच अर्धी ऊर्जा खर्ची पडते. त्यामुळे आमच्या जवळच्या रस्त्यावरच मी खरेदी करायचे ठरवले. बायकोचा अर्थातच लक्ष्मी रस्त्यावर किंवा तुळशीबागेत जाता येणार नाही म्हणून हिरमोड झाला. मी त्याला अजिबात न भीक घालता आमच्या जवळच्या रस्त्याकडे मोर्चा वळवला. दोन तासात ४-५ शर्टस, ४-५ विजारी, जीन्स, टी-शर्टस, रात्रीचे कपडे, बूट, स्पोर्ट्स शूज अशी भरभक्कम खरेदी करून आम्ही घरी आलो. एखादा किल्ला सर करून आल्यावर जसे एखाद्या सरदाराचे स्वागत झाले असेल तसे आमचे स्वागत झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित भाव होते. "याचं काम किती नियोजनबद्ध आणि फास्ट आहे. बघा, एवढ्या कमी वेळात एवढी चांगली खरेदी करून आला पण घरी" असे भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होते. एरवी मी असाच लवकर खरेदी करून घरी गेलो असतो तर "हम्म...काही भाव वगैरे केला की नाहीस की आला आपला दिल्या त्या किमतीत सगळं घेऊन? तू म्हणजे मुलुखाचा मुखदुर्बळ. जरा तोंड हालवलं तर फायदाच होतो ना आपला? आणि इथल्याच महागड्या दुकानातून घेऊन आलेला दिसतोयस. किती हा आळशीपणा! गेला असतात लक्ष्मी रस्त्यावर किंवा रविवार पेठेत तर काही बिघडलं असतं? पण नाही, रक्ताच्या जागी आळसच वाहतोय ना नसांतून!!" असं स्वागत झालं असतं. चालायचंच.

लगेच एक दिवस कार्यालयात हजेरी लावून दुसऱ्या दिवशी नाताळची सुटी खरेदीच्या कामी लावली. कुकर, चपला, टूथब्रश, टूथपेस्ट, परफ्यूम, दाढीचे सामान असली बरीच किरकोळ खरेदी करून मी एक तासात घरी पोहोचलो. माझं पैशाचं पाकीट खूपच अशक्त होत चाललं होतं. आधीच ते बऱ्यापैकी कुपोषित असतं नेहमी आणि आता तर त्याला दुर्धर आजाराने पछाडलं होतं. मी जरा दुर्लक्ष करत होतो. अमेरिकेला गेल्यावर देऊ जरा व्हिटॅमिन एम त्याला आणि करू सुदृढ असा विचार मनात घोळवत मी चहाचा घोट घेतला. आदल्या दिवशी मी माझ्या अमेरिकेत जाऊन आलेल्या मित्रांशी सल्लामसलत करून आणि इंटरनेटच्या जालावर फिरून बरीच माहिती जमवली होती. किती पैसे मिळणार, किती टॅक्स मध्ये जाणार, घरासाठी किती द्यावे लागणार, बाकी खर्च किती होणार वगैरे हिशेब सुरू झाले होते. 'आपण अमेरिकेला जाणार' ही भावनाच खूप सुखावह असते. अर्थात नेहमी हडपसर किंवा स्वारगेटला जाणारा मी या भावनेने सुखावणे साहजिकच होते. पुण्यातच कोरेगाव पार्क किंवा कोंढवा असल्या कॉस्मोपॉलिटन भागातूनही अगदी क्वचित जाणे होते; आता तर अमेरिकेला जायचे होते. आता मला स्वप्नातही अमेरिका दिसत होतं. मस्त सुखासीन आयुष्य, बर्फवृष्टी, सुसह्य प्रवास...एक ना हजार गोष्टी दिसत होत्या. लहान मुलाला सर्कशीला जायचं म्हटल्यावर कसं मस्त-मस्त वाटतं तसं मला वाटत होतं. अलगदपणे मी स्वप्नांच्या रेशमी धाग्यांना पकडून अमेरिकेत पोहोचलो देखील होतो. मी मनाशी विचार केला, अमेरिकेला जायचा नुसता विचार एवढं सुख देऊन जातो, प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर तर आपल्याला हर्षातिशयाचा धक्का बसेल. हर्षातिशयाचा धक्का प्रकृतीस चांगला नसतो असं कुणीतरी सांगितल्याचं स्मरलं. लगेच हळूच देवघरातल्या स्वामी समर्थांच्या फोटोकडे बघून नमस्कार करून घेतला.

तसं बरेच मित्र सांगतात की एकट्याला तिथे फार कंटाळा येतो, भारतात पळून यावंसं वाटतं वगैरे. पण मी विचार केला आधी आपण प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेऊ आणि मग आपलं मत बनवू. उगीच आतापासून मनाची चौकट बिघडवून ठेवण्यात काही अर्थ नाही. नाताळचा दिवस खरेदीत संपला.

नाताळच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी कार्यालयात यायचे होते. मंगळवारी झोपताना मी दुसऱ्या दिवशी काय काय कामे करायची आहेत याची उजळणी करून घेतली. कदाचित तिकिट खरेदीसाठी विनंतीपत्र बुधवारी टाकावे लागणार होते. शिवाय, काही खास प्रशिक्षण घेण्यासाठी नाव नोंदणे, काही महत्त्वाची कागद-पत्रे गोळा करणे, कामाचा कोड मिळवणे इत्यादी कामे बुधवारी करावी लागण्याची शक्यता होती. अशाच सुखद विचारांत मला कधी झोप लागली कळलेच नाही.

बुधवारची सकाळ नेहमीपेक्षा जास्त रम्य होती. मी झटपट तयार होऊन कार्यालयात पोहोचलो. अधीरतेने माझ्या क्यूबिकलमध्ये शिरलो आणि ई-मेल्स वाचण्यासाठी कॉम्प्युटर उघडला. क्यूबिकलमधले १-२ जण कधी जाणार वगैरे चौकशी करत होते. मी अतिशय मृदू आवाजात पण सावधपणे त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होतो. "अजून काही नक्की नाही. ऑनसाइटच्या संधीचा काही भरवसा नसतो. ऑनसाइटची संधी ही हवामानखात्याच्या पाऊस येण्याच्या अंदाजाप्रमाणेच बेभरंवशाची असते..." अशी सावध उत्तरे देत होतो. कुणी सांगावं आपण गेलोच नाही तर? पण मनाला गुदगुल्या होत होत्या. अशा खेळीमेळीच्या वातावरणात एकदाचा मेलबॉक्स उघडला. सुरुवातीला ३-४ कामासंदर्भात मेल्स होते. झरझर नजर फिरवली आणि बघितले, खाली माझ्या गटप्रमुखाचा ई-मेल होता. मी हुश्श केलं. चला, काहीतरी आलंय. आता घाई करायला हवी. पटकन प्रशिक्षण घेतले पाहिजे, आजच तिकिट खरेदी करायला सांगितले पाहिजे. फोरेक्सची पण चौकशी करायला पाहिजे. असे विचार घोळवतच मी ई-मेल उघडला. त्यात गटप्रमुखाने फक्त 'एफवाय आय' एवढेच लिहिले होते. अरेच्या! ऑनसाइट मॅनेजरने कदाचित तिथे राहण्याचे दिवस वाढलेत असं गटप्रमुखाला कळवलं असेल आणि ते तिने आपल्याला पाठवलं असेल. अरे बाप रे! असं असेल तर मग बायकोला आतच सोबत घेऊन जातो असा आग्रह धरायला हवा. मजा येईल. बघू तरी काय लिहिलंय. "डीअर रीना..." पुढचं मी वाचलं आणि क्षणभर सुन्न झालो. नवीन शर्टस, विजारी, बूट, जीन्स माझ्याभोवती फेर धरून नाचायला लागले. बूट मधूनच माझ्या डोक्यावर थाड-थाड आदळत होते आणि चक्क खिदळत होते. परफ्यूमची बाटली नाचत-नाचत येत होती आणि जमिनीवर आदळून खळकन फुटत होती. दाढीचा नवीन ब्रश दाढीचं नवीन क्रीम घेऊन माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर फासत होता. नवीन स्पोर्ट्स शूजच्या लेस सर्रकन माझ्या दिशेने येऊन माझ्या गळ्याभोवती फास आवळत होत्या. होय, माझी ऑनसाईटची संधी हवेत विरली होती. अमेरिकेतच एक कर्मचारी अधिक स्वस्तात ग्राहकराजाचं काम करून द्यायला तयार झाला होता. तेच सांगणारा तो ई-मेल होता. मी ई-मेलची तारीख बघितली. नाताळच्या आदल्या दिवशीची रात्री ११ वाजता येऊन पडलेली ती ई-मेल होती. म्हणजे मी नाताळच्या दिवशी ज्या आनंदात होतो त्या आनंदाचा फुगा २४ तारखेलाच फुटला होता. मी बायकोला फोन करून सांगितले. तिलाही वाईट वाटले पण तिने माझे सांत्वन केले.

मी घरी आलो. घरी सगळ्यांना सांगितले होते. "बघ, आम्ही म्हणत होतो आतापासून खरेदी करू नकोस. आता झाली का पंचाईत?" असं कुणी म्हणेल असं वाटलं होतं पण कुणी म्हटलं नाही. अमेरिकेच्या ऑनसाईटचा फुगा फुटून मी धाडकन भुसारी कॉलनीच्या भुसभुशीत जमिनीवर आदळलो होतो. माझं पैशाचं पाकीट मला अधिकच अशक्त वाटायला लागलं. शेवटी 'नोकरी सलामत तो ऑनसाईट पचास!' हा विचार मनात येऊन मी समरसून 'असंभव' बघायला लागलो.

ऑनसाइट मागे जनता धावते
सकाळ संध्याकाळ
सूत्रधार जो या साऱ्यांचा
क्लायंट तयाचे नाव

काय तयाच्या मनात दडले न कळे कधी कुणा
तयाच्या मर्जीविण ऑनसाइट जाणे हे तर केवळ... असंभव, असंभव, असंभव!!

-- समीर